एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !!
बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत.
माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात. त्याची शिरेल पण आहे याची काही कल्पना नव्हती. आणखी एक महत्वाची बाब, तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या सारखे अगम्य संवाद ऐकण्यापेक्षा इंग्रजी चित्रपट फक्त बघण्यासाठीच थिएटर मध्ये जायचे हे मत अगदी पक्के. हा धागा वाचण्यात आला आणि मग प्रकर्षाने जाणीव झाली, या मिपावरील हुच्चभ्रू एलिट अभिजनांच्या मांदियाळीत सामील व्हायचं असेल तर या गर्दभाच्या अंगावर घोड्याची झूल पांघरायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही.
विचार केला, या धाग्यापासूनच सुरवात करू. जरा लक्षपूर्वक वाचायला घेतला आणि सुरवातीलाच अडलो ते स्पॉईलर वर. हि काय भानगड आहे? घिसाडी असल्याने एरोडायनॅमिक्सच्या संदर्भात हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी स्पॉईलर वापरतात हे माहित होते परंतु शिरेलसाठी देखील स्पॉईलर? म्हणजे शिरेल नि टेक ऑफ घ्यावा म्हणून स्पॉईलर वापरतात कि काय? शोधाशोध केल्यावर कळलं हे स्पॉईलर म्हणजे शिक्रेट. ते सांगायचं नाही म्हणे! एखादा सस्पेन्स थ्रिलर बघायचा म्हणजे डोक्याला नुसता शॉट, पुढे काय होतेय, रहस्य काय याचं सारखं टेन्शन, शेवट कळे पर्यंत जीव खालीवर. असा एखादा सिनेमा आला कि आमचा जग्गूदादा त्याच्या एखाद्या पंटरला आधी सिनेमा बघायला पाठवायचा आणि सिनेमाची सगळी ष्टोरी, किती मर्डर आहेत, रणजित टाईपचे किती शीन आहेत याची सगळी चौकशी करायचा मग निवांत सिनेमा बघायला जायचा. नो टेन्शन. परंतु हुच्चभ्रू कनसर (उच्चार बरोबर आहे ना?) व्हायचे असेल तर पहिला धडा गिरवायला घेतला तो म्हणजे स्पॉईलर कळता कामा नये. चला सुरवात तर झाली.
पुढे वाचायला लागलो आणि अडलो बिंज या शब्दावर. आता हि काय नवीन भानगड आहे? परंतु एक लक्षात आले कि हुच्च्चभ्रु व्हायचे असेल तर असे शब्द फेकता आले पाहिजेत. मग बिंजचा धांडोळा घ्यायला सुरवात केली. सुरवातीला श्री गोगलदेवाने भलताच अर्थ सांगितला परंतु अधिक खोलवर शोध घेतला तेव्हा बिंज वॉचिंग सापडले आणि मग अर्थ लागला, हुश्श झाले. आणखी थोडी प्रगती झाली.
जस जसा पुढे वाचत गेलो तस तसा वेगवेगळ्या शॉर्टफॉर्म्स वर अडलो. GOT काय, SATC काय. पुढे तर BOT, FOX, ABC, CBC, BBC, TVF असे शब्द येऊन आदळायला लागले. सिझन या शब्दाने देखील गोंधळात टाकले. मला माहित असलेले सिझन म्हणजे ते आपले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा इत्यादी. आता या शिरेलला देखील सिझन असतो तर? म्हणजे पावसाळ्यांत शिरेल मधील पात्रं हातात छत्र्या घेतात आणि थंडीत स्वेटर्स घालतात कि काय? पुढचा स्टॉप आला sitcom या शब्दावर. हि हुच्चभ्रू अभिजन मंडळी महा थोर. सरळ सध्या शब्दात नाही लिहिणार, नाहीतर कळणार कसे हुच्चभ्रू आहोत ते! या सगळ्यांचा धांडोळा घेत गेलो. एकंदरीत हे हुच्चभ्रू एलिट कनसर होणे भलतेच अवघड प्रकरण आहे हे लक्षात आले.
