✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट
✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख
✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज?
✪ ये शाम मस्तानी!
✪ मळभ हटताना
✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
✪ गरज फक्त सोबत देण्याची
सर्वांना नमस्कार. नुकताच नागपूरमध्ये एक सुंदर अनुभव घेता आला. तो अनुभव व त्यासंदर्भात मनात आलेले विचार आपण सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटण्याचा योग आला. काही कामामुळे नागपूरला जाण्य़ाचा योग आला व तिथल्या परिचितांची भेट घेण्याचं ठरवलं. मनमंदिर नेटवर्कमुळे जोडल्या गेलेल्या मंडळींना भेटायची उत्सुकता होती. त्यांनीही आनंदाने तयारी दर्शवली व आठ- दहा जण भेटण्याचं ठरलं. ह्या मंडळींमध्ये आकांक्षाताई देशपांडे होत्या, त्या ऑटीझम म्हणजे स्वमग्नता असलेल्या व डाउन्स सिंड्रोम असलेल्या मुलांसोबत काम करतात हे ऐकलं होतं. तेव्हा मनात विचार आला की, नुसतं भेटण्याच्या ऐवजी ह्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का? मी मुलांसाठी जे फन- लर्न सेशन घेतो ते ह्या मुलांसाठी घेता येईल का असा विचार केला. आणि मी नागपूरमध्ये असण्याच्या दिवशी जूनमधलं ढगाळ वातावरण असलं तरी टेलिस्कोपमधून चंद्र बघता येईल, इतकं आकाश असेल, हेही लक्षात आलं. पण असं सेशन हे विशेष मुलांसोबत घेता येईल का, मनामध्ये शंका होती. हे नागपूरच्या डॉ. सीमाताईंना विचारलं व त्यांनी आकांक्षाताईंना विचारलं. आकांक्षाताईंसोबत मग पुढे बोलणं होत गेलं आणि एक एक गोष्ट ठरत गेली. फन- लर्नमधल्या सोप्या एक्टिव्हिटीज ही मुलं करू शकतील आणि टेलिस्कोपमधून चंद्रही बघू शकतील, असं ताईंनी सांगितलं. आनंदही झाला आणि खूप धाकधुकही वाटली की, ते मुलं तर करू शकतील, पण मला ते कंडक्ट करणं जमेल ना!
२ जूनला नागपूरातल्या मनिष नगरमध्ये एका मंदिरात हा कार्यक्रम घेण्याचं ठरलं. ऑटीझम (स्वमग्नता) असलेली आणि डाउन्स सिंड्रोम (एक जनुकीय विकार ज्यामुळे गोल चेहरा, मागून चपटे डोके आणि मतिमंदता असे लक्षण दिसतात) असलेल्या मुलांसह त्यांचे पालकही ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. आकांक्षाताईंच्या "आकार" ग्रूपच्या विशेष मुलं व पालकांसह "स्वीकार" संस्थेचे विशेष मुलं व पालकसुद्धा येतील असं कळालं. स्वीकार ही संस्था श्री. विकास खळतकर ह्यांची आहे. संस्थेचं नाव "स्वीकार" बघूनच छान वाटलं. कोणतीही समस्या किंवा वेदना असेल- जर आपण तिचा पूर्ण "स्वीकार" करू शकलो, ती टाळण्याचा, ती नाहीच आहे असं भासवण्याचा प्रयत्न न करता पूर्ण स्वीकार करू शकलो तर ती हलकी होते. त्यामुळे हे नाव अगदी सार्थ वाटलं. नागपूरमध्ये विशेष मुलांवर काम करणारी ही मोठी संस्था आहे. कार्यक्रमामध्ये येणा-या विशेष मुलांमध्ये विशेष प्रौढही आहेत. आकांक्षाताईंशी बोलून जास्तीत जास्त मुलांना रिलेट होतील, समजतील व एंजॉय करता येतील अशा एक्टिव्हिटीज निवडल्या. शिवाय पालकांसाठी ध्यानाबद्दलही बोलायचं ठरलं. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मनमंदिरच्या नागपूरकर सदस्यांनी खूप पुढाकार घेतला व बरीचशी तयारी केली.
