झोपडपट्टीतले दिवस: भाग एक
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग.