उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
17 Dec 2024 - 7:46 pm

उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न.

एकल तबला वादनः

उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती. या बाबतीत ते एकमेव अद्वितीय होते.

https://youtu.be/M3FJCIEpKUE?si=weNw78hMRfLSFZSd

नृत्याची साथः

पंडित बिरजू महाराज यांची साथ करत असताना उपज अंगाने साद प्रतिसाद देण्यासाठी लागणारी लय आणि तालावरची हुकूमत उस्ताद झाकिर हुसेन यांच्या वादनात प्रकर्षाने दिसून येते.
https://youtube.com/shorts/LsD87EiS8uo?si=UxuoqMd38Tr4Sg9n

शास्त्रीय वाद्यसंगीतः

पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर सादर केलेल्या चंद्रकंसला उस्तादजींनी केलेली बहारदार साथ. मैफिलीत खंड पडून न देता, रसभंग न होऊ देता तबला स्वरात मिळवण्याचे वेगळेच कसब उस्तादजींनी साध्य केलेले होते.

https://youtu.be/KWiVXvr7Gwk?si=HZG_7Ydt4ddQhocp

उस्ताद शाहिद परवेज यांच्यासोबत उस्ताद झाकिर हुसेन यांनी उपज अंगाने केलेले वादन बेजोड आहे. रागाचे सादरीकरण खंडित करून मुख्य कलाकार आणि तबलावादक यांनी आपापल्या वाद्यावर काढलेले चित्रविचित्र आवाज म्हणजे सवाल जबाब हे आपल्या (दुर्दैवाने) सवयीचे झालेले आहे. या वादनात एक प्रकारचे सवाल जबाब आहेत, पण त्यांची गुणवत्ता वेगळ्याच पातळीवरची आहे.

https://youtu.be/xaTZNY-5CnI?si=svYTy2f_MwcvwZC0

शास्त्रीय/ उपशास्त्रीय गायनाची साथः

गायनाची साथ करताना तबलावादकाला आपली तयारी दाखवण्यासाठी फारसा वाव मिळत नाही. आग्रा, पतियाळा घराण्याचे काही गायक तबला वादकांना बरेचसे मोकळे रान देत असले, तरी बहुतांशी गायक वेगवेगळ्या कारणाने 'संयत' तबला साथ पसंत करतात. या कारणांचा प्रस्तुत लेखात उहापोह करणे अनुचित होईल.

पंडित जसराज आणि डॉ. वसंतराव देशपांडे हे दोघे तबल्याची सखोल जाणकारी असणारे दिग्गज गायक. त्यांची संगत करताना गायकीबरोबर समरस होत, गायकीचा ढंग लक्षात घेत उस्ताद झाकिर हुसेन यांनी केलेली संगत जणू दोन वेगळ्याच तबला वादकांनी वादन केले आहे असे वाटण्याइतकी वेगवेगळी आहे.

https://youtu.be/L8K0SME1oGI?si=PRZjQ-7NEBZIzska

https://youtu.be/iKAU1O-Jtt4?si=8-PtHkmqC5KpX_2z

गझलची साथः

एका घरगुती (खाजगी) मैफिलीत उस्ताद झाकिर हुसेन यांनी गझल नवाझ गुलाम अली यांना साथ दिलेली होती. ही मैफिल गझल गायकीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरावी इतकी अप्रतिम आहे, आणि त्या मागचे कारण अर्थातच उस्ताद झाकिर हुसेन यांची बहारदार तबला साथ हेच आहे. उस्ताद झाकिर हुसेन आणि हरिहरन जोडीच्या गझल्स देखील अविस्मरणीय आहेत.

https://youtu.be/nZu2Om6OROA?si=6_wAo3wV1DnzuBqm

प्रयोगशीलता:

उस्ताद झाकिर हुसेन ज्याचा आधारवड होते, ज्यात हिंदुस्थानी/ कर्नाटक आणि पाश्चात्य शैलींचा मिलाफ होत त्या "शक्ती" ग्रुपचे सामूहिक वादनः

https://youtu.be/SZWkG1HNg0w?si=uCSfBK8eZX6avMPP

चिंतन:

पंडित शिवकुमार शर्मा सातत्याने सांगत असत की उस्ताद झाकिर हुसेन निव्वळ तबलावादक नसून ते एक परिपूर्ण संगीतकार आहेत. आपण घराण्याच्या चौकटीपलीकडचे जग कसे कवेत घेतले हे उस्तादजींच्याच शब्दातः

https://youtu.be/OrVP5CMt_6I?si=rSxD-ntHzEs0EYis

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Dec 2024 - 12:51 am | राजेंद्र मेहेंदळे

समयोचित लेख!!
आपण भाग्यवान आहोत की अशा कलावंतांना पाहायचा ऐकायचा योग आला. लेखात दिलेल्या लिंक बघता बघता हरवुन गेलो. नकळत डोळे पाणावले.
ईश्वर झाकीरभाईंच्या आत्म्यास शांती देवो. बाकी युट्युबच्या माध्यमातुन ते जिवंत आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2024 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समयोचित लेख...!

