अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा!
युगांतर- आरंभ अंताचा!
महाभारत! ही कथा नक्की कोणाची?
सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची? की ज्याने कर्तव्य करत, युद्ध नावाच्या अग्निकुंडात, प्राणांची आहूती देउन, वीर गती प्राप्त केली त्याची? की.... जो यात सहभागी होउन सुद्धा निशस्त्र राहिला त्याची?
ही कथा आहे ढळलेल्या पदराची! तुमच्या नजरेसमोर असहाय्यपणे श्रीकृष्णाला लज्जारक्षणासाठी हाक मारणाऱ्या द्रौपदीची छबी आली असेलच. पण एक पदर त्या आधीही ढळला होता....खुप आधी!
स्वर्ग.... सुगंधी द्रव्ये आणि तालबद्ध वाजणाऱ्या वाद्यांच्या लयित मुग्ध करून टाकणारे मनोहर नृत्य आणि नृत्य करणाऱ्या अप्सरांचे इहलोकीचे अप्रतिम सौंदर्य. सर्व सुखे देवलोकांच्या ठायी रेंगाळत होती. महाभिषक, इंद्र देव, वरूण देव सारे तल्लीन होऊन नृत्य बघत असतानाच ब्रह्मदेव आणि ब्रह्मापुत्री गंगा तेथे अवतरले.
गंगा.... शुभ्र वस्त्र, गोरा वर्ण, घनदाट वळणदार केस, मानेवर रुळलेले हिऱ्यांचे नाजूक दागिने, चेहऱ्यावरील स्मित. आहाहा! डोळ्यात साठवून घ्यावे असे सौंदर्य. महाभिषक तिच्या काळभोर नेत्रांकडे पाहत होता. त्या काळ्याशार समुद्रात खोलवर तळाशी आपल्या अस्तित्वाचे सार आहे असे भासू लागले. तो बघतच राहिला. गंगा आसनस्थ झाली. तिने सर्वत्र नजर फिरवली आणि महाभिषकावर तिची नजर खिळली. दोघे एकमेकांच्या नजरेत असे काही हरवले की गंगेचा पदर वाऱ्याच्या एका खट्याळ झुळूकेने उडवून दिला तरी तिला आणि त्याला त्याचे भानच राहिले नाही. नृत्य थांबले. स्त्री- दाक्षिण्य दाखवत बाकी साऱ्या देवांनी मान झुकवली.
परंतु गंगा आणि महाभिषक अजूनही एकमेकांमध्ये मग्न होते. त्या क्षणी सर्व जगाचा विसर पडलेल्या गंगा आणि महाभिषकाला पाहून ब्रह्मदेवांची क्रोध पातळी शिगेला पोचली.
आणि विज कडाडावी तसे ब्रह्मदेव कडाडले.
गंगा आणि महाभिषक दचकून ब्रह्मदेवाकडे पाहू लागले. आपण शीघ्रकोपी शिव-शंकर नाही, ब्रह्म देव आहोत, गंगा आपली पुत्री आहे, हे सारं विसरून दोघांनाही मृत्यूलोकांत जाण्याचा अभिशाप देउन तेथून पुढच्या क्षणीच ब्रह्मदेव अंतर्धान पावले.
अनपेक्षित! सारे निस्तब्ध झाले होते. एक असह्य शांतता वातावरणात भिनली.
महाभीषकाच्या अंतर्मनात विचारांचे काहूर उठले. 'नजरानजर झाली म्हणून एव्हडा भयंकर शाप ? जन्म मृत्यूच्या फेऱ्यात स्वर्गातून केलेला कडेलोटच की! स्वर्गी आपल्या कर्तुत्वाने मिळविलेले स्थान असे क्षणात गमावले आपण? नृत्य करणाऱ्या अप्सरांचे अत्यल्पशा वस्त्रांमधले रुप ज्या नजरेने बघतात त्या नजरेत असते वासना! त्या नृत्यांगनांवर खिळलेल्या नजरांबद्दल मात्र कुणालाच आक्षेप नव्हता. गंगादेवी आणि माझी झालेली नजरानजर तर पवित्र प्रेमाची होती. वासनेचा लवलेश तरी होता त्यात? का ब्रह्म देवा? का केलत असं?'' शापित महाभिषक हळहळला.
