शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (50 अंश उत्तरेवरील मिपाकरांसाठी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
20 Mar 2025 - 2:36 pm

शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (Wonderful dual visibility of Venus!)

नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की, शुक्र पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा (an evening star or a morning star) म्हणून ओळखला जातो. कारण तो एक तर पहाटे दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. पण ही स्थिती एकदा एकच असते. जर शुक्र संध्याकाळी सूर्यानंतर मावळत असेल, म्हणजे संध्याकाळी दिसत असेल, तर सकाळी सूर्य शुक्राच्या आधी उगवेल व त्यामुळे शुक्र पहाटे दिसू शकणार नाही. आणि जर शुक्र सूर्याच्या पूर्वेला असेल, तर फक्त तो पहाटेच दिसेल.

पण एका दुर्मिळ स्थितीमध्ये शुक्र दोन वेळेस दिसू शकतो. एकाच दिवशी तो पहाटे व संध्याकाळीही दिसू शकतो! हो, तुम्ही बरोबर वाचलंत! दुर्मिळ स्थितीत हे घडतं व हे आज 20 मार्च व उद्या 21 मार्चला घडत आहे. त्याचं कारण म्हणजे सध्या शुक्राची सूर्यासोबतची अंतर्युती (inferior solar conjunction) आहे. म्हणजेच शुक्र हा सध्या पृथ्वी व सूर्याच्या मधोमध आहे. तो आतील बाजूने सूर्याला ओलांडतो आहे व सूर्याच्या पूर्वेला जातो आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संध्याकाळी दिसणारा शुक्र सध्या सूर्याजवळून पूर्वेला दिसत आहे. त्यामुळे तो सध्या दिसत नाही व दोन आठवड्यांनी तो पहाटे दिसायला लागेल. परंतु तो काही ठिकाणांवरून सध्या दोन वेळेस दिसतो आहे!

(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल.)

हे थोडं समजून घेऊ! सध्या शुक्र सूर्याच्या जवळ आहे. तो सूर्याच्या सुमारे 7 अंश उत्तरेला आहे. म्हणजे तो सूर्याच्या पूर्वेला किंवा पश्चिमेला नाहीय तर अगदी उत्तरेला आहे! आणि भूगोलात आपण शिकलो आहे की, पृथ्वीच्या अति उत्तरेकडील भागांमधून सूर्य आकाशात जास्त वर गेलेला दिसत नाही. किंबहुना हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तर सूर्य अति उत्तरेकडील भागांमधून जेमतेम दिसू शकतो. आपण जसे ध्रुवीय भागाकडे जातो, तसा सूर्य फक्त सहा महिने दिसतो व तोही क्षितिजाजवळ. आज 20 मार्च आहे व हा वसंत संपातसुद्धा आहे (vernal equinox). म्हणजेच रात्र व दिवस समान असतील.

त्यामुळे जर आपण 50 अंश उत्तर (साधारणत: लंडन, उत्तर युरोप, कॅनडा, उत्तर रशिया ह्यांचे अक्षवृत्त) अशा अक्षवृत्तावरून निरीक्षण केलं तर शुक्र पहाटे आणि संध्याकाळीही थोडा वेळ दिसू शकेल. कारण, शुक्र सूर्यापासून 7 अंश उत्तरेला आहे व 50 अंश उत्तर भागांमध्ये ह्याचा अर्थ होतो की, तो आकाशात सूर्यापेक्षा जास्त काळ राहील. कारण सूर्य शुक्राच्या 7 अंश दक्षिणेला आहे. त्यामुळे अशा उत्तर अक्षांशावरून शुक्र पहाटेही व संध्याकाळीही क्षितिजावर असेल. ह्या भागांमध्ये व ह्या दिवसांमध्ये सूर्य उत्तर- पूर्वेला उगवतो, हळु हळु 20 अंश उत्तरेला पोहचतो व परत खाली येतो. अगदी आपल्याकडे अगस्त्य (Canopus) किंवा अग्रनद (Achernar) तारे दिसतात, तसाच! Stellarium app च्या स्क्रीनशॉटमध्ये शुक्र पहाटे व संध्याकाळीही क्षितिजावर दिसतो आहे!

म्हणून, 50 अंश किंवा अधिक उत्तरेला असलेले तुमचे मित्र किंवा नातेवाईक शुक्र सूर्योदयाच्या आधी काही मिनिटे व सूर्यास्तानंतरही काही मिनिटे बघू शकतात! ही दुर्मिळ घटना आहे व नंतर ती परत 2033 मध्ये घडेल! असे होण्याचे कारण शुक्राच्या कक्षेतील सूक्ष्म असमानता, हा आहे. 22 मार्चनंतर शुक्र सूर्याच्या पूर्वेला जाईल व 10 दिवसांनंतर पहाटे बघता येईल. आणि ह्या टप्प्यानंतर तो अतिशय तेजस्वी दिसेल. 16 एप्रिलच्या सुमारास शुक्र अतिशय तेजस्वी असेल व त्या दिवसांमध्ये तो दिवसाही स्पष्ट बघता येऊ शकेल. आपल्याला फक्त त्याची आकाशातली जागा लक्षात ठेवावी लागेल व अगदी त्या बिंदूकडे नजर न्यावी लागेल. टेलिस्कोपची गरज नाही! कारण शेवटी आपल्या आकाशातला शुक्र तिसरा सर्वांत तेजस्वी ऑब्जेक्ट आहे!

(हा लेख इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्रे. लेख लिहील्याचा दिनांक: 20 मार्च 2025)

तंत्रभूगोललेखबातमी