टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
राहती जागा
बालपणीचा काळ सुखाचा! १४
प्रेषक प्रमोद देव ( गुरू, ०७/१७/२००८ - ०८:५३) .माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.
हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.
एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."
हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.
मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.
बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!
प्रेषक प्रमोद देव ( शनी, ०६/२८/२००८ - २१:४३) .आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मग आम्हा मुलांपैकी कुणी तरी करत असू.अर्थात पूजा म्हणजे स्वच्छ फडक्याने तसबीर साफ करायची,सगळे पितळी देव पुसायचे(आठवड्या्तून एकदा त्यांना आंघोळही घातली जायची), हळद-कुंकू वाहायचे,थोडी फुले वाहायची... की झाली पूजा. हाय काय नी नाय काय.
शाळेत गीतापठण,श्लोकपठण वगैरे असल्यामुळे ते सगळे पाठ होते. संध्याकाळी इतर उजळणी बरोबर त्याचीही उजळणी व्हायची. आता माझाच विश्वास बसत नाहीये,तर तुमचा काय बसणार म्हणा,पण त्या काळात मला रामरक्षा,अथर्वशीर्ष,मनाचे श्लोक, गीतेतले २,१२ आणि १५ असे अध्याय,झालेच तर संस्कृत सुभाषिते,मोरोपंतांच्या आर्या आणि असेच काही मिळून कितीतरी गोष्टी पाठ होत्या. अगदी मधनंच कुठूनही सुरु करायला सांगितले तरी न अडता,अस्खलितपणे घडाघडा म्हणून दाखवू शकत असे, असा मी घनपाठी होतो. असो. गेले ते दिवस! आता थोड्या वेळापूर्वी काय केले हेही आठवत नाहीये. 
मुख्य दिवाळी संपली की देवदिवाळीच्या आधी येणारे तुळशीचे लग्न आमच्या वाडीत बर्याच जणांकडे साजरे व्हायचे. मात्र त्यात पहिला मान ह्या बायमावशींकडच्या तुळशीच्या लग्नाचा. वाडीतल्या जवळपास सगळ्या बायका अगदी नटून थटून त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह येत असत. एरवी दिवसातनं एखादेवेळ पाणी घालण्या व्यतिरिक्त ज्या तुळशीकडे फारसे लक्ष नसायचे तिला आज भलतेच महत्व यायचे. ज्या डब्यात ती तुळस लावलेली असायची(बहुदा डालडाचा डबाच असायचा)त्या डब्याला बाहेरून गेरू फासला जायचा. मग त्यावर खडूने स्वस्तिक आणि कसली कसली नक्षी काढली जायची. तुळशीला जरीच्या हिरवाकंच खणाने गुंडाळले जायचे. समोर सुगंधी उदबत्ती,धूप लावला जायचा. तुळशीचा नवरा म्हणजे लंगडा बाळकृष्ण एका ताम्हणात घालून आणलेला असायचा. मग दोघांच्या मध्ये आंतरपाट म्हणून वापरायला नवा कोरा पंचा आणलेला असायचा.हळद कुंकु,ओटीचे सामान वगैरे सगळी जय्यत तयारी झाली की मग खास मला बोलावणे पाठवले जायचे. मी म्हणजे ते लग्न लावणारा पुरोहित असायचो.
अहो आता लग्नात भटजी काय म्हणतात कुणाला कळतंय? मलाही त्यातलं काही येत नव्हतंच. तसं मी बायमावशीना सांगितलं की त्या लगेच म्हणायच्या, "मी म्हणते, लग्नात ते मेले भटजी काय म्हणतात ते त्यांचं त्यांना तरी समजतंय काऽऽऽऽय?तुला जे काय श्लोक-बिक येतात नाऽऽऽऽ ते तू म्हण. आमच्या तुळशीबायला आणि बाळक्रिष्णाला चालेऽऽल बरं का! तू काऽऽऽऽऽऽही काळजी करू नकोस. मग मी हात जोडून संध्येला म्हणतात ते (माझी नुकतीच मुंज झालेली होती) "केशवायनम:,माधवाय नम:,गोविंदायनम: इतके म्हणून सुरु करायचो. माझे बघून बायमावशी सगळ्या पोरांना हात जोडायला लावत.
रामरक्षा,मनाचे श्लोक,गीतेचे तीन अध्याय,अथर्वशीर्ष आणि अजून जे जे काही म्हणून माझे पाठ होते ते सगळे म्हणायला मला किमान एक-दीड तास लागत असे. मी जे काही म्हणत असे त्याचा अर्थ माझ्यासकट कुणालाच समजत नसे . पण मोठ्या बायकांना माझे कोण कौतुक. पोरगं काय धडाधड संस्कृत बोलतंय.त्यावेळचे त्यांच्या चेहर्यावरचे ते कौतुकाने ओसंडून जाणारे भाव पाहिले की मलाही मी फार मोठा पंडित असल्यासारखा वाटायचो.निदान त्या क्षणी तरी मला हवेत तरंगल्यासारखे वाटायचे.