या सगळ्या एलिट गोष्टी समजायला लागल्यावर पुढचा प्रश्न आला या सगळ्या शिरेल बघायच्या म्हणजे एखाद्या ऑन-लाईन व्हिडीओ ऑन डिमांड आणि स्ट्रीमीन्ग मेडियाची सोय देणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे पाय धरायला हवेत, फास्ट इंटरनेटचे कनेक्शन हवे, एखादा स्मार्ट, हाय डिफिनेशन टीव्ही आणि सोबत होम थिएटर हवे. म्हणजे हे सगळं भलतंच खर्चिक प्रकरण आहे तर. पण काय करणार एलिट क्लब मध्ये सामील व्हायचंय ना !
आता याच्या पुढची पायरी होती ती म्हणजे प्रत्यक्ष एखादी शिरेल बघणे. कुठली निवडावी बरे? विचार चालू केला. पण कसचे काय? शिरेल मध्ये देखील असंख्य प्रकार. पहिल्यांदा अडलो ते जानं (तो रं उच्चारायचा नाही म्हणे - मग लिहिलाय कशाला तेथे?) या शब्दावर. या शब्दाने जान मुश्किलमें डाल दी I किती असंख्य प्रकार आहेत बघा - हॅन्गआउट कॉमेडी, सिचुएशनल कॉमेडी, वर्कप्लेस कॉमेडी, कन्सेप्ट कॉमेडी, फॅमिली कॉमेडी, sitcom, romcom, मेडिकल ड्रामा, लीगल ड्रामा, क्राईम ड्रामा, मिस्ट्री, पझल, सायन्स फिक्शन, फँटसी, सोप ऑपेरा, डॉक्युमेंट्रीज, स्पोर्ट्स, रिलिजन, फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशन, म्युझिक अँड डान्स, गेम शोज, रिऍलिटी शोज, इन्फॉर्मेशिअल, इंफोटेन्मेन्ट काय न काय. रामा शिवा गोविंदा.
या सगळ्या गोंधळात ठरवता येईना नक्की कुठून सुरवात करावी. तेव्हा आपल्या हुच्चभ्रू मिपाकरांनी काय शिफारसी केल्यात ते बघायला लागलो, म्हटलं त्यातील एखादी शिरेल निवडावी.
- हि सीरिअल माझी बघून झाली, पाहून धन्य झालो. : शिरेल बघून कोणी धन्य होऊ शकतो हे वाचून मीच धन्य झालो.
- या सिरीयलचा पहिला सीझन पहिला. मस्त आहे. : हे काय नवीन, आता पहिला सिझन पहिलाच असणार ना? नक्की कुठला सिझन पाहिला याची शोधाशोध केली परंतु सापडला नाही. शेवटी सध्या थंडी चालू असल्याने हिवाळ्याचा सिझन पाहिला असेल अशी समजूत करून घेतली.
- पहिल्या काही भागात पात्रांची ओळख Zआली की मजा वाढते 7/10. : झाली हा शब्द Zआली असाही लिहिता येतो हे वाचून मजा आली. त्याचप्रमाणे आपण रेटिंग देखील देऊ शकतो हे पाहून उगीचच समीक्षक Zआल्या सारखे वाटले.
-सिझन २ थोडा बोअर होतो. आणि मुळात ड्रग ट्रॅफिकिंग मधले २-४ विकी पेजेस वाचले असतील तर आणखीन इंटरेस्ट येतो. : अरे देवा ! शिरेल बघायची तर पूर्वतयारी देखील करावी लागते कि काय?
- एक अव्वल दर्जाचा पोलीस , ओसीडी ने त्रस्त होतो. : हे ओसीडी प्रकरण काय ते न कळल्यामुळे मीच त्रस्त Zआलो.
- आठवतील तशा सांगत जाईन. : सांगा सांगा, तेव्हडीच आमच्या ज्ञानात भर.
- मी नुकतंच " * " चं बिंज केलं. मजा आली. : करा करा बिंज करा. पण जास्त काही सांगू नका हो, बिंग फुटायचं.
- नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या. : मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या?? हि तुमची जीविका दिसते मग उपजीविकेसाठी काय करता?
- सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय आणि " * " तर अहाहाहा... चुकवू नये अशीच. : आमची मजल फार तर कुठून चक्रबोर्ती तर अहाहाहाहा..... एव्हढीच.