सकाळी नागपूरला पोहचलो. अजनीवरून दीक्षा भूमी, दक्षिण अंबाझरी मार्ग असं फिरत फिरत माधव नगरला नातेवाईकांकडे पोहचलो. नागपूरच्या थंड आणि आल्हाददायक हवेत चालण्याचा आनंद घेतला! आता इथे मस्त भेटी होतील. कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप लोकांशी बोलणं होत आहे. नवीन लोकांशी जोडला जातोय. त्याशिवाय नागपूर म्हणजे माझ्या आजोबांचं गाव. त्यामुळे इथल्या नातेवाईकांसोबतही भेटी होत आहेत. आधी मुलांसोबत अनेक सेशन्स घेतले असले तरी आज एक हुरहुर जाणवतेय. त्यातही एक नजर हवामानाकडे आहे. मुलांना चंद्र तरी दाखवता यायलाच पाहिजे! वेळेच्या थोडं आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचलो. आकांक्षा ताई आलेल्याच आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलणं झालं. कार्यक्रमातले घटक व स्वरूप ह्यावर चर्चा केली. त्यांनी मंदिराचा हॉल व आजूबाजूचा परिसर दाखवला. चंद्र कोर पश्चिमेला अंगणातून पाहता येईल. पण आकाशाचा रंग टी- ट्वेंटी सामन्याप्रमाणे दर मिनिटाला बदलतोय! बघू कसं होतं! हळु हळु एक एक जण येत गेले. ह्या सेशनमध्ये तशा अगदी मोजक्या गोष्टी लागतात. रद्दी पेपर, कात्री, पत्त्यांचे कॅटस, फुगे असं. ते सगळ्यांनी मिळून आणलं. काही जणांनी विशेष मुलांसाठी व विशेष प्रौढांसाठी खाऊही आणला आहे. सगळे येईपर्यंत टेलिस्कोप सेट करून ठेवला.
विशेष मुलांसोबत असं भेटण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. पूर्वी विशेष मुलांवर काम करणा-या काही संस्थांना MSW च्या वेळेस भेट दिली होती. पण अशी भेट पहिल्यांदाच होते आहे. विशेष मुलं व प्रौढ पालकांसोबत येत आहेत. त्यांना नमस्कार हसून केल्यावर तेही हसून प्रति नमस्कार करत आहेत. काही जणांनी मंदिरामध्ये देवीचं दर्शनही घेतलं. एकमेकांसोबत सगळे विशेष मुलं (व प्रौढ) बसले. हळु हळु मनावरचं दडपण हलकं होतंय! पालकही बसले. मुख्य लोक आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. आकांक्षाताईंनी सूत्रं हाती घेतली. त्यांनी नाव घेऊन बोलावल्यावर मुलांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. एका ताईंनी माझी मुलांची ओळख करून दिली आणि कार्यक्रम सुरू झाला. मी थोडक्यात माझी ओळख पालकांसाठी करून दिली. मुलांनी बोलावं म्हणून त्यांनाही परिचय करायला सांगितलं. सगळ्या मुलांनी जुजबी परिचय करून दिला, थोडक्यात पालकांनीही परिचय करून दिला.
मुलांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा व त्यांना एंजॉय करता यावं, अशा स्वरूपाची पहिली कृती घेतली ती म्हणजे पत्त्यांचा बंगला करायचा. ४-५ मुलांचे व पालकांचे असे गट चार केले आणि त्यांना पत्ते दिले. सतरंजीच्या ऐवजी फरशीवर बसून किंवा भिंतीच्या आधाराने पत्ते उभे करता येतील असं सांगितलं. हे विशेष मुलं व प्रौढ असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोय. गट बनवायला वेळ लागला, उठून दुसरीकडे बसायचं हे मुलांना कळायला वेळ लागला. काय करायचं हेही लक्षात यायला वेळ लागला. पण पाच मिनिटांमध्येच मुलं पत्त्यांमध्ये गुंग झाले. हॉलमधला माहौल बदलून गेला! हसत खेळत- चित्कारत त्यांनी पत्ते लावायला सुरुवात केली. आणि पहिला मजला उभाही राहिला. हळु हळु मुलांना जमतंय. काही जण बरोबर पत्ते लावत आहेत. एका गटामध्ये मात्र मुलांना कळत नाही, म्हणून पालकच पत्ते लावत आहेत आणि मुलं त्याचा आनंद घेत आहेत. एका गटामध्ये तीन आडवे घरं झाले होते, पण धक्का लागून ते एकदम पडले. पण मुलांनी नाराज न होता लगेच परत सुरुवात केली. आणि मुलं रंगून गेलेली दिसली. दिलेला वेळ संपेपर्यंत दोन गटांनी तर दुसराही मजला उभा केला. ही कृती संपल्यावर सगळ्यांच्या सहभागासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कोणी जिंकला किंवा हरला नाही तर सगळ्यांनी एंजॉय केलं, हेही सांगितलं. काही पालकांनी त्यांचं निरीक्षण सांगितलं.
