देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
17 Jul 2019 - 3:38 pm

#टिचभर_गोष्ट

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी. एवढ्या पैशात पुढचा आठवडा निभावून जाईल, अशी आशा डोळ्यांत उमटे. सोमवारपासून परत कॉलेज, असाईनमेंटस यात गर्क. ‘चित्र काढून करियर होत नाही,’ म्हणून ज्या घराने तिला सदानकदा हिडीसफिडीस केले, त्या घरातून ती एकेदिवशी निघून जाते, ती माझी पाठची बहिणच नव्हे का?

‘फर्मिनाचे लग्न झालेय’ अशी कुणी आठवण करून दिलीच तर, ‘तिचा नवरा मरण्याची वाट बघतोय’ असं बेदरकार उत्तर देणारा फ्लोरेन्तिनो पन्नास वर्षे तिची वाट पहात राहतो. ज्या गरिबीने हा जीवघेणा दुरावा निर्माण केला, तिच्यावर मात करून श्रीमंत होतो. आयुष्यात बायका येतात, जातात. हा फार्मिनाची वाट बघत राहतो. चौकात बसून गावातल्या प्रेमिकांना रोज संध्याकाळी प्रेमपत्रं लिहून देत राहतो. कितीतरी वर्षे! ज्याने त्याने ती पत्रं आपापल्या प्रेमिकांना दिली, पण त्याच्यासाठी प्रत्येक पत्र जणू फर्मिनासाठी लिहिलेले. वयाच्या ८० व्या वर्षी, जीर्णशीर्ण होऊन कॉलऱ्याच्या साथीत जेव्हा ते दोघे भेटतात, तेव्हा काळ क्षणात थांबतो. काळाला न जुमानता केवळ प्रेमच करत राहणारा, एकतर्फी पत्रं लिहित राहणारा फ्लोरेन्तिनो सारखा प्रियकर कुणाला हवासा वाटणार नाही?

साल्झबर्गच्या Mozartium म्युझिक युनिवर्सिटीच्या प्रांगणात पुरुषभर उंचीचे lyre घेऊन सुरावटींचे नक्षीकाम करणाऱ्या मायकेलपाशी आपण पोहोचलो. त्याच्या टोपीत युरो टाकणार, तेवढ्यात त्याने हसून आपल्याला आपली फर्माईश विचारली. आपण उत्साहाने सांगितले, ‘मोझार्ट, सिंफनी नंबर 40’. म्हणाला, ‘रोज संध्याकाळी lyre वाजवतो. युरोज मिळतात, दाद मिळते, पण फर्माईश मिळत नाही.’ कितीतरी वेळ मनापासून वाजवत राहिला. हळूहळू कानसेन जमले. सर्वांच्या कानात कौतुक होते. डोळ्यांत हसू होते. चेहरे प्रसन्न होते. त्याच्या टोपीत नाणी पडल्याचा आवाज माझे कान टिपत होते. माझ्या चित्र काढणाऱ्या बहिणीचा तो भाऊच नव्हता का?

एके रात्री अमृता येते आणि अफरोजबद्दल सांगून जाते. बर्कले स्ट्रीटवर बसून आपल्या antique टाईपरायटरवर कविता लिहून देणारी अफरोज. या टाईपरायटरवर डिलीटची सोय नाहीच. एकदा टंकिले ते टंकिले. ‘Ask me for a poem’ असा बोर्ड लावून, मागेल त्या विषयावर सार्थ, जिवंत कविता लिहून देणारी अफरोज मला बाजारू वाटत नाही. धाडसी वाटते. जगण्याच्या धबडग्यात कवितेला ओवणारी रिव्हर्स बहिणाबाई वाटते.

ग्रहणवेळा वाईट समजल्या जातात. पण ग्रहण लागलेल्या चंद्राकडे पहात रात्र जागवणारे, दूरस्थ प्रेमाची आठवण काढत ग्रहणकळा सोसणारे, मोक्षकाल येताच झोपी जातात. तसेच, देवाघरचे देणे घेऊन आलेल्या या कलावंतांची, माणसांच्या जगातली ग्रहणवेळ संपून, मोक्षकाल लागेल तेव्हा माझ्यासारखे दाराबाहेरचे रसिक निश्चिंतपणे झोपी जातील.

-शिवकन्या

मांडणीवावरसंस्कृतीकलासंगीतवाङ्मयमुक्तकभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Jul 2019 - 3:58 pm | यशोधरा

वा! केवळ.

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 4:09 pm | जॉनविक्क

- सूर्यग्रहणात जन्मलेला जॉनविक्क

ट्रम्प's picture

17 Jul 2019 - 4:19 pm | ट्रम्प

उत्तम !!!
खुपच छान लिहले आहे .

विनिता००२'s picture

17 Jul 2019 - 4:43 pm | विनिता००२

नि:शब्द :)

जालिम लोशन's picture

17 Jul 2019 - 5:24 pm | जालिम लोशन

सुरेख

अनिंद्य's picture

17 Jul 2019 - 7:15 pm | अनिंद्य

मुक्तक आवडले.

मुक्त विहारि's picture

17 Jul 2019 - 7:16 pm | मुक्त विहारि

निसर्गात रमणारा. ..मुवि.....

शिव कन्या's picture

17 Jul 2019 - 9:34 pm | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.

nishapari's picture

17 Jul 2019 - 10:46 pm | nishapari

अप्रतिम आहे

पद्मावति's picture

17 Jul 2019 - 10:47 pm | पद्मावति

खुप सुरेख!

पलाश's picture

17 Jul 2019 - 11:18 pm | पलाश

सुंदर! खूप आवडलं.

भीडस्त's picture

18 Jul 2019 - 4:30 am | भीडस्त

पहाटेच्या दवबिंदूसम तरल

श्वेता२४'s picture

18 Jul 2019 - 10:56 am | श्वेता२४

भिडणारं तुमचं लेखन आहे. खासच

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2019 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिलं आहे !

अभ्या..'s picture

18 Jul 2019 - 12:14 pm | अभ्या..

अह्ह्हा,
अप्रतिम.
तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा.
असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने.
तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी.
चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक.
.
ग्रहणकाळच का हा?
कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच?
काय की?
कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 12:18 pm | जेम्स वांड

तू आयुष्य जिंकणार भावा, तुला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा.

शिव कन्या's picture

18 Jul 2019 - 6:23 pm | शिव कन्या

देवाघरची किती नक्षत्रं काढावीत!

प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ.

तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

नाखु's picture

24 Jul 2019 - 12:38 pm | नाखु

सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती.
दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत.
वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे

तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे.
मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते.

कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही

हे स्फुट लेखन आवडले.

मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 12:23 pm | जेम्स वांड

ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा.

Flowers 15Flowers 15

जबरदस्त हृदयस्पर्शी लिखाण. तुमची कविता आणि ललित लेख हे दोनही प्रकार हाताळण्याची कला अप्रतिम आहे.
- इरामयी (तुमच्या लेखनाची फॅन)