- या ६ ही सिरीजचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत. नक्की पहा. : नक्की पहा?? अहो पहा म्हणायला काय जातंय? बघा केव्हढे प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला.
- " * " जब्राट. पण शेवट जमला नाही त्यांना. :( : अचू द्ये अचू द्ये, आपण त्यांचं घर उन्हात बांधू बर्रर्र आणि हो, असे जब्राट वगैरे शब्द वापरायला शिकायलाच पाहिजे आता.
- कार्टून सारखा तोचतोपणा यायला लागला आणि सोडून दिल्या. : अहो असं नका करू. तुम्हीच बघणं सोडून दिलं तर आम्ही पामरांनी कोणाकडून शिरेलदर्शन घ्यायचं?
- " * " बघायला सुरुवात केली होती पण एका एपिसोडवर थांबलोय तो अजून थांबलोच आहे. : सदैव प्रेक्षका पुढेच जायचे. तुम्हीच थांबला तर आम्ही कोणाकडे बघायचे?
- थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.
- सीझन १,२,३ हे अनुक्रमे उत्तम, मध्यम आणि सोसो वाट्ले. : साहजिकच आहे, काहींना हिवाळा आवडतो तर काहींना उन्हाळा. चालायचंच.
- " * " अप्रतिम अभिनय!! आणखी सांगत नाही... मेलडी खाव... : नक्काच सांगू. आम्ही नाही जा ! आम्हाला शिरेलदर्शनाची अपेक्षा आणि तुम्ही मेलडी खायला सांगताय?
- " * " पाहिली नसेल तर ती पाहून घ्या आधी. त्याशिवाय मोक्षप्राप्ती इल्ले! : अगा नवल वर्तलें. शिरेल बघून मोक्ष प्राप्ती होते हे ऐकून तुकोबांनी स्वर्गात हळहळ व्यक्त केली असेल. उगा भक्ती केली आणि अभंग लिहिले! टीव्ही समोर ठाण मांडून बसलो असतो.
- " * " चे नाव अजून कोणी कसे घेतले नाही ? : ईश्श, नाव घ्यायला लाजत असतील मंडळी.
- सत्तरीच्या दशकातील न्युयॉर्क मधील पॉर्न इंडस्ट्री ही थीम. : सत्तरीच्या दशकातली का? म्हणजे PIO के. कौर नसेल त्यात, नाही का?
- समाजशास्त्र मानसशास्त्र अनेकोनेक बाबींसाठी ही मालीका एकवेळ तरी अवश्य बघावी. : कुठले मानस आणि समाज शास्त्र घेऊन बसलात? जास्तीतजास्त ट्यार्पी हे एकच शास्त्र आहे बर्रर्र.
- काही तांत्रिक कारणांनी हा लेख. : बरे Zआले नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची!
- हे मत मी ४ पासून पुढील सीजन साठी मान्य करतो. : तीन सिझन उ-पा-ही माहित होते, हा ४था कुठून आला?
- " * " पहिले ७ सीझन्स जबरदस्त कोर्ट ड्रामा. : तीन चे चार Zआले, आता सात? हे आपल्या आकलनाच्या बाहेर आहे बुवा.
- आपल्या भोवती आणि आपन बाळगत असलेल्या अनेक भ्रमाचा भोपळा फोडणारी मालिका ! : हे असं काही बघण्यापेक्षा भ्रमाचा भोपळा वाचणे चांगले, नाही का?
- ही सीरीज पाहीलेली नसल्यास एकवार अवश्य पाहावी ही आग्रहाची शिफारस. : आता दुर्मिळ Zआलेला पुण्यातील लग्नाच्या पंक्तीतला आग्रह ऐकून माहित होता परंतु शिरेलचा आग्रह ?
या इतक्या वेगवेगळ्या शिफारशी बघून अजूनच गोंधळ उडाला. मग ठरवले आपले आपणच निवडू एखादी शिरेल म्हणून लिस्ट बघायला घेतली तर नावे आणि स्टार स्टार स्टार.. इथे काय गाळलेल्या जागा भरायच्या आहेत कि काय? काही कळेना. ओ हो, हे स्टार्स म्हणजे रेटिंग आहे होय. हे कळायला अंगभूत एलिट स्मार्टनेस नसल्याने थोडा वेळच लागला. आणखी एका लिस्ट मध्ये तर ६५, ४८, ७४ असे आकडे .. म्हणजे १०० पैकी गुण आहेत कि काय अशी शंका आली. परंतु नाही, हे म्हणे शिरेलच्या भागांचे आकडे आहेत. हॅ, हे काय आकडे Zआले. आमची कपूरांची केकता बघा, एकदा रतीब लावला कि वर्षानुवर्षे चालू.
