मराठी मालिकांची लेखनकृती

वनफॉरटॅन's picture
वनफॉरटॅन in जनातलं, मनातलं
20 Feb 2018 - 3:57 pm

पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.
२. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर३. त्यातही आजकाल 'युवा' ह्या भंपक वर्गाची निर्मिती जी झाली आहे ती ह्यात येत नाही. त्या वर्गाला अनुसरून एक भारदस्त आडनाव४ घ्यावं.

साहित्य:
एक भारदस्त आडनाव. एक घर. घर हे लक्ष्य रसिकवर्गावर अवलंबून आहे. मोठ्ठा वाडा, मोठ्ठं बैठं घर आणि डायरेक्ट बीडीडी छाप चाळ. हे अनुक्रमे नॉमुंपु, मुंपु, मुंममव ह्यांसाठी. एक अति अति अति आज्ञाधारक हिरोईण५ निवडावी. हिरोईण कशीही चालेल. सावळी असेल तर कथा अजून फुलवायची संधी मिळते. हिरो मात्र गोराच्च बघून घ्यावा. हिरोही बऱ्यापैकी आज्ञाधारक असावा.
एक ऑप्टिमस प्राईम आजी/आजोबा. हे न्यायदेवतेसाठी. हे गोग्गोडच असले पाहिजेत.६ त्यांची मुले, म्हणजे डार्थ व्हेडर सासूबाई. सहाय्यक कलाकार म्हणजे हिरोईणीचे आईवडील, सासूबाईंची इतर मुले, शेजारी७ इत्यादी. एकदम बालकलाकार चवीपुरते. संध्याकाळच्या अर्ध्यातासाचा टाईमस्लॉट. एक मराठी वाहिनी. एक टायटल ट्रॅक, जे सगळ्या रसांत वाजवता यावं. (रौद्र/भीषण ते करूण/शृंगार पर्यंत.)

कृती:
कधीही हीरोईणीपासूनच सुरुवात करावी. तिला आणि हीरोला पुराणातील कॉम्प्लिमेंटरी, मॉडर्न टच असलेली नावं८ द्यावीत. त्यांची पार्श्वभूमी २-३ एपिसोडांत आटपावी. त्यांना पद्धतशीरपणे भेटवावं. पहिल्यांदा त्यांच्यात प्रेमबीम वगैरे होऊ देऊ नये. त्यांच्या भेटीगाठी होऊ देत रहाव्यात. मध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी, सहकारी इत्यादींकडून सारखं प्रेम प्रेमचा जप करवून घ्यावा. फायनली हिरोलाच पहिली स्टेप घ्यायला लावावं आणि हिरोईणीने ३ एपिसोड आढेवेढे घेऊन होकार द्यावा. इथे तुमच्या वाचनातील वाक्ये टाकायचा बर्राच स्कोप आहे.
लग्नाला उगीच विरोध दाखवावा. इथे व्हिलन/व्हिलनीण९ छान प्रस्थापित करता येते. ती सासू, नणंद, हिरोची मैत्रीण अशी. पुरूष जनरली नसावेत व्हिलन. ह्या सर्वांमुळे लग्न अगदी होतच नाही अशी खात्री करवून देऊन मग एकाएकी हिरोहिरवीणीचं पुनर्मीलन दाखवावं. पटकन लग्न ठरवून मोकळं व्हावं.
घर कसंही असलं तरी लग्न फुल्लॉन करावं. ह्या महाएपिसोडची जाहिरात कर-कर-करावी. लग्नात सगळं विधीवत आणि सगळ्यांच्या अंगावर भारी कपडे-दागिने असावेत. मुलीने सासरी जायच्या एका एपिसोडात वडिलांनी भाव खाऊन घ्यावा.
मुलगी सासरी गेली की खरंतर काम संपलं. आता इथे तुमची सर्जनशीलता१० दाखवावी. हिरोइण ज्यू असल्यागत छळ कर-कर-करावा. ह्या ह्या घराण्यात११ हे चालवून घेतलं जाणार नाही/आजपर्यंत झालं नाही/खपवून घेतलं जाणार नाही हे संवाद दर एपिसोडला ३-४ टाकावेत. हिरोईण 'टायटॅनिकफोड आइसबर्ग ची मानवी आवृत्ती' दाखवावी. हिरोचं तोंड बंद करण्यात यावं किंवा हिरोईणीच्या विरुद्धच वापरलं जावं.
हे चांगलं अडीच तीन वर्षं करत रहावं.
नवीन१२ लेखक/लेखिका आले की गाशा गुंडाळता घ्यावा. सगळ्या व्हिलनगणाचा नायनाट एकेका एपिसोडात आटपावा. इथे हिरोला हाताशी धरुन त्याचाही उदोउदो करावा. नातेवाईक व्हिलन्सचं मतपरिवर्तन करावं. हिरोईणच कश्शी बाई आदर्श आदर्श स्त्री ह्याचा पोवाडा गावा. सगळं कुटुंब एकत्र यावं. मालिका संपली. तुमचा ड्राफ्ट नवीन लेखकांच्या हवाली 'रेफरन्ससाठी' करावा.१३