हे सगळं झालं की अक्षता वाटल्या जायच्या. मग तुळस आणि बाळक्रिष्णाच्या मध्ये आंतरपाट धरून कुणा हौशी बाईने रचलेली मंगलाष्टकं म्हटली जायची आणि शेवटी "शुभ लग्न सावधान" च्या गजरात अक्षता टाकून हे लग्न लागायचे की तिकडे मुलांनी लक्ष्मीबारचा धुमधडाका सुरु केलेला असायचा. त्यानंतर मग आम्हा चिल्लर पिल्लर लोकांना आवडणारा खाऊ मिळायचा तो म्हणजे उसाचे कर्वे,चिंचा,बोरं,बत्तासा आणि पुन्हा नव्याने बनवलेले ताजे दिवाळीचे पदार्थ. भटजींची दक्षिणा म्हणून मला सव्वा रुपया आणि एखादे शर्टाचे कापड मिळायचे. झालंच तर काही फळंही त्या बरोबरीने असायची. हे सगळे घेऊन ऐटीत मी घरी जात असे.काही म्हणा ते क्षण अक्षरश: मंतरललेले(मंत्र म्हणायचो म्हणून असेल!
)होते.
बायमावशींचं माझ्या बालपणातले स्थान हे माझ्या सख्ख्या मावशांपेक्षाही जास्त जवळचे होते. ११वीत जाईपर्यंत दरवर्षी मी ह्या नाटकात सक्रीय भाग घेत होतो. त्यानंतर शिंग फुटली म्हणा किंवा मनात संकोच निर्माण व्हायला लागला....कोणतेही कारण असो. मी ह्यातनं माझं अंग काढून घेतले.
(इथे बायमावशी पुराण संपले.)
हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'
प्रेषक विसुनाना ( शुक्र, ०६/२७/२००८ - १४:०८) .हैदराबाद येथील रंगधारा नाट्यसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ पोट्टी श्रीरामलु तेलुगु युनिव्हर्सिटीच्या एन्.टी. रामाराव कलामंदिरात दि. २२ जून २००८ रोजी संपन्न झाला. यावेळी 'राजकन्येची बाहुली' हे बालनाट्य आणि 'ओले,ओले, टीव्ही बोले' हे लघुनाट्य सादर करण्यात आले. दोन्ही बालनाट्ये अत्यंत उत्कृष्टरित्या सादर झाली. वेळोवेळी हशा आणि टाळ्या यांच्या गजराने प्रेक्षकांनी त्यांची पसंती जाहीर केली.
'राजकन्येची बाहुली' : एक दृष्टीक्षेप
महाराजा श्रीवल्लभ एक शक्तीशाली सम्राट.
त्याची एकुलती एक मुलगी प्रभावती एक आईविना पोरकी राजकन्या आहे. तिचं सारं भावविश्व तिच्या लाडक्या बाहुलीभोवती गुंफलेले आहे.
राजा श्रीवल्लभाचा शत्रू राजा विक्रम! श्रीवल्लभाकडून वेळोवेळी युद्धात हरल्यामुळे विक्रम राजा राजकन्या प्रभावतीला पळवून ठार करण्याचा कट रचतो आणि त्याचे दोन मारेकरी प्रभावतीला पकडण्यासाठी सोडतो. ही बातमी ऐकून चिंताक्रांत झालेला श्रीवल्लभ आपल्या प्रधानाला आणि सेनापतीला राजकन्येला शूर आणि विद्वान बनवण्याचा हुकूम देतो.
परंतु आपल्या बाहुलीशी खेळण्यात रममाण झालेली राजकन्या काहीही शिकण्यास नकार देते.
ना राजकारण!
ना लढाई!
ना संगीत!
ना इतिहास!
त्यावर श्रीवल्लभ ती बाहुली घनदाट जंगलात फेकून देण्याचा हुकूम देतो. बाहुलीसाठी वेडी झालेली राजकन्या राजवाड्यातून पळून जाते आणि जंगलात जाऊन बाहुली शोधून काढते.
ही बातमी कळालेले विक्रम राजाचे मारेकरी तिचा माग काढत जंगलात पोहोचतात.
घाबरलेली राजकन्या जंगलात सैरावैरा पळत सुटते.
जंगलात धोंड्या, पांड्या आणि रुपा ही तीन निडर आदिवासी भावंडे राजकन्येला भेटतात आणि तिच्याशी मैत्री करतात.
त्यांच्यामुळे ती आपल्या कोषातून बाहेर पडते आणि तीही धीट बनते. राजकन्या रूपाला आपला मुकुट आणि दागदागिने भेट म्हणून देते. रूपा आता जणू राजकन्याच भासू लागते.
इतक्यात मारेकरी पोचतात आणि राजकन्या समजून रुपालाच पकडतात.
प्रत्यक्ष मारेकरी समोर आल्यावर ही सर्व मुले मिळून त्यांना तोंड देतात.
परंतु त्यांची मात्रा चालत नाही. मारेकरी आपला डाव साधणार इतक्यात राजा श्रीवल्लभ आपल्या सेनेसह तेथे पोहोचतो आणि मारेकर्यांना अटक करतो.