परंतु, हा शाप भोगतानाही गंगादेवी सोबत असेल तर आपण हा शापाचा भार लिलया पेलू असेही महाभिषकाला कुठेतरी वाटत होते. पण नियतीचे चाक नेमके कोणत्या दिशेने फिरेल हे खुद्द काळ सुद्धा सांगू शकत नव्हता. कोण जाणो, एक शाप पूर्ण होण्याआधीच, कुठेतरी दुरवर, कोणी तरी एखाद्या महा तपस्वी ऋषी मुनींच्या शापाला आमंत्रण देत असेल आणि तो भार आपल्या शापाला अजून कठीण बनवेल!
गंगादेवी पिताश्री ब्रह्मदेवांच्या शापाने आत्मक्लेशात जळत होती. हा दाह कमी व्हायलाच हवा.... सर्वांना शितल पवित्र जल देणारी, स्वत: आज शाप भोगण्यासाठी स्वर्गातून धरेवर आगमन करायला सज्ज झाली. देवी देवतांनाही शाप-उ:शापाच्या अनियंत्रित फेऱ्यांतून सुटका नसते, हेच सत्य!
महाभिषकाला मात्र मृत्यूलोकात येण्याकरिता मनुष्य रुपात जन्म घेणे बांधिल होते. या शापातही गंगादेवी सोबत असेल या विचारांनी मुखकमलावर पुसटसे स्मित उमटले. ती एकच त्याच्या शापरुपी जन्माच्या तप्त उन्हातली दाट छाया बनणार होती.
गंगा धरतीच्या मार्गाकडे बघत उभी होती. गंगेचा ढळलेला पदर अजूनही हवेत हेलावत होता.
#Yugantar_Part1
#Mahabharat
#Yugantar_Aaramb_Antacha
क्रमशः
© मधुरा
Part 2: https://m.facebook.com/story.php?story_fbid=2539196086139752&id=10000148...
प्रतिक्रिया
19 Jul 2019 - 3:16 pm | जॉनविक्क
सर्व स्पष्टीकरणंहि तकलादू वाटत आहेत :(
19 Jul 2019 - 8:14 pm | मृणालिनी
तुम्ही महाभारत वाचलेले नाही, असे दिसते. ही कथा मी लिहिलेली नाही. या लोक कथा आहेत. तुम्ही सैराट पाहिला असेल तर त्यात ज्या प्रमाणे तिच्या घरचे तिला आणि तिच्या नवऱ्याला मृत्यू देतात. तसे इथे ब्रह्मदेवाने त्यांच्या मुलीला आणि तिच्या होऊ पाहणाऱ्या नवर्याला शाप दिला. काय अवघड आहे हे समजायला? असो. मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले.
19 Jul 2019 - 8:30 pm | जॉनविक्क
मिपावर अत्यन्त चोखंदळ, रसिक, मार्मिक प्रेक्षकही आहेत. माझे मत माझ्यापुरते व माझ्या बौद्धिक क्षमतेशी निगडित आहे. समस्त मिपाकरांचे त्यावरून सरसकटीकरण करणं योग्य नाही.
बाकी शाळामास्तर प्रमाणे कच्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचे कि त्याला बोलतं करून त्याची अडचण समजून घ्यायची हे आपण ठरवा _/\_
19 Jul 2019 - 9:28 pm | प्रचेतस
आदीपर्वातील कथा आहे ही.
19 Jul 2019 - 10:01 pm | मुक्त विहारि
धन्यवाद. ...
19 Jul 2019 - 11:01 pm | प्रचेतस
बाकी राजाचे नाव महाभिषक नसून महाभिष आहे.
20 Jul 2019 - 1:45 am | जॉनविक्क
मला वाटलं कोणीतरी शितावरून भाताची परीक्षा वगैरे सुनावेल. :)
ही कथा आहे ढळलेल्या पदराची! तुमच्या नजरेसमोर असहाय्यपणे श्रीकृष्णाला लज्जारक्षणासाठी हाक मारणाऱ्या द्रौपदीची छबी आली असेलच. पण एक पदर त्या आधीही ढळला होता....खुप आधी!