रद्दीच्या कागदाला विशिष्ट प्रकारे कापून त्याचा हार बनवायचा, अशी पुढची कृती घेतली . आधी मुलांना त्याची माहिती दिली. एक छोटा डेमोही दाखवला. दोनदा नीट समजावून सांगितलं. आणि मग मुलांनी सुरुवात केली. रद्दीचे कागद दिले व गटामध्ये कात्र्या दिल्या. काही मुलांनी लवकर प्रयत्न केले, त्यांच्या लक्षात आलं काय करायचं आणि मग एक एक हार तयार झाले! मुलांची उत्सुकता आणि सहभाग जाणवतोय. सगळे मिळून प्रयत्न करत आहेत आणि बघत आहेत की कसं जमतंय. ह्या कृतीमध्ये पालकांना तितकी मदतीची गरज पडताना दिसत नाहीय. ब-याच मुलांनी आणि गटांनी हार बनवले. एकाला पद्धत लक्षात आल्यावर तो दुस-याला सांगतोय. जसं जमेल तसं बनवत आहेत. काही गटांना परत एकदा सांगितलं. काही मुलांना जमत नाहीय. पण कोणीही एकमेकांना हसत नाहीय. उलट सगळ्यांच्याच चेह-यावर एक प्रसन्न स्मित दिसतंय. सुंदर वातावरण तयार झालंय.
ये शाम मस्तानी
पुढच्या कृती कोणत्या घ्यावात, हा विचार करताना चंद्राची स्थितीही बघून आलो. मघाशी बरेच दाटलेले ढग कमी होत आहेत. चंद्र बहुतेक बघायला मिळेल! पुढच्या कृतींसाठी तुलनेने वेळही कमी आहे. आणि मुळात काय व किती कृती घ्यायच्या ह्याही पेक्षा मुलांनी एंजॉय करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आकांक्षा ताईंशी बोलून मुलांना गाणी घेण्यासाठी सांगितलं. विकास खळतकर सर आधीच बोलले होते की, त्यांची मुलं मस्त परफॉर्म करतात! आणि मग एकेकाला त्यांनी बोलावलं आणि एक मैफिलच सुरू झाली! काय सुंदर गाणी मुलांनी सादर केली! चैतन्य बल्लाळ, महेश चंद्रशेखर, अजिंक्य, क्षितिजा व प्राजक्ता अशा मुला- मुलींनी अप्रतिम गाणी सादर केली! त्यांच्या गाण्यातला भाव, एक्स्प्रेशन्स, प्रयत्न आणि उत्साह अप्रतिम! गाणीही अगदीच सुंदर-
मै कोई ऐसा गीत गाऊँ जो आरजू जगाऊँ अगर तुम कहो
जमीं को आंसमाँ बनाऊं, सितारों से सजाऊँ अगर तुम कहो!
जणू मुलं म्हणत आहेत, "तू फक्त सोबत ये म्हण, सगळं करेन."
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
जणू तो समाजाला म्हणतोय, "किती दिवस आम्हांला असं- तसं म्हणत राहणार. किती दिवस तुम्ही तसं म्हणणार, आम्ही ते ऐकणार!"
आणि ये शाम मस्तानी तर अप्रतिम सादर केलं! त्यातली ओळ ऐकताना खूप भावुक वाटलं-
ऐसा लगे जैसे कि तू हँसके ज़हर कोई पिये जाये!
एकाने "शिर्डीवाले साईबाबा" ते "दिगंबरा दिगंबरा" एकत्र म्हणून प्रार्थनेचा भाव आणून ठेवला. ह्या मुलांना गाणी सादर करणं अजिबात सोपी गोष्ट नाहीय, पण तरी ते आनंदाने करत आहेत.