आपण स्वत: काही तबला वादनातले एक्सपर्ट नसतो पण कानाला तो सुखद वाटणारा तो नाद, ताल अहाहा...! आपल्या जादुई हातांनी तबल्यावर ती वळवळणारी बोटं, एखाद्या मैफिलीत जुगलबंदीतला दैवी अद्भुत ताल-नाद निर्माण करणारा 'जादूगार' पाहिला की एकच दाद येते वाह उस्ताद वाह.... तबल्यावरची थाप खरंच 'शांत' झाली. तबला मूक झाला.

भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

18 Dec 2024 - 10:26 am | चौथा कोनाडा

सुंदर संकलन !
कधीही या धाग्यावर येऊन उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादनाचा ताल कानात साठवून ठेवावा !

उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

अनामिक सदस्य's picture

18 Dec 2024 - 3:57 pm | अनामिक सदस्य

उपज अंगाने म्हणजे काय?

उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

किसन शिंदे's picture

19 Dec 2024 - 12:00 pm | किसन शिंदे

‘बजे सरगम हर तरफ से गुंजे उठकर देश राग’ असं एक गाणं यायचं लहानपणी दूरदर्शन वर, त्यामध्ये अनेक दिग्गज त्यांची संगीत वाद्ये वाजवताना दिसायचे, त्यामध्ये सर्वप्रथम उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांचे अफलातून तबला वादन पाहिले होते. उस्ताद झाकीर यांच्याशी झालेला माझा तो पहिला परिचय होता. त्यानंतर ताज चहाच्या जाहिरातीत “अरे वाह उस्ताद नही, वाह ताज बोलीये” म्हणत अगदी चपळतेने तबल्यावर आपली बोटे थिरकवणारे उस्ताद झाकीर हुसैन आणखी आवडत गेले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेतली संतूर, बासरी अथवा सितार अशी कुठलीही वाद्ये असोत त्यांच्या जर जोडीने तबला नसेल तर ती मैफल मला कायम अर्धवट वाटत आलीय. अगदी तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे संतूर, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी किंवा पंडित रवीशंकर शर्मा यांची सितार ही कायम उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबल्याच्या जोडीनेच ऐकल्याने काहीतरी परिपूर्ण ऐकल्याचे समाधान वाटत आलेय. त्यातही शिवकुमार शर्मा आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी ऐकणे म्हणजे माझ्यासाठी कायम पर्वणी राहत आलीय.

गेली जवळपास २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सितार, संतूर, बासरी आणि तबला ही वाद्ये आणि ती वाजवणारे भारतीय शास्त्रीय संगीतातली ही धुरंदर लोक माझ्यासाठी कायम जवळची आणि आपली वाटत राहिली आहेत. याच प्रेमापोटी उस्ताद झाकीर हुसैन यांचे तबला वादन प्रत्यक्षात ऐकण्याचा योग दोन तीनदा जुळून आला, त्यातून एक कलाकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल असलेला आदर आणखीच दुणावला. यापूर्वी शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यामुळे जशी हुरहूर लागलेली, अगदी तशीच हुरहूर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या जाण्याने वाटत आहे. या दोन्ही दिग्गजांच्या नसण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालीय. तिथे वर स्वर्गात या दोन्ही जिवलग मित्रांची छान जुगलबंदी जमली असेल एव्हाना.

नीलकंठ देशमुख's picture

19 Dec 2024 - 4:49 pm | नीलकंठ देशमुख

अभ्यासपूर्ण लेख. झाकीर भाई तबलावादक म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच माणूस म्हणून पण महान होते.जमिनीवर पाय असलेला,नम्रपणा अंगी असलेला,इतरां विषयी आदर असणारा,वाद्याला दैवत समजणारा.अशी माणसे जाताना इतरांना हळवे करून जातात.

कर्नलतपस्वी's picture

19 Dec 2024 - 7:19 pm | कर्नलतपस्वी

काही काळापुरती येतात आणी चटका लावून जातात.

भावपूर्ण श्रद्धांजली.