राजा श्रीवल्लभ धोंड्या, पांड्या आणि रुपाला दत्तक घेऊन धोंड्याला राजा बनवण्याचा मनसुबा जाहीर करतो. पण धोंड्या त्याला नकार देतो. राजकन्याही राजाला सांगते, "मी मुलगी असले तरी शूर आहे. ही फेकून दिली मी बाहुली. आता मी सर्वांना दाखवून देईन की मी तुमच्यापेक्षाही शूर आणि हुशार आहे."
या बालनाट्यात अगदी पाच वर्षे वयापासून १३ वर्षे वयापर्यंतच्या लहानग्यांनी भाग घेतला. मुळात मराठी अस्खलितपणे न बोलू शकणारी ही मुले जेंव्हा रंगमंचावर आपल्या भूमिका साकारत होती तेंव्हा अगदी कसलेल्या कलाकारांचा आभास होत होता. या बालनाट्यात कोठेही कुजबुज्या (प्रॉम्प्टर) ची गरज लागली नाही.
स्त्रीशिक्षणाच्या ढोबळ विषयाबरोबरच 'कर्तव्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो' हा सूक्ष्म संदेशही या बालनाट्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. लेखक श्री. विजय शिंदे यांचे कसब असे की निखळ विनोदी आणि करमणूकप्रधान अशा या बालनाट्यात लपलेला संदेश देण्यासाठी कोठेही त्यांनी बटबटीत, प्रचारकी थाटाचे, लहान मुलांच्या तोंडी न शोभणारे संवाद वापरले नाहीत.
या बालनाट्याचे दिग्दर्शन श्री. विजय नाईक यांनी केले. शिबिराचे संकल्पक श्री. प्रकाश फडणीस यांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. शिबिर समन्वयक सौ. अर्चना फडके यांनी सर्व कलाकारांची काळजी घेतली. नेपथ्य आणि कपडेपट सौ. सुवर्णा नाईक यांनी तर पार्श्वसंगीत श्री. माधव चौसाळकर यांनी सांभाळले. प्रकाश योजना प्रा.श्री. भास्कर शेवाळकर यांची होती. विशेष म्हणजे सर्व बालकलाकारांनी शिबिरात या सर्व तांत्रिक बाबी समजावून घेऊन त्यात सहभागही घेतला होता.
या कार्यक्रमात रंगधारेचे अध्यक्ष, हैदराबाद युनिव्हर्सिटीचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भास्कर शेवाळकर यांच्या हस्ते बालनाट्य शिबिरात सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रंगधारेचे कार्यवाह श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अंदाजे तीनशे बैठकक्षमतेचे हे छोटेखानी नाट्यगृह पूर्ण भरले होते.
कलाकार नेहमीच्या वेषात प्रेक्षकांना अभिवादन करताना -
लोकाग्रहास्तव याच बालनाट्यांचे प्रयोग लवकरच करण्याचे रंगधारेने ठरवले आहे.
रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद निर्मित
बालनाट्य
राजकन्येची बाहुली
लेखन : श्री. विजय शिंदे
दिग्दर्शन : श्री. विजय नाईक
समन्वय : सौ. अर्चना फडके
संकल्पना : श्री. प्रकाश फडणीस
नेपथ्य आणि वेशभूषा : सौ. सुवर्णा नाईक आणि सौ.अर्चना फडके
प्रकाशयोजना : श्री. भास्कर शेवाळकर
संगीत : श्री. माधव चौसाळकर
विशेष साहाय्य : श्री. अनंत कुलकर्णी
भूमिका आणि कलावंत
(प्रवेशानुसार)
राजा श्रीवल्लभ : चि. चैतन्य ठाकुर
राजकन्या प्रभावती : कु. ऐश्वर्या गोखले
गायन शिक्षिका : कु. अक्षदा अवधुत
इतिहास शिक्षिका : कु. संपदा जोशी
सदर बालनाट्याचे चलच्चित्रण लवकरच जालावर उपलब्ध होईल.
अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य
प्रेषक विसुनाना ( मंगळ, ०६/१०/२००८ - ०३:१२) .हैदराबाद:
येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली". धमाल विनोदी असे हे बालनाट्य पूर्णपणे बालकलाकार सादर करत असून नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या बालनाट्याचे मराठी भाषेच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे यात संस्कृतप्रचुर मराठी बोलीबरोबरच ग्रामीण मराठी बोलीतीलही संवाद आहेत. केवळ स्मरणशक्ती आणि अभिनयक्षमतेच्या जोरावर सर्व बालकलाकार हे संवाद अस्खलितपणे म्हणू शकतात. इतकेच नव्हे तर त्यांचा शाब्दिक अर्थ आणि भावार्थही त्यांना पूर्ण समजू लागला आहे हे त्यांच्या सहज अभिनयातून स्पष्ट होते.