स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज?
हे सगळं बघताना जाणवतंय की, आपण जे पूर्वग्रह बाळगतो, ते किती फुटकळ असतात. मुळामध्ये हे मानसिक ताण किंवा विकार हे सगळ्यांमध्येच कमी- जास्त प्रमाणात असतात. प्रत्येकालाच काही कौशल्य शिकायला जास्त वेळ लागतो, प्रत्येक जणच कोणत्या ना कोणत्या बाबतीत स्लो लर्नर असतो. आणि आत्ममग्नही असतो. नंतर एका ताईंनी सगळ्यांच्या मनामध्ये आलेल्या भावनांना शब्द दिले, कार्यक्रमानंतर त्या म्हणाल्या की, ही मुलं स्वमग्न नाही आहेत, आपण सगळे- सगळा समाज स्वमग्न आहे. आपल्याला व समाजाला स्वत:च्या कोषाच्या बाहेर येऊन ह्या मुलांबद्दल संवेदनशील होण्याची फुरसतच नाहीय, त्यांच्या वेगळ्या गरजा आपण समजूनही घेत नाहीत!
.... हा सोहळा अनुभवताना मनामध्ये असलेल्या चाको-या, पूर्वग्रह, आपण आणि ते अशी दरी, मनातली भिती- अस्वस्थता अशा सगळ्या गोष्टी विरघळून जात आहेत. जणू नागपूरच्या शीतल हवेतल्या आल्हाददायक दुपारी एका भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवले तर ते जसे विरघळून जातील तशा. अशा किती तरी गोष्टी असतात ज्या आपण ऐकीव माहितीवरूनच धरून चालतो. पण जेव्हा प्रत्यक्ष असा अनुभव येतो, तेव्हा असत्य पूर्वग्रहांचे अत्यंत वाईट प्रकारे तुकडे तुकडे होतात! पुढे एका मुलीने अगदी अर्थपूर्ण गीत म्हंटलं. त्यातल्या ह्या ओळी खूप भावल्या-
भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
आणि त्यातली ही ओळसुद्धा-
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
ह्या मुला- मुलींनी इतकं भावूक केलं आहे सगळ्यांना! इथून पुढचं सत्र मुलांनीच हाती घेतलं. किंबहुना फक्त दोन कृतीच मी व आकांक्षाताईंनी घेतल्या. पुढे मुलांनीच त्यांना हवं ते केलं आणि एंजॉय केलं. जणू फक्त "सागर सा रेती रे" म्हणून सुरुवात करून दिली, पुढे पूर्ण गाणं त्यांनी स्वत:च म्हंटलं. हे गाणे चालू असताना पश्चिमेकडचं आकाश बघितलं आणि ताईंना सांगितलं की, ४-४ मुलं व पालकांना आता चंद्र बघता येईल! ताईंनी मग मुलांसाठी फुगे फुगवण्याची कृती सुरू केली आणि छोट्या गटातून मुलांना व पालकांना चंद्र बघण्यासाठी बाहेर पाठवलं.
मळभ हटताना
आज चंद्राची तृतीयेची कोर आहे! ढगांच्या गर्दीमध्ये वेढलेला चंद्र दिसतोय. मुलांना चंद्राचा आनंद घेता येणार, ह्याचा खूप आनंद होतोय. मुलं व प्रौढही चंद्र बघू शकत आहेत. काही विशेष अडचण त्यांना येत नाहीय. टेलिस्कोपला धक्का न लावता आयपीसच्या जवळून कसं बघायचं हे सांगितलं की ते तसे बरोबर बघत आहेत. चंद्र परत ढगांमध्ये जाण्याच्या आधी अनेक मुलांना व पालकांना बघता आलं. एखादाच मुलगा असा आहे ज्याला डोळा योग्य प्रकारे आयपीस जवळ नेऊन बघता येत नाहीय. पण असं होतं अनेकदा. मी तर मोठ्या नॉर्मल लोकांनाही कधी कधी कुठे डोळा नेऊन बघयचा, हेच कळत नसलेलं बघितलंय. आणि त्याही पलीकडे, आपण तरी कुठे ह्या मुलांचं जग, त्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या, त्यांच्या पालकांना असलेले ताण नीट डोळे उघडून बघतो? त्याबद्दल आपली अनास्थासुद्धा आपण कुठे डोळे उघडून बघतो?