मॅरीनेशन:
सग्गळे सग्गळे सण निगुतीने दाखवावेत. त्यात उगीच नवेपणाची फोडणी देणं१४ आवश्यक. हिरो हिरॉइणीची प्रेमकथा मात्र ह्या सगळ्यांवर मात करून चालू ठेवावी. मध्ये मध्ये चवीपुरतं हिरोईणीचं दुर्गारुप दाखवावं, एखाद्या सरकारी उद्यानात रोम्यांटिक गाणं टाकावं. बाकी हिरोईणीला मेंदू नाहीच अशी प्रेक्षकांची खात्री झाली पाहिजे.
भाषा अगदी ट्रेडमार्क दाखवावी पात्रनिवडीनुसार. लहेजा सोडून कोणी बोल्लाच तर त्याची जीभ छाटली जाईल अशी सूचना लिहून ठेवावी.
तमाशे१५ करता आले पाहिजेत. ह्यात तुमची सर्जनशिलता दिसते.
हिरो-हिरोईणीला आजकालचे कपडे दाखवू नयेत. आजकालचे छंदही दाखवू नयेत. ह्या दोन्ही गोष्टींवरून तमाशा करावा. एकत्र सिनेमा/जेवायला जाण्यावरून झकास एक एपिसोड तमाशा करावा.
हिरो आणि त्याचं मातृप्रेम जबरी दाखवावं. हिरोईणीच्या माहेरी जाण्यावरून तमाशा करावा. काही सुचलं नाही की उगीच काहीतरी परंपरा भंग करवून घेऊन तमाशा करावा. छोटे व्हिलन आणून, त्यांना गुंडाळत रहावं. मधोमध हिरोईणीचा अजूनच छळ करावा.
नाती नाती नाती, माणसं माणसं माणसं चा गजर करत रहावा. अगदी हार्डकोअर ममव मूल्ये प्रेक्षकांवर ठोकत रहावीत.

