Skip to main content

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 22/10/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्‍या बाया, दोन-तीन बकर्‍या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्‍या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता. वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्‍यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्‍यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते. ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस. क्रमशः (सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५) झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

वाचने 72212
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच,
वाचून वाईट वाटले.पण पुढे सगळं चांगलं झालं असणार. सुरवात छान झालीये .पुलेशु.

जुन्या आठवणी जाग्या केल्यात जोकरसाहेबानु... वयाची बावीस वर्षे. तिथली विहिर, नंतर प्यायच्या पाण्याचे नळ आल्यावर तिथे तासनतास रांग लावल्यावर मिळणारं एक हंडा आणी कळशीभर पाणी... गल्लीबोळातुन क्रिकेट आणी गोट्या खेळणारा मी. आता तिथे राहत नसलो तरी घर अजुनही आहे तिथेच. नगरसेवक क्रुपेने गल्ल्या काँक्रीट्च्या झाल्यात आता. गटारांवर झाकणं आलीयेत... :-) पुढील लेखनास शुभेच्छा!!

वा. सुरेख प्रंजळ लेखन. पुढील जीवनाचा सर्व प्रवास लिहावा, ही विनंती. फार वर्षांपूर्वी भाऊ पाध्यांचा 'वासूनाका' फार फेमस झाला होता. तसले काही प्रसंग/लोक ?

In reply to by चित्रगुप्त

वासुनाका हे झोपडपट्टी वरचे नव्हे तर कनिष्ठ वर्गातील चाळीतील जगण्यावर आधारित होते. ज्या पुस्तकाशी मी पूर्ण रिलेट झालो असे बहुधा एकमेव पुस्तक. लहानपणी पाहिलेल्या अनेक व्यक्तींबद्दल पुन्हा विचार करायला लावला त्या पुस्तकाने. चक्र ही झोपडपट्टी वरील कादंबरी होती. झोपडपट्टी मध्ये देखील अनेक स्तर असतात. शिवाय काही लोक जुन्या वाड्या वस्त्यानाही (उदा. कोळीवाडे) झोपडपट्टीत टाकतात. पण प्रत्येक ठिकाणाचे जगणे बर्यापैकी वेगळे असते असे वाटत. जोकर हे चक्र सारख्या नव्हेत तर कनिष्ठ मध्यम वर्गीय झोपडपट्टीत राहत असावेत असे एकूण वर्णनावरून वाटते. लेख जमलाय. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

निराच झकास न हो!!, वाच्याले काही अलग भेटले का आनंद होते बेज्या! लौकर येऊ देसान पुढला भाग! लेट नोका करसान! :)

अशा परिस्थितीवरचं लेखन बहुधा अंगावर येणारं असतं. तशा शैलीचा मोह टाळल्याबद्दल धन्यवाद. अधेमध्ये एक-दोन प्रसंग व संवाद टाकल्यास लेखन अधिक उठावदार होईल असे सुचवतो. बाकी सुरुवात मस्त.

मस्त लिहिलयं! आवडलं! पुभाप्र!

वाचतोय पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

छान सुरुवात. आमच्यासाठी हे जग वेगळे आहे, की जिथे रहायची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. लिहा आरामात!

भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. हे आवडले. अशी वस्ती बघीतलेली आहे. मित्रांसोबत राहीलेलो आहे. एक शंका आहे.पहील्या दोन परीच्छेदा नंतर लिखाण आवरते घेतल्यासारखे वाटले.

In reply to by रामदास

"भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला." मोकळेपणाने लिहिते व्हा! -रंगा

In reply to by रामदास

मी स्वत: बधवार पार्कच्या समोर असलेल्या कोळिवाड्यात २००४ आणि २००५ साली राहिलो आहे.ज्या ठिकानाहुण कसाब आला तिथेच पहिली खोली माझी होती.१० बाय ९ ची सिंगल रूम. पण बाहेर मोठी मोकळी जागा आणि समोर समुद्र. मालक खाली रहायचा. बाहेरच्या जागेत पत्त्याचा क्लब चालायचा. मी त्याकाळात कधीच घराला कुलुप लावलें नाही. ते लोक घरातून पानी न्यायचे ,कुणी आराम करायचे. सणवार अगदी जोरदार साजरे व्हायचे. भांडण तंटेही अफ़लातून असायचे. पण मानुसकीला जागणारे असे लोक मला नाही सापडले. मी नंतर लालबाग, गिरगावला बरीच वर्षे काढली पण तिथेही अनेक पांढरपेशे स्वार्थी आणि अप्पलपोटे पाहिले. मी माझ्या जीवनातील ती २ वर्षे सुवर्णकाळ मानतो. मी आजही त्याबाजुला कधी गेलो तर कोळिवाड्यात जातोच जातो. तुम्ही बिनधास्त लिहा जे आणि जसे घडले तसे.

In reply to by विलासराव

विलासराव, कोळीवाडा म्हणजे झोपडपट्टी नव्हे. मात्र तुमचा आशय ध्यानी आला. :-) आ.न., -गा.पै.

सुंदर लिखाणशैली ! लेखन जरा आटपते घेत लिहीले आहे. अजून वाचायला नक्कीच आवडेल. पुभाप्र.

भेष्ट लिवलय. मस्तच. पुल्ड्या भगाले ज्यास्त टायीम लौ नगा. लवकर यु द्या.

खुप छान लिहिलय. माझे बालपण खेड्यात गेले पण रेल्वे च्या अतिक्रमण केलेल्या जागेत काका मावशी कडे जायचो कधी कधी. हे सर्व वाचून सर्व आठवणी जाग्या झाल्या. कुणी काहीही म्हणा पण खरी माणुसकी ही झोपडपट्टीतच अनुभवायला मिळाली.

नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.
सगळ्यांकडे स्वतःचे विज कनेक्शन आले, तर वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी तुमच्या घरचे फ्युज कसे उडायला लागले,, तुम्ही धंदा बंद केला. नक्की कशामुळे? घटना नेमकी कोणत्या शहरातील व कीती वर्षापुर्वीची आहे?

In reply to by मार्मिक गोडसे

मला वाटते की ते असे असणार: नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. नाहीतरी वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. म्हणून शेवटी तो धंदा आम्ही बंद केला. लेख छान आहे. पण शेवटी शेवटी गुंडाळल्यासारखा वाटला. काही काळ झोपडपट्ट्यांत फिरावे लागले होते. त्यामुळे जवळीक वाटली. आणखी सविस्तर येऊं दे.

In reply to by राही

राही, आपण बरोबर बोललात. इथे धंदा हा शब्द 'नसते उपद्व्याप' ह्या अर्थी घेतला आहे. हे पुढील भागांमधे कळून येइलच.

धारावीच्या झोपडपट्ट्यांना विजपुरवठा देण्याचे सरकारने मान्य केल्याचे आठवते आहे.

खुप छान जोकर साहेब. पुढचा भाग वाचायला आवडेल. मी पण असे झोपडपट्टीतले जगणे अनुभवलय. आता बाहेर राहतोय एकटाच पण आई वडील तिथेच आहेत अजुन.

लेखन जबरा, वर म्हणतात त्याप्रमाणे अपेक्षा वाढवल्यात तुम्ही. आशेच आजून येउंद्यात.

तितक्याश्या छान न वाटणा-या भूतकाळाबद्दल खूपच छान लिहिताय.. शेवटी आवरतं घेतलंत; पण क्रमश: वाचून बरं वाटलं. येऊद्यात अजून. राहिला भाग अनुभवांचा, तर चांगले वाईट कसेही असले तरी अनुभव हेच आपल्याला समृद्ध करतात. वर पैलवान, भिंगरी यांनी म्हटल्याप्रमाने वेचलेल्या गोव-यांतून नंदनवन फुललेलंच असेल, अजून फुलेल. शुभेच्छा.

खणखणीत आणि दणदणीत... पुढील भागाच्या प्रतीक्षेत

पण ह्या अशाच लोकांमुळे आमची मुंबई आणि इतर शहरं घाण झाली. उच्चभॄ सोडा, पण मध्यमवर्गीय माणसांनाही रहायची मारामारी झाली. फुकट सरकारच्या जमीनी लाटून आणि रिसोर्सेसवर अशक्य ताण आणल्यामुळे बकालपणात अजूनच भर पडली. प्रशस्त नाही पण हजार बाराशे फूट????? इतक्या जागेत मुंबईत महाल बांधतात लोक. सुरुवातीस जमत नसताना झोपडी बांधली पण नंतरही ती सोडू नये ह्यातच मानसिकतेच अंदाज येतो. बळकावलेल्या जागेत बोरवेल मारून पाणी विकणे, एक कनेक्षन वरून ५०-६० घरांत वीज विकणे हे असले प्रकार चालतात म्हणून झोपडपट्टीत राहणार्‍यांबद्दल अजिबात कणव वाटत नाही. आम्ही घास घास घासून कायद्याने रहायचे आणि हे सरकारी जावई सगळं फुकट ओरपतात.

In reply to by आदिजोशी

बळकावलेल्या जागेत बोरवेल मारून पाणी विकणे, एक कनेक्षन वरून ५०-६० घरांत वीज विकणे हे असले प्रकार चालतात म्हणून झोपडपट्टीत राहणार्‍यांबद्दल अजिबात कणव वाटत नाही. आम्ही घास घास घासून कायद्याने रहायचे आणि हे सरकारी जावई सगळं फुकट ओरपतात
. +१११११११११११११११११११११११११११११

In reply to by आदिजोशी

लेख आणि प्रांजळ निवेदन आवडलं असलं तरी त्यामधल्या अवैध गोष्टी आवडलेल्या नाहित. आदिजोशींशी ह्याबाबतीत सहमत.

तजो त्या वेळच्या गरिबीतुन आज तुम्ही वर आलात याबद्दल तुमचे अभिनंदन. वर लिहिल्याप्रमाणे अ‍ॅड्याचा प्रतिसाद सुद्धा पटतो आहेच. यात काही अपरिहार्यता असेलही पण एरवी याच गोष्टीवरुन लोक साधारणपणे बोंबाबोंब करतात ना? पण तुमच्या दृष्टीकोनातुन सगळी परिस्थिती बघितल्यावर कदाचित मतपरिवर्तन होइलही. त्यामुळे तुम्ही लिहाच. एकतर तुम्ही लिहिता प्रवाही भाषेत शिवाय तुमचे अनुभव आमचेही विश्व समृद्ध करुन जाइल. पुलेशु.

In reply to by shvinayakruti

तुम्हाला असहमत होण्याचा पुर्ण अधिकार आहे, पण का ते सांगा की. आदी जोशी यांनी मांडलेल्या गोष्टीमधे कोणतीही आतिशयोक्ती नाही.

गरिबीतून दिवस काढून वर आलात हि चांगलीच गोष्ट आहे . अजुनी वर चढत राहा . पण अवैध झोपडपट्टीतून वीज चोरी आणि पाणी विक्री इत्यादी गोष्टींसाठी सहानुभूती नाहीच कधी वाटली . असो . पुढल्या लेखाला शुभेच्छा

वरील काही झोपड़पट्टी म्हणजे सांगतो वगैरे प्रतिसाद एक वेगळा दृष्टिकोण सांगतात अन लेखन हे वेगळ्या दृष्टिकोणातुन केलेले आहे दोन्ही आपापल्या जागी जस्टीफ़ाइड वाटतात तरीही डेविड बेले हा प्रसिद्ध परकॉर आर्टिस्ट असलेल्या बॅरीयर १३ ह्या फ्रेंच सिनेमातले एक वाक्य फार भारी आवडते "द सोसाइटी वांट्स अस एक्सलुडेड एंड सेक्लूडेड, फाइन!! वे हॅव आवर ओन, टफ एंड स्ट्रांग, इट्स गुड फॉर अस" (गावच्या बॅरियर १३ मधला बार मालक) नाना स्कॉच