नंतर काही वेळ चंद्र परत ढगा आड गेला. आणि परत काही वेळ दिसला. अगदी थोडे मुलं- पालक सोडले तर बाकी सगळ्यांना बघता आला. आणि जे जे ह्या कार्यक्रमात आहेत, त्यांनाही बघता आलं की, ही मुलंही नॉर्मल तर आहेत. आपल्यासारखीच तर आहेत. आणि आपणही त्यांच्यासारखेच तर आहोत. आपणही स्वमग्न असतोच की (जेव्हा स्वमग्न मुलांसाठी सेशन घ्यायचं ठरवलं, तेव्हा एका बाजूला असंही वाटलं होतं की, मी नक्कीच घेऊ शकेन, कारण एके काळी मीसुद्धा खूप स्वमग्न होतोच, घराच्या काय खोलीच्याही बाहेर कधी जात नव्हतो, अजूनही कधी कधी असं करतो! तेव्हा वाटलं की, मला हे त्यामुळे नक्कीच जमेल)! मानसिक ताण व विकार तर प्रत्येकामध्ये असतातच. कोणामध्ये प्रकट होतात, कोणात सुप्त राहतात. मानसशास्त्रज्ञ म्हणतातच की, संपूर्ण मानवजातीने आजवर जे गुन्हे केलेत, ते करण्याची क्षमता- susceptibility प्रत्येक व्यक्तीमध्ये असते! तेव्हा आपण स्वत:ला वेगळे, नॉर्मल वगैरे समजण्याचं काहीच कारण नाही. आणि मुळात प्रत्येक व्यक्ती ही तिला जे वातावरण मिळालंय, निसर्गाने तिला जे दिलंय, त्यानुसारच घडत असते. आपल्याला जे सगळं मिळालंय, ते मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण जे काही करतो, ते त्यानुसारच ठरतं. We are product of what we were given by nature. त्यामध्ये कुठल्याच गोष्टीबद्दल मोठेपणाही बाळगण्याची गरज नसते व जे मिळालं नाहीय, त्याबद्दल कमीपणाही बाळगण्याची गरज नसते. असो.
मंदिरातल्या हॉलची वेळ संपत आल्यामुळे फुग्यांची कृती जरा घाईत घ्यावी लागली. मुलांना खाऊचं वाटपही केलं गेलं. त्यावेळी मी टेलिस्कोपपाशी असल्यामुळे आकांक्षा ताईंनीच पुढे सूत्रं घेतली. नंतर खरं तर मला पालकांना ध्यानाबद्दल सांगायचं होतं. ध्यानाच्या पद्धतींबद्दल सांगायचं होतं. इतकं नक्की सांगायचं होतं की, एखाद्याच्या सुंदर चेह-यावर जर एखादा जळाल्यामुळे झालेला मोठा डाग असेल, तर आपण तो डागच जास्त बघतो. पण थोड्या प्रयत्नाने, थोड्या सवयीने आपण आपला फोकस डागापासून परत चेह-याकडे नेऊ शकतो. आणि चेह-यारा किंवा शरीराच्याही पलीकडे त्या व्यक्तीकडे नेऊ शकतो. पण ध्यानाबद्दल बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही व बरेचसे मुलं- पालक निघत होते. त्यामुळे त्यांना इतकंच सांगितलं की, माझे ध्यानाचे ऑडिओज आकांक्षाताईंना पाठवतोय, ते पालकांच्या स्ट्रेससाठी उपयोगी पडू शकतील. पालकांच्याही वेगळ्या समस्या आहेत. त्यांनाही खूप ताण होतो. आणि त्यांच्या भविष्याबद्दल असुरक्षितही वाटतं. मुलांबरोबर पालकांसोबतही काम करण्याची तितकीच गरज आहे. आकांक्षाताईंनी पुढे उपस्थितांना धन्यवाद दिले व हळु हळु मुलं व पालक निघाले. आकांक्षाताईंच्या आकार ग्रूपच्या बरोबर खळतकर सरांच्या स्वीकार संस्थेचा ह्या आयोजनामध्ये मोठा सहभाग राहिला.