या सगळ्या आंग्ल भाषेतील हुच्चभ्रू शिरेलच्या गर्दीत एका ठिकाणी मराठी शिरेलचा उल्लेख आढळला आणि खरेच आपल्या मातीतला मृद गंध आल्यासारखे वाटले... अहाहा.
हे सगळे प्रकर्ण आपल्याला जमण्यासारखे नाही असे वाटल्याने माझ्या जवळ असलेला दूरदर्शन चालू केला तर हँ हूँ आवाज ऐकायला आला. बघतो तर आपले रादे बाबा अनुलोमविलोम शिकवत होते.
रादे बाबा, तुमची योगासनांची फक्त शिरेल बघून मला योगाचे फायदे मिळतील का हो? म्हणजे मी लगेच एव्हढ्यात कुठली योगा शिरेल पाहिलीत / पाहत आहात? अशी जिल्बी पडायला घेतो, कसे?
प्रतिक्रिया
30 Dec 2017 - 7:53 am | उगा काहितरीच
मस्त !
30 Dec 2017 - 8:56 am | नाखु
भारी
बिना शिरीयलचा सरधोपट नाखु
30 Dec 2017 - 1:48 pm | अनन्त अवधुत
काही वाक्ये ओळखीची वाटली..असो.
नुसत्या योगाच्या नाही तर हॉट योगाच्या शिरेल्स पण बघा आणि प्रेर्ना घ्या.
जिलबी चवदार आहे.
2 Jan 2018 - 3:22 am | चामुंडराय
हॉट योगा ??
नुसतच हाय टेम्परेचर आणि हाय ह्यूमिडिटी.
घामाची चिकचिक आणि दर्प ..... तो अनुभव पुन्हा नको.
बाकी जिलबी चवदार असल्याचा उल्लेख केल्या बद्दल आबारी आहे.
30 Dec 2017 - 8:10 pm | मारवा
लेखात तुम्ही म्हणता
- थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.
मुळ लेखात मिपाच्या महीला सदस्य हर्मायनीजींनी हा प्रतिसाद दिलेला आहे ज्यावर तुम्ही वरील ओळ लिहीलेली आहे तो हर्मायनीजींचा प्रतिसाद असा आहे.
या प्रतिसादात हर्मायनीजींनी
SATC बघतेय
सेकंड सीझन चालु आहे
इतकं स्पष्टपणे मी एक सिरीयल बघत आहे हे म्हटलेलं असुनही
त्यानंतर च्या शब्दात तर
खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा.
म्हटल्यानंतर म्हणजे इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर अगदी लहान मुलालाही समजेल की या आता एका स्ट्रेंजर थिंग्ज या टीव्ही सीरीज विषयी बोलत आहेत इतकं सर्व सुस्पष्ट असुनही.... ?
लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात
स्ट्रेन्जर थिंग्स ह्या सिरीयल चा नुकताच सेकंड सीझन आला आहे. हि सिरीयल पॅरलल युनिव्हर्स वगैरे कल्पनांवर अधिकारीत आहे. बघायला मजा येईल असे वाटते. पण थोडी स्कॅरी असू शकेल असे वाटते म्हणून एकटीने बघायची हिम्मत नाही होते.
तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते.
याचे कारण काय असावे ?
समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ?
की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ?
की द्विअर्थी विनोदाची उबळ ?
बाकी विनोदात व द्विअर्थी विनोदात ही काहीच गैर नाही
असो
2 Jan 2018 - 9:32 pm | असंका
तो धागा जरा जास्तच अति झाला होता. त्याला जशास तसे म्हणून हा लेख जरा अति करून लिहिला आहे. त्यात लॉजिक शोधणे आणि वर इथे मांडणे म्हणजे....