आता हि ओळ वाचून आधी हा पदर लज्जा रक्षणासाठी ढळला असणार असे नाही का वाटत ? पण नाही... संदर्भहीन होता होता हा आधीचा पदर तर प्रेमात भान हरपले म्हणून ढळला, मग त्याला द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या रेफरन्स च्या रांगेत का उभे केले ? का मलाच द्रौपदीच्या पदराबाबत काही अपुरी माहिती आहे ?
माझ चुकलं तर पदरात घ्याच (ती चूक), पण गोष्टी परवा परवाच्या असोत कि आदिपर्वाच्या त्या किमान अकुसेठनी रचलेल्या आहेत असा आभास तर लिखाणातून निर्माण करू नका _/\_
19 Jul 2019 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले.
एका प्रतिसादावरून अख्ख्या मिपावाचकवर्गावर ताशेरे ओढणे, हे जरा फार झाले, असे वाटत नाही का?
कोणत्याही मुक्त माध्यमात लिहिताना, "आपण आपले लेखन मुक्तपणे सर्व रुचींंच्या वाचकांच्या वाचनासाठी आणि टीकाटीप्पणीसाठी स्वतःहून उघड करत असतो", हे विसरून कसे चालेल? तेव्हा, काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येणारच हे गृहीत धरणे जास्त संयुक्तिक होईल. किंबहुना, (पूर्वग्रह आणि आपलेपणा टाळून) जे काम आपल्या प्रत्यक्ष ओळखीचे लोक (आपले मन राखण्यासाठी) करण्यास धाजावत नाहीत, ते काम आपली प्रत्यक्ष ओळख नसलेल्या प्रत्येक वाचकाची नकारात्मक प्रतिक्रिया करते... आणि आपल्याला बरेच काही शिकवून जाते. 'पहिल्या लेखापासून पुढे फक्त तारीफच मिळाली' असे सत्यजगात (होतच असले तर) क्वचितच होईल... आणि झाले तर अत्यंत आश्चर्यकारक असेल... आणि त्यापासून शिकण्यासारखे फारसे मिळण्याची शक्यता जवळपास नसेलच.
तेव्हा, सत्य जगात, मुक्त माध्यमांत वावरताना, प्रत्येक सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रियेतून, 'आपल्याला सुधारणा करण्याजोगे काय मिळते काय' हे पाहणे आणि त्यातील रुचेल-जमेल त्याचा स्विकार करून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे आणि न पटेल त्याने फार दु:खी न होता ते सोडून देणे, हा विवेक सर्वोत्तम !
असो. तुम्ही जाणत्या आहातच. जे योग्य वाटेल ते करावे.
19 Jul 2019 - 9:38 pm | मुक्त विहारि
पुढला भाग लवकर टाकलात तर उत्तम....
वाट पाहण्या सारखे दूःख नाही.
आणि एक विनंती आहे.
मिपा सारखे व्यासपीठ नाही.
इथला वाचकवर्ग चोखंदळ आहे. त्यामुळे गुडीगुडी वातावरण नाही. लेख बघून प्रतिसाद देणारे बरेच जण आहेत. मिपावर व्यक्तीपुजा नाही.
माझ्या लेखांनाही फटके मिळालेले आहेत तरीही मी इथेच जास्त रमतो. उत्तम लिहिलं तर नक्कीच प्रशंसा मिळते, हा स्वानुभव आहे.
हाताची सगळी बोटे सारखी नसतात. कुणाला महाभारत माहिती नसेल तर कुणाला हॅरी पॉटर तर कुणाला अॅव्हेंजर...
राग नसावा.
पुढच्या भागाची वाट पहात आहे. ....
19 Jul 2019 - 9:48 pm | यशोधरा
भाग २ साठी फेसबुकवर जायचे का?
इथेच टाका दुसरा भाग प्लीज.