बालनाट्य प्रशिक्षणावेळी उपस्थित असणारे एक पुणे येथून आलेले पाहुणे प्रेक्षक उद्गारले की "अरे, मला तर पुण्यात असल्याचाच भास होत आहे. " यातच या शिबिराचे यश दिसते.
रविवार दि. २२ जून २००८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हैदराबाद येथील पोट्टी श्रीरामलू तेलुगू युनिव्हर्सिटीच्या नंदमूरी तारक (एन. टी.) रामाराव कलामंदिरात या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे. आपल्यापैकी कोणी जर हैदराबादमध्ये असतील तर त्यांनी (आपल्या बालगोपाळांसह) या प्रयोगाला अगत्याने उपस्थित राहावे आणि बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही आग्रहाची विनंती.
याच बालनाट्याचे येथील मराठी बालप्रेक्षकांच्यात मराठी भाषा आणि मराठी नाटक यांचे आकर्षण निर्माण करण्यासाठी आणखी प्रयोग सादर कऱण्याची 'रंगधारा' संस्थेची मनिषा आहे.
राजकन्येची बाहुली
लेखक : श्री. विजय शिंदे
कलाकारः चि. यश फडके, चि. आदित्य परळीकर, कु. सुगंधा जोशी, चि. चैतन्य ठाकूर, कु. पर्णवी फडके, कु. ऐश्वर्या गोखले, कु. अक्षदा अवधूत, कु.संपदा जोशी , चि. निखील नाईक, चि. ऋषभ सोमण, चि. सोहम चौसाळकर, कु. ईशा फडके, चि. अजित जोशी
प्रयोगाच्या अधिक माहितीसाठी श्री. प्रकाश फडणीस (हैदराबाद भ्रमणध्वनी ९९४८५ ८८५१२) यांच्याशी संपर्क साधावा.
(वि. सु. : मर्यादित आसनसंख्येमुळे रसिकांची होऊ शकणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा ही विनंती.)
नाणेपुराण
प्रेषक देवदत्त ( रवी, ०५/११/२००८ - १६:३९) .नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.
नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.
कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की , बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो 
बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.
तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.
इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.
अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले.
तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले 
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही 
गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.
असो, माझे नाणेपुराण एवढेच.
रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?
गावांची नावं
प्रेषक भोचक ( मंगळ, ०४/२९/२००८ - १९:२४) .काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती. तो अधिकारी त्यांना 'डिग बॉय, डिग बॉय' (खण अशा अर्थी) असे म्हणायचा. त्याचेच पुढे डिग्बॉय व दिग्बोई असे पडले. अशी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा.
थोडे असे, थोडे तसे
प्रेषक देवदत्त ( शुक्र, ०४/११/२००८ - २१:२९) .गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."
खरोखरच चांगला विचार.
तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा
) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या. आम्ही तुम्हाला वर ओढतो."
तो माणूस काही केल्या हात समोर करत नाही. लोक म्हणतात "काय झाले ह्याला?"
तेवढ्यात दुसरा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो," अरे हा माणूस एकदम कंजूस आहे. कोणाला काही देत नाही." आणि मग त्या माणसाकडे पाहून बोलतो,"अहो, माझा हात घ्या. त्याला धरून वर या".
लगेच तो (कंजूस) माणूस पुढे होऊन ह्याचा हात पकडतो.
वाटले, हात धरण्यावर थोडे लिहू. पण खूप विचार करूनही ते शब्दात बाहेर आले नाही. मग विचार केला, एकाच गोष्टीवरून दोन वेगळे विचार मनात येतात ते लिहूया. म्हणून हा प्रयत्न...
थोडे असे, थोडे तसे.
महाविद्यालयात असताना एका मित्राने पुढील सांगितले होते. आता कुत्र्या-मांजरांचे विचार त्याला कोणी सांगितले हे मी त्याला नाही विचारले, तुम्ही मला नका विचारू 
कुत्र्याला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा तो विचार करतो, "हा माणूस मला खायला देतोय. हा नक्कीच महान/देव आहे."
मांजरीला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा ती विचार करते, "हा माणूस मला खायला देतोय. म्हणजे मी नक्कीच कोणीतरी महान/देव आहे."
२/३ दिवसांपूर्वी 'स्टार माझा' पाहताना हे मनात आले.
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. आपण मॉल मध्येच जाऊन घेतले पाहिजे. आपले पैसे वाचतील.(सर्वसामान्यांचा विचार)
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. त्यांनी नक्कीच साठा करून ठेवला असेल. त्यांची चौकशी करायला पाहिजे. (सरकार आणि वृत्तवाहिन्यांचा विचार)
बघूया, आणखी काही असे विचार आठवतात का?
(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
बालपणीचा काळ सुखाचा! १२ बायमावशी! २
प्रेषक प्रमोद देव ( शुक्र, ०४/११/२००८ - ०९:२१) .चित्रपट जरी अडीच तीन तासात संपत असला तरी बायमावशींचे हे चित्रपट आख्यान चांगले आठवडाभर चालायचं. कारण त्यात इतरही उपकथानकं यायची. जमलेल्या आया-बायांच्या प्रतिक्रिया, मध्ये कुठे गाणी आली की ती म्हणण्याचा किंवा माझ्याकडून म्हणवून घेण्याचा असे कैक अन्य पदर असत.