पण आता आपण सुरु केलंच आहे म्हणून-
कुठल्याही वाचकाने आलेले प्रत्येक इंग्रजी शब्द हे सिरीयलचंच नाव आहे असं गृहित धरायचंय का? जसं रिलेशनशिप ड्रामा, स्केरी...इ. या पण सिरीयल आहेत का? आधीचा संदर्भ अजूनपण चालू आहे ना?
हे आपण का सांगत आहात? लेखकाने स्वतःच कबूल केलं आहे की त्याला पुढचं वाचून प्रतिसादकाला नक्की काय म्हणायचंय ते कळलंय म्हणून- (आणि ते आपण पण कोट केलेलं दिसतंय वर..)
मग आता- मी आपल्याला विचारतो-
तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते.
याचे कारण काय असावे ?
समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ?
की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ?
;)
30 Dec 2017 - 8:35 pm | रंगीला रतन
झकास लिहिलय... आवडलं...
2 Jan 2018 - 3:25 am | चामुंडराय
उगा काहितरीच, नाखु, रंगीला रतन -
आपणासारख्या जेष्ठ आणि प्रस्थापित मिपा सदश्यांकडून मज सारख्या नवमिपाकरास मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
2 Jan 2018 - 9:41 am | sagarpdy
भारी लिवलंय
2 Jan 2018 - 9:39 pm | असंका
कहर!!!
मजा आली!!
धन्यवाद!!
4 Jan 2018 - 5:06 pm | पद्मावति
मस्तं लिहिलंय :)
4 Jan 2018 - 6:49 pm | arunjoshi123
चामुंडराय, मज्जा आली. बरंही वाटलं. आपल्यासारखेच प्रश्न लोकांनाही पडतात ते बघून बरं वाटतं.
5 Jan 2018 - 11:01 am | आदूबाळ
हरकत नाय. आपण 'घाडगे अँड सून' आणि 'लेक माझी लाकडी' बघाणाऱ्यांचे धागे काढू. डोन्ट.
5 Jan 2018 - 2:12 pm | पगला गजोधर
राणा व पाठक बाईंचा उल्लेख केला नाही, आमच्या भावना दुखावल्या .....
तीव्र णिशेध
;)
5 Jan 2018 - 3:33 pm | आदूबाळ
राणा आणि पाठकबै इज सो लास्ट सीझन.
इन थिंग्ज आर
- आज्या-शितली
- तुझं माझं ब्रेकपमधली ती चिचुंद्रीसारख्या चेहर्याची हिरवीण
- 'लेक माझी लाडकी'मधला ऋषी (जसे 'रेबेल विदाऊट कॉज' असतात तसा हा 'व्हिलन विदाऊट कॉज' आहे.)
5 Jan 2018 - 3:56 pm | पगला गजोधर
इंद्रवदन ...
"आज्या-शितली" इज सो मेडीओकोअरली पथेटिकली मिडलक्लास ....
5 Jan 2018 - 3:37 pm | तेजस आठवले
घाडगे आणि सून मधल्या सुनबाईंचे अभिनयवैविध्य निव्वळ जागतिक पातळीवरचे आहे. सतत एकाच प्रकारचे भाव चेहऱ्यावर असतात. पाहताक्षणी डोक्यात तिडीक जाते.
5 Jan 2018 - 4:32 pm | आदूबाळ
तिला बघून मला वत्स अॅपमधल्या एका स्मायलीची आठवण होते.
5 Jan 2018 - 8:25 pm | चामुंडराय
आबा साहेब,
खरंच एक घाअँडसु, लेमाला, मानबा, तुजीरं इत्यादी शिरेल्स वर जिल्बी पाडाच.
त्या धाग्यावर कश्या हुच्चभ्रूंच्या "मी टू, मी टू" करत उड्या पडल्या तश्या या जिल्बीवर "मी बी, मी बी" करत मध्यभ्रू आणि निचभ्रूची जी गर्दी होईल ती बघाया मZआ यील :)
5 Jan 2018 - 2:26 pm | पगला गजोधर
आज जे लोकं* "हुच्चभ्रू एलिट शिरेल्स", असे म्हणताना दिसतात ( *या लेखावरील व मिपावरील लोकं नाही)
त्यातीलच काही निचभ्रु मनोवृत्तीच्या लोकांचा कंपू , मागच्याच वर्षी, 'सैराट' चित्रपटाला नाकं मुरडताना आढळली ...