मनमंदिर नेटवर्कमधल्या ८-१० जणांचं छोटं गेटटूगेदर तिथेच झालं. अगदी निवांत नाही, पण थोडी तरी भेट झाली, परिचय झाला. सगळ्यांनीच ह्या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग घेतला होता. अगदी रद्दी पेपर, कात्री- पत्त्यांचे कॅट, फुगे असं सामान सगळ्यांनी मिळून आणलं होतं. थोड्या वेळ गप्पा झाल्य आणि मग सगळे जण निघाले. सगळ्यांनाच सुंदर अनुभव मिळाला. मुलांचं हसणं, ऊर्जा, आनंद घेणं हे खूप प्रसन्न करून गेलं. अनेक पूर्वग्रहांच्या ठिक-या ठिक-या उडाल्या. ह्या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रधार आकांक्षाताई, त्यांच्याबद्दल थोडं बोलेन.
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
आकांक्षाताई अर्थात् नागपूरच्या सौ. आकांक्षा देशपांडे गेली अनेक वर्षं विशेष मुलांसाठी अनेक प्रकारे काम करतात. त्या मुलांना व प्रौढांना घरी जाऊन एक एक गोष्ट शिकवणं, एक एक स्किल शिकवण्यासाठी ट्रेनिंग देतात. कधी कधी अगदी बाराखडी शिकणे किंवा दोरा ओवणे अशा कौशल्यांसाठीही मुलांना अनेक महिने वेळ लागतो. तितका संयम, सहनशीलता ठेवून आकांक्षाताई हे करतात. त्यासह मुलांना गरजेनुसार थेरपीज देतात. त्यांच्या पालकांसोबतही काम करतात. आणि त्याहीपलीकडे जाऊन ह्या मुलांना व प्रौढांना सोबत, आपलेपणा, प्रेमाचा स्पर्श, सन्मान आणि आपल्या आयुष्यात स्थान देतात. पालकांचे अनेक प्रकारचे प्रश्न असतात, पालकांवर खूप मोठा ताण असतो, त्यांचीही खूप चिडचिड होत असते. त्यांनाही मदत करावी लागते, सोबत करावी लागते. आकांक्षाताई व्यक्तिगत पातळीवर हे सगळं गेली अनेक वर्षं करत आहेत. व्यवसायाने त्या शिक्षिका आहेत आणि घरामध्ये जवळची व्यक्ती विशेष अवस्थेने पीडीत असतानाही त्या हे करत आहेत. स्वत:ची जगण्याची आणि स्वत:च्या व्यक्तीची काळजी घेण्याची लढाई लढण्याबरोबर त्या इतर अनेक विशेष मुलांची आई, ताई व मैत्रीण झाल्या आहेत. त्यांचं हे काम आणि त्यांचे हे प्रयत्न खूपच प्रेरणादायी आहेत. त्यामुळे आकांक्षापुढति गगन ठेंगणे असंच म्हणावं लागेल.
पण आता आपण सगळ्यांनी त्यांना सोबत केली पाहिजे. ह्या समस्येवर मात करणं ही केवळ त्यांची आकांक्षा असणं योग्य नाही. आपण सगळ्यांचीही ती आकांक्षा असली पाहिजे. जर सगळ्यांची ती आकांक्षा झाली, सगळ्यांनी आपले प्रयत्न त्या दिशेने केले तर निश्चितपणे गगन ठेंगणे होईलच. आज ह्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, कारण आपल्याला त्याबद्दल जाणीवच नाही. आपले डोळेच मिटलेले आहेत. जर ह्या विषयाबद्दल लोकांना माहिती झाली आणि लोकांना त्यातलं गांभीर्य कळालं, तर निश्चितच ह्या मुलांना व पालकांना मदत मिळू शकते. आणि आपल्याला जरी वाटत असलं की हे काम किती अवघड आहे किंवा हे मुलं- पालक कधी सुखी होऊ शकतील का असा प्रश्न पडत असला तरी ह्या कार्यक्रमामध्ये जे दिसलं ते हेच की, हे मुलं अगदी छोटी गोष्टही खूप एंजॉय करतात. कित्येक गोष्टी त्या करू शकत नाहीत, जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही. हे खरं आहे. पण त्याबरोबर हेही खरं आहे की, अगदी छोट्या गोष्टींमधूनही ते आनंदी होऊ शकतात. बरेचसे जण योग्य ट्रेनिंग, थेरपी व मदत केली तर स्वत:च्या पावलावर उभेही राहू शकतात.
गरज फक्त सोबत देण्याची
हे प्रयत्न एका व्यक्तीचे, एका संस्थेचे राहायला नकोत. आपणही त्यात सहभागी होऊ शकतो. आणि आपणही खूप काही करू शकतो. इतकी वर्षं सातत्याने व इतक्या संयमाने हे काम करणं दुर्मिळ गोष्ट आहे. पण आपणही अनेक प्रकारे त्यात सहभाग घेऊ शकतो. मुळात हा विषय समजून घेऊ शकतो, आपल्या संपर्कात असे पालक- मुलं/ प्रौढ असतील तर त्यांच्याबद्दल संवेदनशील होऊ शकतो. आपल्याकडे ज्या गोष्टी, जी कौशल्ये असतील ती ह्या कामासाठी देऊ शकतो. आर्थिक मदत करू शकतो, त्यांना त्यांच्या गरजेनुसार इतर मदत करू शकतो. आणि त्याही पलीकडे अशी व्यक्ती एकटी नाहीय, आपणही तिच्यासोबत आहोत, हा विश्वास असं काम करणा-यांना देऊ शकतो. हा विचार व विषय आपल्या लोकांपर्यंत नेऊ शकतो. कधी त्यांचं काम बघायला जाऊ शकतो, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.
आकांक्षाताईंच्या कार्यक्रमात सहभाग घेता आला व हा विषय खूप जवळून कळाला. त्यांच्या कामामध्ये पुढेही शक्य असेल त्यानुसार सहभाग घेत राहीन. त्यांच्या अनेक मुलांसाठी लर्निंग टूल्स, थेरपी, ट्रेनिंग अशा गोष्टी आवश्यक असतात. काही मुलांमध्ये उपचार व थेरपीमुळे सुधारणा शक्य असते. ह्यासाठी त्यांना खर्च येत असतो. आजवर हा बहुतांश खर्च त्यांनी स्वबळावर केला आहे. पण इथून पुढे हे चित्र बदलावं अशी इच्छा आहे. म्हणून खारीचा वाटा म्हणून त्यांना आर्थिक काँट्रीब्युशनही केलं. आणि अधिकाधिक लोकांनी त्यांच्या कामामध्ये व ह्या विषयावरच्या कामामध्ये सहभागी व्हावं, अशी आग्रहाची विनंती मी सर्वांना करेन. ह्या मुलांना भेटताना, त्यांना समजून घेताना इतरही मुद्दे जाणवले. पालकांचेही प्रश्न जाणवले. त्यासाठी त्यांना ध्यानाचे ऑडिओज शेअर केले. योगनिद्रा हा ध्यानाचा प्रकार तर ही मुलंही झोपताना करू शकतात.
त्यातून जाणवलेलं एक निरीक्षण नोंदवतो आणि थांबतो. अनेक मुलांमध्ये हायपर एक्टिव्हिटी ही एक समस्येची बाब असते. मुलं एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना शिकायलाही वेळ लागतो. शिवाय पालकांनाही सतत लक्ष द्यावं लागतं. त्याबरोबर फिटनेसप्रेमी ह्या अँगलने मी बघितलं की, अनेक विशेष मुलं व प्रौढ हे स्थूलत्वाकडे झुकताना दिसतात. त्यातूनही पुढे वेगळ्या समस्या होऊ शकतात. शिवाय अनेक बाबतीत मनाचा ताण हा शरीराद्वारेही हाताळता येऊ शकतो. त्यामुळे अशा मुलांसाठी व पालकांसाठी सोपे आनंद घेता येणारे व्यायाम किंवा क्रीडा प्रकार आयोजित करता येऊ शकतात. आठवड्यातून एक दिवस डान्स किंवा खेळ असं ते करू शकतात. हे सोपं नाहीच. कारण हे मुलं नवीन गोष्ट लगेच मान्य करत नाहीत (आकांक्षा ताईंनाही मुलं लगेच स्वीकारत नाहीत, आठ आठ दिवस त्यांना मुलांकडून स्वीकारलं जाण्यासाठी लागतात आणि दोन- दोन वर्षं मुलांना एखादं कौशल्य शिकायला लागतात...). पण हळु हळु तशी सवय लावता येऊ शकते. मैदानी खेळ, नृत्य, वॉक, छोटी क्रिकेट किंवा अन्य खेळाची स्पर्धा अशा गोष्टी मुलांसाठी व काही प्रमाणात पालकांसाठीही उपयोगी ठरू शकतात. हायपर एक्टिव्हीटी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. फिटनेसची आवड निर्माण झाली तर हळु हळु स्थूलपणामुळे होणा-या समस्या कमी होऊ शकतात. त्यांना आनंद घेता येणारी अजून एक गोष्ट ही ठरू शकते. असो.