"तुम्हाला सांगते... अमुक तमुकचे आई!" हे असेच एक पालुपद ह्या कहाणी दरम्यान यायचे. ज्या बाईने मध्येच शंका व्यक्त केली असलीच तर किंवा काही प्रतिक्रिया दिली असली तर तिला उद्देशून हे वाक्य फेकले जाई.
मोलकरीण कथा पुढे सुरू....
"तुम्हाला सांगते विद्याचे आई, तो जो लंगोटी वाला मुलगा असतो ना तो आता मोठा होतो. कालिजात जायला लागतो. तिथे त्याचे शीमा(सीमा) बरोबर प्रेम जुळते."
"एका गाण्यात ते पोर मोठे होते? लगेच कालिजात जाऊन पिरेम बी करते?"..... ह्या एक बोलण्यात फटकळ आणि मिस्किल बाई.
"अग्गो बाई! काय सांगू आता हिला? अगो,तीन तासाचा शिनेमा, त्यात काय त्या मुलाचे अख्खे बालपण दाखवणार काय? साधा संडासला जाऊन आलाय असे दाखवायचे तर धा मिन्टे जातील फुकट. बघताय ना आपल्या इथली पोरं! कुणी सरळ आपलं टीपरं उचललं आणि गेलं संडासमध्ये असे होते काय? ते टीपरं मिरवत मिरवत जातंय काय. मध्येच टीपरं बाजूला ठेवून पोरांच्यात खेळायला लागतंय काय! वगैरे वगैरे..(तिरकसपणाने बोलण्यात बायमावशींचा कुणी हात धरू शकत नसे.)
हां! तर मी काय सांगत होते?"
कुणी तरी मग ती.. रमेश देव कालिजात.... असे सुचवते.
मग कथा पुढे सुरू होते.
इतक्यात एक बाई आठवण करून देते.... "बायमावशी अहो ते प्रेम नंतर करतात. लगेच नाही काय. आधी तो डॅन्स आहे ना कोळणीचा."
लगेच बायमावशी..." अग्गोऽऽऽ बाऽऽऽई! राहिलंऽऽऽच की! नाऽय,नाऽय,नाऽऽय! थांबा थांबा हांऽऽ.(इथे सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे)आत्ता आठवलं! ते आधी सांगितलेलं ते प्रेम आता नाही हांऽऽ. ते नंतरऽऽ. तो शीन नंतर! आधी काय आऽस्ते ना की त्यांच्या कालिजात एक नाटक आस्ते."
"अहो नाटक नाही हो गॅदरिंग असते!"... दुसरी बाई.
"ते गॅद्रिंग की फॅद्रिंग काय असेल ते! असो. पण शीमा काय मस्त दिसते हो त्या कोळणीच्या वेशात! तुम्हाला सांगते शेखरच्या आई, नुस्ते बघऽऽतच बसाऽऽऽवे आसे वाट्ते.तिचा तो अंबोडा, त्यातली ती वेऽऽणी आणि मोठ्ठं कुंऽकू. आणि नाचते म्हणजे काऽऽय हो! अऽगदी बिजलीसारखी! इथे एक गाणं हाय... कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!
अवो नुस्ती नाचते नाऽय तर गाते पण काय सुरेऽऽख! एकदम गोऽड आवाज बघा!"
"अहो ती नाही गात! आशा भोसले गाते ते गाणे!"...तीच ती मघाची
"अग्गोऽऽऽ बाऽऽऽऽई! सांगतेऽऽऽस काऽऽय! मला मेलीला वाटले की शीमाच गाते! तरी म्हटलं नाच आणि गाणं एकदम जमते कसे हिला?"
बायमावशींचे हे 'अग्गो बाई' हे उच्चार दिवसातनं अनेक वेळा उच्चारले जात असतील. पण त्यातही वैविध्य जाणवायचे. म्हणजे त्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टीचे किती प्रमाणात आश्चर्य वाटले असेल त्या प्रमाणात ते उच्चार लांबत जात.
अशीच धक्के खात खात कथा पुढे जात असे. मग रदे-शीमा चे प्रेमप्रकरण, त्यावेळचे "हसले आधी कुणी" हे गाणे, मग लग्न, भटजींचा मृत्यू वगैरे थांबे घेत घेत गाडी सुलोचना मोलकरीण बनून रदे-शीमा च्या घरी येते तिथपर्यंत आली की मग शीमाचे बाळंतपण वगैरे कथानक उलगडता उलगडता एका गाण्यावर येऊन थडकत असे.
"तुम्हाला सांगते.... इथे ना एक शीन हाय. त्या शीमाच्या बाळाला झोपवायला सुलोचना एक गाणं गाते..
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला
काऽय सांगू? इतक्या गोड आवाजात गाते ना सुलोचना..."
"अहो,सुलोचना नाही ती. आशा भोसलेच गाते हे पण गाणे!"