.
त्यांच्या मते सैराट मध्ये आर्ची आणि परश्या च्या भूमिकेत, दिग्दर्शकाने उगाच आपलं रस्त्यावरून कोणालाही उचलून आणल्या सारखं कलाकार लावलेत.
त्याऐवजी आर्चीच्या भूमिकेत 'आमच्या' मुक्ता बर्वेला व पारश्याच्या भूमिकेत, स्वप्नीलला आणले असते, आणि हो दिग्दर्शनही राजवाडे वैगरेना दिलं असतं,
तर अवघ्या त्रिखंडातील एक अजरामर कलाकृती निर्माण झाली असती ... पण आजकाल काय कोणालाही चान्स मिळतो, पूर्वीची मेरिटोक्रसी राहिली नाही आता...
6 Jan 2018 - 8:50 am | चामुंडराय
पग साहेब,
एक करता येईल. आर्चीची जुडवा बहीण मिर्ची आणि परश्याचा जुडवा भाऊ नरश्या लहानपणी जत्रेत हरवतात. त्यांच्या आई वडिलांचा पत्ता न लागल्याने पोलीस त्यांना अनाथ आश्रमात दाखल करतात. तेथून ते दोघे मुंबईतील हुच्चभ्रू घरात दत्तक जातात. हे दोन रोल्स मुक्ता आणि स्वप्नीलला देता येतील. पुढे ते दोघे त्यांच्या रुट्सच्या शोधात गावात येतात व आर्ची आणि परश्याला शोधून काढतात अशी डबल जुडवा धमाका असलेली ष्टोरी करता येईल आणि याचं दिग्दर्शन देखील एखाद्या मनाजोगत्या हुच्च्चभ्रु दिग्दर्शकाकडे देता येईल.
हे म्हणजे आहेरे आणि नाहीरे या दोन्ही गटांना त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांना खुश केल्यासारखे होईल व आहेरे गटाची मेरिटोक्रसी ही राहील आणि नाहीरे गटाला संधी दिली म्हणून उपकारोक्रसी देखील मिरवता येईल, काय बोलता?
6 Jan 2018 - 9:35 am | पगला गजोधर
आयडियाची कल्पना चांगली वाटतें....
आणि शिवाय तुम्हाला अजून एक धागा काढायला चान्स पण मिळेल...उदा.
"फक्त उच्चभ्रू व निचभ्रू चे चित्रपट.... मध्यभृचे काय ???
चित्रपट सृष्टीचे डोके ठिकाणावर आहे काय ???"
5 Jan 2018 - 4:50 pm | चिनार
मस्त लिहिलय !!
6 Jan 2018 - 3:14 am | रीडर
6 Jan 2018 - 3:14 am | रीडर
6 Jan 2018 - 3:14 am | रीडर
6 Jan 2018 - 9:01 am | चामुंडराय
रीडर साहेब,
त्रिवार धन्यवाद :)
6 Jan 2018 - 10:54 am | संजय पाटिल
मनोरंजक...
6 Jan 2018 - 10:53 pm | पैसा
भारी आहे! सिरियल बघणार्यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे!
7 Jan 2018 - 2:18 am | nishapari
एवढं कुजकटपणे का लिहिलंय ? तो धागा खूप सुंदर होता , अनेक नवीन मालिकांची माहिती मिळाली . मुळात तो धागा इंग्रजी मालिका पाहणाऱ्या लोकांना नवीन मालिका सुचवल्या जाव्यात या उद्देशाने काढला होता , ज्यांना काहीच माहिती नाही त्यांचं या विषयावर प्रबोधन करण्यासाठी नाही . तुमची काय अपेक्षा होती , प्रत्येक शॉर्ट फॉर्म , प्रत्येक संज्ञेचं सोपं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं का सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रियांमध्ये ? GOT म्हणजे अमुक अमुक , सिजन म्हणजे अमुक अमुक ? उच्च भ्रू , एलिट हे शब्दही तुमचे , त्या धाग्यावर तर कुणीच आम्ही इंग्रजी मालिका पाहतो म्हणजे आम्ही कुणीतरी भारी अशी शेखी मिरवलेली नाही आहे . सध्याच्या 70 % हुन अधिक मराठी मालिका या कौटुंबिक आणि कटकारस्थानांनी भरलेल्या असतात हे तुम्ही खोडून काढू शकाल का ? मग त्यामध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं असं कुणाला वाटलं तर त्यात काय चूक आहे ? उलट इंग्रजी मालिकांमध्ये विषयांबाबत वैविध्य प्रचंड प्रमाणावर आहे .. अभिनय , संवाद आणि दिग्दर्शन यांवर बोलायची माझी पात्रता नाही म्हणून त्यावर काही लिहीत नाही . पण उगाच लिहायचं म्हणून तुम्ही जे कुजकट लिहिलं आहे ते काही पटलं नाही .