मला वाटते आपण तजो ह्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या बाजुने वाकणे कमी करून ते लिहितायत तितका लेखनाचा आनंद घेऊ, तो अनुभव त्यांचा आहे/नाहीये त्यांची पूर्वीची मते अन लेखन ह्याच्याबद्दल इथे बोलण्यात काही पॉइंट दिसत नाही, प्रत्येक लेखन जर वेगवेगळ्या विषयावर असेल तर बरेच वेळी लेखक असला तरी माइंडसेट ऑफ़ रेफेरेंस वेगळा असतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पु- लोक वीज चोरुन विकणे अश्या गोष्टींवर कॉमेंट करत आहेत , आणि त्या कॉमेंट थेट तजोंना लागू होत आहेत असे वाटल्या मुळे मी ते लिहीले. मला तर तो लेख वाचल्यावर थोडासा उपहासात्मक व्यंग पद्धतीचा लेख आहे अशी मनापासुन समजुत झाली होती. जणु तजोंना झोपड्या कश्या उभ्या रहातात आणि तिथे कसे गैरप्रकार चालतात हे लिहायचे होते.

दी जोशी तुम्ही म्हणताय ते पण काही अंशी बरोबर आहे की या झोपडयांमुळे शहरांची सुंदरता खराब होते. पण या लोकांना पण मजा वाटत नाही तस राहयला. हे सगळे खेड्यापाड्यात कामधंदा नसल्यामुळे पोटापाण्यासाठी शहरात आलेली लोक आहेत. त्यांना नाइलाजाने तिथे राहावे लागते. पण विज चोरी करून विकणे चुकीचे आहे.

In reply to by shvinayakruti

वीजचोरी फक्त झोपडपट्टीतले लोकच करत नसून चोरीच्या विजेवर मोठमोठे कारखाने चालवले जात असतात, खेरीज ही मंडळी प्राप्तिकर वगैरे भरत नाहीत ते वेगळेच. माझ्या माहितीतील एकाचा दिल्लीत मोठा ऑफसेट छापखाना आहे. अलिशान बंगला, मोठमोठ्या गाड्या, नोकर-चाकर असलेला हा माणूस रात्री विजेच्या मीटरवर खास बनवून घेतलेले लोहचुंबक ठेवतो, त्यामुळे रात्रभर चालणारे एसी, कारखान्यातील यंत्रे वगैरे सर्व फुकट विजेवर. बंगल्याच्या दर्शनी भागात देवादिकांचे, साईबाबादिकांचे मोठमोठे फोटो, साईसंध्या व तत्सम तथाकथित धार्मिक कार्यक्रम दणक्यात लाऊडस्पीकर लावून करणे... यातून आपण किती सज्जन, धार्मिक आहोत, याची जाहिरात करणे... असे कितिएक लोक आपल्या बघण्यात असतात.

In reply to by चित्रगुप्त

"त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारले" अशा तर्हेचे हे समर्थन आहे आणी अर्थातच ते लंगडं आहे. जो कोणी वीज चोरी करतो ते चूक आणी बेकायदेशीरच आहे. जगरहाटी अशी आहे कि छोट्या चोराला फाशी दिली जाते आणी मोठ्या चोराला सलाम केला जातो. पण म्हणून चोरीचे समर्थन करणे चूकच आहे.

ो. जोकर भाऊंचे आधीचे प्रतिसाद पाहुन हे लेखन म्हणजे त्यांचा अनुभव आहे अस वाटल नव्हत. पण जर हा तयांचा खरा अनुभव असेल तर तयांच्या बद्दल मनात नितांत आदर निर्माण होईल.