"अंशे! हे पण गाणे तीच बया गाते? मग दिसली कशी नाय ती शीनमध्ये?"
"अहो ती पडद्याच्या मागून गाते आणि सुलोचना नुसते तोंड हालवते."
"काऽऽऽय तरीच सांगू नकोस! तू काऽऽऽय बघायला गेली होतीसऽऽऽऽ तिला पडद्याच्या मागे? आणि मलाऽऽ सांग... ती, कोण ती, तुझी आशा की बिशा?(इथे बायमावशींचे उपरोधिक बोलणे आणि त्यातला कोकणी खवचटपणा अगदी पराकोटीचा असायचा)एका वेळी किती टाकीजात जाऊन गाणार हाय?" प्रश्न तसा बिनतोड होता.
बाय मावशींचा गैरसमज झाला होता की आशा भोसले प्रत्यक्षपणे पडद्याच्या मागे बसून गाते त्यामुळे त्यांचे हे बोलणे ऐकून काही बायका तोंडावर पदर घेऊन फिदी फिदी हसायला लागल्या. मग माझ्या आईने त्यांना त्यातली गोम समजवून सांगितली आणि ती त्यांना पटली असे दिसले तरी त्या बाईवरचा राग काही केल्या शांत होईना.
"मला शिकवतेय! आगं, मी काय आजच शिनेमा बगतेय काय?"
थोडा वेळ असाच शांततेत जातो आणि मग हळूच कुणी तरी म्हणतं.. "ओ बायमावशी! रागावू नका हो. सांगा ना पुढची गोष्ट. आणि ते गाणं पण म्हणा ना."
इथे बायमावशीही जरा सावरलेल्या असतात. मग लगेच, " नाही बाई. मला नाही जमणार ते गाणं. त्यापेक्षा पम्यालाच बोलवा. तो चांगलं म्हणतो."
झालं. पुन्हा मला फर्मान सुटतं आणि मी खेळ अर्धाच टाकून येतो. काय करणार? आईची आज्ञा शिरसावंद्य होतीच पण गाणं म्हणायचा मला कधीच कंटाळा नसायचा. मग मी सुरू केले "देव जरी मज कधी भेटला...."
"कोण देव? रमेश देव? तू ही देवच की!" तेवढ्यात बायमावशींना विनोद सुचला आणि माझ्या सकट सगळेच हसत सुटलो.
हास्याचा भर ओसरल्यावर पुन्हा गाण्याची फर्माइश झाली आणि मी ते गाणं म्हणू लागलो.
ह्या गाण्यातल्या एकेक शब्दात इतका अर्थ भरलाय आणि ते आशाताईंनी इतके सुंदर गायलेय की काही विचारू नका.मी गाणं शिकलेलो नव्हतो तरी ऐकून ऐकून हुबेहूब गाऊ शकत असे. 'न'कलाकार असल्यामुळे एक आशाताईंचा आवाज सोडला तर त्या गाण्यातल्या भावना मी श्रोत्यांपर्यंत पूरेपूर पोचवू शकलो हे जाणवले. कारण, गाणं संपले तरी बराच वेळ सगळे शांत बसून होते. जणू सगळे त्या 'शीन' मध्येच अजून गुंतलेले होते.
बालपणीचा काळ सुखाचा! ११ ’बायमावशी!’१
प्रेषक प्रमोद देव ( बुध, ०४/०९/२००८ - ०९:५९) .आमच्या लहानपणी चाळीय(चाळपासून चाळीय) अथवा वाडीय(वाडीपासून वाडीय) वातावरण होते. अशा ह्या वातावरणात एखादे तरी सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असते. कुणी तरी काका, मामा, मावशी, आत्याबाई, आजी-आजोबा असे लोक प्रत्येक चाळीत नक्कीच सापडतील, नव्हे तशी व्यक्तिमत्त्व सापडायची. आमच्या वाडीत असेच एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते, ते 'बायमावशी ' ह्या नावाने ओळखले जाई. लहानथोर सगळेच त्यांना बायमावशी म्हणायचे. खरे तर त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या, पण माझ्या सारख्या लहान मुला-मुलींपासून ते अगदी काठी टेकत चालणारे आजी आजोबा देखिल त्यांना बायमावशी असेच म्हणत! आहे ना गंमत!
आमच्या वाडीच्या अगदी मध्यभागी एक गोलाकार चाळ होती. त्यातल्या एका बिर्हाडात बायमावशी आणि त्यांचे यजमान राहायचे. ह्या बायमावशींच्या यजमानांना सर्व वाडकर लोक काका म्हणत. आता ते ओघानेच आले म्हणा. बायको मावशी म्हणून नवरा काका. पण इथे अजून एक गंमत आहे. आम्ही लहान मुलं ह्या काकांचा उल्लेख आपापसात करताना अथवा त्यांच्याविषयी काही बोलायचे असेल तर 'बायमावशींचे काका ' असा करत असू.
असो.