8 Jan 2018 - 2:01 am | चामुंडराय
> > > सिरियल बघणार्यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे!
अगदी, अगदी पैसा तैं, मलाही हाच प्रश्न पडलेला !
- मी नुकतंच "*" चं बिंज केलं
- नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या
- शनिवार/रविवारी एक -एक सिझन पुर्ण संपवलेले आहेत
- "*" तर अक्षरशः जागेवरून उठू पण देत नाही
- एकदा सुरू केली की संपल्याशिवाय चैन पडत नाही
- हि मालिका संपल्या नंतर "" आणि नंतर "" बघायची आहे.
हे सगळं लिहिलेल्या नरपुंगवांना (आणि नारीपुंगव देखील) इतका वेळ कसा मिळतो? ही सगळी मंडळी उपजीविके साठी काय करतात कोण जाणे?
यांच्या अर्धबरी*(आणि अर्धबरा देखील) या मंडळींना इतका वेळ स्क्रिन समोर बसायला मुभा कशी देतात?
तो धागा वाचल्यावर आणि प्रतिक्रिया द्यायला समानांची जी मी टू, मी टू लगबग उडाली ती बघितल्यावर अनन्त्_यात्रींनी लिहिलेच आठवले
- ते थोडे बदलून....
हुच्चभ्रूंचे कैसे शिरेल्स पाहणे | हुच्चभ्रूंचे कैसे बिंजणे ।
आंग्ल-शिरेल्सशी सलगी करणे | कैसे असे ||
दुर्बोध शिरेल्सचे आधारू | क्लिष्ट शॉर्टफॉर्म्सचे भांडारू ।
समीक्षकांचे महामेरू | शिरेल्स पाही ||
हुच्च शिरेल्सच्या नावांची | स्पर्धा जणू काही सांगण्याची |
शिरेल्सच्या रेटिंगची । तुळणा कैची ||
यांसी आंग्ल-शिरेल्स आवडे | आपले ते सर्व नावडे |
शष्प न कळोनि मज जैसे | दिग्मूढ राहती ||
आंग्ल तितुके मिरवावे । मराठी-हिंदी अवघे इग्नोरावे ।
स्व-अभिमानी असता कोणी | मारावे फाट्यावरी ||
आपले ते सर्व त्यागावे । आंग्ल शिरेल्सना बिंजावे ।
हुच्चभ्रुपणाची लगबग । राया म्हणतो करावी ||
.
.
* हा शब्द मला मिपा वरतीच घावला आहे.
8 Jan 2018 - 5:03 am | आनंदयात्री
यावरून आठवले.. ब्लॅक मिररचा नवा सिझन आलाय, तो या विकांताला बिंज करून संपवला. आधीच्या सीझन्सच्या मानाने बराच प्रेडिक्टेबल वाटला.
8 Jan 2018 - 9:33 am | पगला गजोधर
अपडेट-
गेऑथ्रो २०१८ मधे प्रक्षेपण नाही, २०१९ ची वाट पहा...
अशी बातमी वाचनात...
8 Jan 2018 - 11:15 am | अभिदेश
GOT म्हणायचं असतं...एवढी सिम्पल गोष्ट ठाव नाय ...कसे व्होनार तुमी हुच्चभ्रू ...
8 Jan 2018 - 12:04 pm | पगला गजोधर
आय्मायस्वार्रि
10 Jan 2018 - 5:03 am | चामुंडराय
ओके, ओके.
I GOT IT.
9 Jan 2018 - 9:10 pm | पैसा
=))