ह्या मुलांच्या व पालकांच्या समस्या निश्चितच खूप मोठ्या आहेत आणि भीषणही आहेत (उदा., अडोलसंट मुलांच्या समस्या). आणि हे असं युद्ध आहे जे कधीच संपणारं नाहीय़. त्यामुळे खरी गरज आहे ती, समाजाने पुढे येण्याची. बहुतांश समस्या किंवा वेदना ह्या unattended असल्यामुळे इतक्या तीव्र असतात. जेव्हा मोठ्या संख्येने मदत करणारे, सोबत करणारे, धीर देणारे, प्रेमाचे दोन शब्द बोलणारे लोक पुढे येतील, तेव्हा हे चित्र निश्चितच बदलू शकतं. एक शुद्धतेचं चांदणं पुन: मनावर पसरू शकतं.... आणि असं होईल, तेव्हा आकांक्षाताई आणि असे इतर जण म्हणू शकतील-
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
आकांक्षाताईंचा मोबाईल क्रमांक: 07387667180. हाच त्यांचा google pay नंबरही आहे. पुन: एकदा सर्वांना आग्रहाची विनंती की जमेल त्या प्रकारे, आवडेल त्या पद्धतीने ह्या विषयावरील कामात सहभागी व्हावं. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथपर्यंत पूर्ण वाचलंत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! (हा लेखही आपल्या नेटवर्कमध्ये शेअर करू शकता.)
- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com 09422108376
प्रतिक्रिया
9 Jun 2022 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
नेहमी प्रमाणेच कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा ही लेख मनाला स्पर्शुन गेला.
प्रेरणादायी अनुभव, असे वेगळे काही वाचताना मिळणारा आनंद काही औरच असतो.
लिहित रहा
पैजारबुवा,
10 Jun 2022 - 2:53 pm | मार्गी
10 Jun 2022 - 2:53 pm | मार्गी
10 Jun 2022 - 2:54 pm | मार्गी
वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. हा विषय खरंच मोठा आहे. अनेकदा मूल १० वर्षांचं होईपर्यंतही पालकांना हा विकार कळालेला नसतो. त्यामुळे उपचार व ट्रेनिंगसाठी उशीर होत जातो. जागरूकता वाढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
12 Jun 2022 - 5:16 pm | सिरुसेरि
प्रेरणादायी अनुभव कथन .
14 Jun 2022 - 1:10 pm | मार्गी
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सर!
14 Jun 2022 - 2:13 pm | नगरी
खूप हृदयस्पर्शी
14 Jun 2022 - 2:18 pm | नगरी
मला कुमार सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की प्रसव काळात काही गडबड झाली तरी ऑटिझम होतो का?
16 Jun 2022 - 11:49 am | मार्गी
तज्ज्ञ मंडळी सांगू शकतीलच. मी मुलांचं सत्र घेताना थोडी माहिती घेतली होती. त्यामध्ये दिलं होतं की, आईचं वय ३५ च्या पेक्षा जास्त असेल तर असे विकार गर्भामध्ये होण्याची शक्यता थोडी जास्त असते. शिवाय गर्भधारणेमध्ये/ प्रसुतीमध्ये काही अपघात झाल्यासही असं होण्याची शक्यता असते. हे विकार एका अर्थाने स्थिती असल्यामुळे बरे जरी होत नसले तरी त्या रेंजमध्ये तसे मुलं पुष्कळ शिकू शकतात व काही जण नक्कीच स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. गरज असते ती तशी सांगड घालून देण्याची. असो. पुनश्च धन्यवाद.
14 Jun 2022 - 2:26 pm | Bhakti
छान! विशेष मुलांकडे पाहण्यासाठी खुप मोठं मन आणि पेशन्स हवे.