बायमावशी-काका ह्या जोडप्याला मूल नव्हते त्यामुळे त्यांचे घर हे आम्हा समस्त वाडीतल्या मुलांसाठी हक्काचे विश्रांतिस्थान झालेले असायचे. काका नोकरीनिमित्त पहाटे पाचला घरातून जे बाहेर पडत ते संध्याकाळी सात-साडेसातला परतत. ह्या मधल्या काळात बायमावशींच्या घरावर जवळपास सर्व वाडीतल्या लहान मुलांचा आणि त्यांच्या आयांचा कब्जा असायचा. दोन खोल्यांच्या त्यांच्या घराची रचना अशी होती की त्यातून जवळपास सगळी वाडी दिसत असे. त्यांच्या घराचे दार आणि स्वयंपाक घराची खिडकी उत्तरेला होती. तिथून आमचे मोठे अंगण, आमची चाळ(ज्यात मी राहायचो) आणि त्याच्या शेवटाला संडास होते ते दिसायचे , तर एक मोठी खिडकी पूर्वेला होती जिच्यातून इतर घरं, मालकांची,बाग, बंगला आणि वाडीचे प्रवेशद्वार दिसत असे. म्हणजे वाडीतली एकूण एक हालचाल त्यांच्या त्या घरातून दिसत असे. अंगण, त्यात खेळणारी मुले, वाळत घातलेले कपडे, धान्य, पापड आणि वाडीतून आत-बाहेर करणारी माणसे, झाडं,पशू-पक्षी वगैरे सगळे हे असे एका नजरेत दिसत असे. त्यामुळे बायमावशींकडे सगळ्या वाडीची खबर असायची.
बायमावशी बोलायला,वागायला मिठ्ठास होत्या. तशा त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे बोलण्यात एक प्रकारचा हेऽऽल आणि गोडवा असायचा.
नवर्याला काहीही सांगायचे झाले की म्हणायच्या, "ऐकलाऽऽऽत!"
इतके म्हटले की पुरे असायचे. कारण काका तसे त्यांना घाबरून असत. काका बायमावशींसमोर कधीच बोलत नसत. त्या म्हणतील ती पूर्व असायची. त्यामुळे त्यांनी नुसते, "ऐकलाऽऽऽत" म्हटले की काका धडपडत त्यांच्याजवळ जाऊन अगदी आज्ञाधारक मुलासारखे उभे राहायचे. काका फारसे कधी बोलत नसत. क्वचित प्रसंगी बोलले तर लक्षात येत असे तो त्यांचा अतिशय धीरगंभीर आणि घुमणारा खर्जातला आवाज! बायमावशी घरात नसल्या तर (बाजारहाट वगैरे साठी बाहेर जात) ते आम्हा मुलांशी बोलण्याची आणि त्यातल्याच एखाद्याची थट्टा करण्याची संधी साधत असत. पण क्वचितच बोलण्याचा प्रसंग येत असल्यामुळे ते बोलताना खूप अडखळत असत. मग त्यांनी आमची थट्टा करण्याऐवजी आम्हीच त्यांच्या त्या अडखळत बोलण्याला हसत असू.
तसे काका हट्टी होते. त्यांना सिगारेट प्यायची सवय होती पण तीही त्यांना बायमावशींच्या समोर ओढण्याची हिंमत नसायची. मग त्या घरात नाही असे पाहून ते मला हळूच शुक-शुक करून बोलवायचे आणि सिगारेट आणायला पाठवायचे. येताना त्यातल्याच उरलेल्या पैशाच्या गोळ्या आणायची मला सूट असायची. खरे तर त्यांचे काम करावे म्हणून ही लालूच असायची, म्हणून आम्ही मुलेही बायमावशींची, घरातून बाहेर जाण्याची वाट पाहत असायचो.
बायमावशींच्या समोर दबकून वागण्याच्या ह्या काकांच्या स्वभावामुळे त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू होता. काकांनी कमावून आणायचे आणि बायमावशींनी त्यात अगदी व्यवस्थित भागवायचे असा जणू अलिखित करारच त्या दोघांच्यात असावा. तशी काकांची नोकरी खास नव्हती आणि त्यांना पगारही जेमतेमच होता. पण बायमावशींच्या कुशल व्यवस्थापनामुळे त्यातही त्यांचे भागत असे. कधी कुणाकडे त्यांनी हात पसरलेले मी तरी पाहिले नाही.
बायमावशींच्या बोलण्यातले खास शब्द सांगायचे तर, " गो बाय माऽऽझे!, अग्गोऽऽ बाऽऽऽई, मेल्यांऽऽऽनो, सांगता काऽऽऽऽयऽऽ, अंऽऽशेऽऽ!" वगैरे वगैरे. हे शब्द प्रत्येक संभाषणात येणारच. ह्या शब्दांबरोबरच चेहर्यावरचे भावही अगदी पाहण्यासारखे असत. तशा त्या काही खास सुंदर म्हणाव्या अशा नव्हत्या पण कुरुपही नव्हत्या. पण चेहरा विलक्षण बोलका होता. जेमतेम पाच फुटापर्यंतची उंची, काळा-सावळा वर्ण, नाकी-डोळी नीटस, थोडेसे कुरळे केस, केसांचा छोटासा अंबाडा आणि त्यात कधी अबोली किंवा मोगर्याची वेणी तर कधी गुलाबाचे फूल तर कधी घसघशीत गजरा असा साधारण त्यांचा रुबाब असायचा.