स्पष्टीकरणे:
१: मराठी मध्यम वर्गीय. काही हुच्चभ्रू लोकांचा नॉनहुच्चभ्रू लोकांना डिवचण्याचा 'कीवर्ड'. तिसरी जमात अस्तित्वात नसते.
२. फेसबुकावरचे फ्रँड्झ. हे तुमच्या दैनिक जिलब्यांना लग्गेच सुंदर, अप्रतिम, फुले, छान, अप्रतिम, फुले, सुंदर, फुले, आणखी फुले अशा कमेंट्स देत राहतात. त्यांना गोंजारत राहणं महत्त्वाचं. म्हणजे कल्ट प्रस्थापित होतो.
३. हे अनुक्रमे नॉन गावठी आणि गावठी असं वाचावं.
४. भारदस्त म्हणजे पाच अक्षरी. सरनाईक, सरपोतदार, जहागिरदार इत्यादी. २ मधील नॉन गावठी वर्ग असेल तर सुप्रसिद्ध आडनावेही खपून जातात. परब, गोखले, नाईक इत्यादी.
५. हिरोईण हे हिरोचं स्त्रिलिंगी रुप आहे. तिला मोजके पाच एपिसोड सोडून भाव द्यायचा नस्तो. तिचा भाव आणि तिचे भाव हिरोवर अवलंबून असल्याने तिचं नावही हिरोईण.
६. जनरली बुद्धी नाठी झालेले खवचटोत्तम आजीआजोबा नापास.
७. हे उपप्रकार हाताशी असू द्यावेत. हवे तसे उलटसुलट वापरता येतात.
८. माधव-माधवी, मिलींद-रुक्मिणी वगैरे जुनाट नाहीत. छोटीशी. यू गेट द पॉईंट.
९. पहा ५.
१०. नसते शब्दार्थ घेऊ नयेत. इथे तुमच्या सिरीअलची अद्वितीयता दिसते म्हणून तो शब्द.
११. इथे तुमच्या आडनाव निवडीतली ताकद दिसून येते. 'सान्यांच्या घराण्यात'ला 'सरपोतदारांच्या घराण्यात' इतका जोम नाही येत.
१२. हा विनोद आहे. आतापर्यंत कळला पाहिजे.
१३. कळला का १२ मधला इनोद मंडळी?
१४. इको फ्रेंडली गणपती, फटाक्यांशिवायची दिवाळी, पाण्याशिवाय होळी, सुताशिवाय वटपूजा इत्यादी.
१५. म्हणजे सासूबाईंचे साश्रुनयन, छोट्या व्हिलन्सच्या कानगोष्टी, प्लॅन कॅन्सल होणं आणि हीरोईणीचं टायटॅनिकफोड आईसबर्गपण जिंदाबाद. नातीनाती गजर चालू ठेवावा.

पूर्वप्रकाशित: ऐसीअक्षरे, २२/०९/२०१७

कलापाकक्रियाविनोदजीवनमानप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधवादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

20 Feb 2018 - 4:44 pm | स्वधर्म

अजून एक: त्या त्या वेळी जे सण येतात, ते सर्व सण मालिकेत साजरे झालेच पाहिजेत. त्यासाठी ‘अापले सण व व्रतवैकल्ये’ हे संदर्भपुस्तक जरूर वापरावे. जरूर तर, अमराठी सणही चवीनुसार टाकावेत उदा. छटपूजा, करवा चौथ इ.

उपेक्षित's picture

20 Feb 2018 - 5:00 pm | उपेक्षित

जबरी हाणलाय :)

जेम्स वांड's picture

20 Feb 2018 - 6:05 pm | जेम्स वांड

जबरी लिहिलं आहेत, एकदमच जबरी!.

तेजस आठवले's picture

20 Feb 2018 - 10:03 pm | तेजस आठवले

चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात भर घालण्याची संधी सोडणार नाहीत :)

  • सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
  • प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
  • तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
  • कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
  • पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
  • मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.

सध्या इतकेच.

१.५ शहाणा's picture

21 Feb 2018 - 8:41 am | १.५ शहाणा

यात एखादे पत्राचे लफडे मग त्यांच्या घरच्यांचा विरोध जेष्ठ ची समजूत यात १०-१५ भाग सहज घालता येतात

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 10:06 am | चिर्कुट

एखादं 'वेडसर पण प्रेमळ' पात्र पाहिजे. जिथे वेळ काढायचा असेल तिथे विनोदी, गंभीर, पोरकट, दुखःद अशा कोणत्याही प्रसंगी वापरता येतं.

प्रियाभि..'s picture

21 Feb 2018 - 10:14 pm | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

21 Feb 2018 - 10:14 pm | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

21 Feb 2018 - 10:14 pm | प्रियाभि..

छान..

ज्योति अळवणी's picture

22 Feb 2018 - 8:41 am | ज्योति अळवणी

मस्त जमलंय. एकम कडक