दिवसभर आम्ही लहान मुलं त्यांच्या घरात आत-बाहेर करत असायचो. त्या मोकळ्या असायच्या तेव्हा मग आमच्याशी त्यांचा संवाद चालायचा. त्यात, आज घरी जेवायला काय होते पासून ते आज शाळेत काय शिकवले, झालंच तर, एकमेकांच्या चहाड्या सांगणे, अशा नानाविध गोष्टी आम्ही त्यांना सांगायचो आणि त्याही तितक्याच औत्सुक्याने त्या ऐकून आम्हाला प्रतिसाद देत. मग त्यांना आपली गोष्ट सांगण्यात आमच्यात अहमहमिका लागायची. पण त्याही, एकावेळी सगळ्यांचे ऐकून घेताना कधी रागावल्याचे, चिडल्याचे आम्हाला दिसले नाही. फारच कालवा झाला तर त्या सगळ्यांना शांत करत, हातावर काही तरी खाऊ देत आणि मग एकेकाला त्याची गोष्ट सांगायला सांगत. इथे आमची तोंडे खाण्यात गुंतलेली असल्यामुळे ज्याला विचारलेय तोच बोलायचा आणि त्यामुळे प्रत्येकाला बोलायची संधी मिळायची.
दुपारची जेवणं-खाणं आटोपली की मग त्यांच्या घरात बायकांचा दरबार भरायचा. आम्हा मुलांच्या आया ताटात तांदूळ,गहू किंवा जे काही निवडायचे असेल ते घेऊन तिथे हजर व्हायच्या आणि मग त्यांच्या गप्पा सुरू व्हायच्या. कुणी भरतकाम, विणकाम किंवा काही शिवणकाम घेऊन येऊन बसायच्या. आता बायकांच्या गप्पांचे विषय काय हे सांगायची जरूर आहे काय? एकातून एक असे विषय बदलत चहाच्या वेळेपर्यंत ह्या गप्पा चालत. ह्या गप्पांव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम इथे अधून मधून चालायचा तो म्हणजे आपण पाहिलेल्या, नवीन चित्रपटाची कहाणी सांगणे. एकीने सांगायचे आणि इतरांनी त्यावर भाष्य करत करत ऐकायचे असा सगळा मामला असायचा. पण ह्या चित्रपट कहाणी कथनामध्ये बायमावशींचा कुणीच हात धरू शकत नसे. त्यांचे त्यावेळचे हावभाव,शब्दोच्चार आणि कहाणी सांगण्याची धाटणी ही एखाद्या तरबेज कीर्तनकाराइतकी आकर्षक होती.
बायमावशी कथा सांगायच्या त्याची ही एक छोटीशी झलक पाहा..... उदाहरण म्हणून आपण मोलकरीण चित्रपटाची कथा घेऊ या.
"हां! तर काय माहीतेय काऽऽय? ती आपली... कोण ती हो? हां! आठवलं बघा! सुलोचना! काय वो ती दिसते? खरंच! अगदी सोज्वळ बाई बघा! आणि तिचा तो नवरा! काऽऽऽय बरंऽऽऽऽ त्याचं नाऽऽऽऽऽव? जाऊ द्या. आता आठवत नाय! मग आठवलं की सांगते हां.
हां, तर, तो नवरा देवळातला भटजी असतो. कीर्तन तर इतके मस्त करतोऽऽऽऽ की काय सांगू? बाय माऽऽऽऽझे! अवो लोकं नुसती डोलतात त्याच्या कीर्तनात. तर पैला शीन देवळाचा हाय(बायमावशींची भाषा म्हणजे अर्धी कोकणी अर्धी मराठी. त्यामुळे हाय,नाय सारखे उच्चार भरपूर). तर ते भटजी रामायणातली कथा सांगताहेत हां. राम वनवासाला गेलाय आणि इथे दशरथ त्याची आठवण काढून काढून रडतोय. इथे बघा एक गाणं हाये... (बायमावशी गुणगुणून दाखवतात). हे श्रीरामा,हे श्रीरामा, एक आऽऽस मज एक विसाऽऽवा, एक वाऽऽर तरी राऽऽम दिसाऽऽऽवा... तुम्हाला सांगते विद्याचे आई(माझ्या आईला उद्देशून), अवो तो भटजीचा लहान मुल्गा, ढुंगणाला लंगोटी लावलेला(मोठा झाल्यावर हाच रमेश देव होतो हां ), हे गाणं म्हणत म्हणत येतो.
ओ विद्याचे आई! तुमच्या पम्याला(म्हणजे मला) बोलवा की. त्याला येते हे गाणे. त्या पोरासारखेच रंगून म्हणतो. ते गाणं किती हो करुण आहे नाही? किती आर्ततेने गाय