20 Jul 2019 - 12:37 am | जालिम लोशन
येथील वाचकांची घडण आपल्या लक्षात आली नाही काय? कि आपण फक्त मिपा platform आपल्या स्वप्रसिध्दिसाठी वापरतात? सार्वजनिक आयुष्यात ऊध्दटपणा करुन चालत नाही! नम्रताच तुम्हाला पुढे नेते. बाकी तुम्ही आदीपर्वातील कथेचे मेलोड्रामॅटायझेशन चांगले केले आहे.
20 Jul 2019 - 12:45 am | nishapari
चांगलं आहे पण आणखी चांगलं लिहू शकाल असं वाटतं .. हे वाचून कुणीतरी मिसळपाव वरच लिहिलेली एक जुनी सिरीज आठवली सीतेच्या आयुष्यावर , तिच्या दृष्टिकोनातून .. खूप अप्रतिम डिटेलिंग भरून लिहिली होती ...http://www.misalpav.com/node/23333
तुम्ही लिहिलेलं फार त्रोटक वाटतं आहे ... आणि थोडंस बोअर झालं वाचून .. अजून छान लिहू शकाल तुम्ही प्रयत्न केला तर असं वाटतं ..
21 Jul 2019 - 4:49 pm | मृणालिनी
प्रतिसादाचे स्वरूपच नाही तर प्रतिसाद न देण्यावरूनही वाचकांची मनोधारणा कळते. असो.
मी ज्या स्त्रोतातून माहिती मिळवली त्या अनेक ठिकाणी उल्लेख महाभिषकच आहे.
जर प्रसिद्धीच मिळवायची तर त्या करिता मी या कथा का लिहिल्या असत्या ज्या सर्वांच्या विस्मरणात गेलेल्या आहेत किंवा काही जणांना तर माहितीच नाहीत?
जर उगाच उग्र प्रतिसाद देउन तुम्हाला आनंद वाटला असेल तर महत्वाचे हे, की मी सकारात्मक प्रतिसादाच्या लालसे पोटी कथा प्रकाशित केलेली नाही. महाभारत आणि रामायण या उत्तम कथा लोकांनी वाचाव्यात असे मला वाटते. पण जर मिपा वाचकांना ते महत्त्वाचे वाटत असेल तर इथे त्याविषयी लिहिणे व्यर्थ आहे.
मिपा वाचकांबद्दल माझे मत खरे कि खोटे हे तुमच्या प्रतिक्रियाच ठरवत आहेत.
मी ताशेरे ओढले नाहीत. फक्त मत व्यक्त केले.
काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर?
असो. यापुढे इथे काही पोस्ट करणे मला श्रेयस्कर वाटत नाही.
21 Jul 2019 - 6:16 pm | उपेक्षित
बरे झाले तुम्ही राम राम घेत आहात तसेही अस्सल मिपावकरांना असल्या इगोईस्टिक लेखकांची तिळमात्र गरज नाही (वयक्तिक मत आहे माझे) आणि आम्हाला तुम्ही जात आहात त्याने शष्प फरक नाही पडत.
21 Jul 2019 - 6:46 pm | जॉनविक्क
काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर?
चिल्. काही बोलू नका, अथवा हवं ते बोला कुठे जायची गरज नाही, मिपा सगळ्यांचेच आहे एकदम हॉलिस्टिक आहे.
22 Jul 2019 - 9:12 am | प्रचेतस
तुम्ही कुठले स्रोत वापरत आहात?
महाभारताच्या भांडारकर प्रतीत, भालबा केळकर संपादित प्रतीत, प्र. न. जोशी ह्यांनी संपादित केलेल्या विदर्भ मराठवाडा बुक कं. च्या प्रतीत किसारी मोहन गांगुली ह्यांई इंग्रजीत अनुवादित केलेल्या प्रतीत महाभिष असाच उल्लेख आहे.
वैशम्पायन उवाच||
इक्ष्वाकुवंशप्रभवो राजासीत्पृथिवीपतिः |
महाभिष इति ख्यातः सत्यवाक्सत्यविक्रमः ||१||
ततोऽभवन्सुरगणाः सहसावाङ्मुखास्तदा |
महाभिषस्तु राजर्षिरशङ्को दृष्टवान्नदीम् ||५||
अपध्यातो भगवता ब्रह्मणा स महाभिषः |
उक्तश्च जातो मर्त्येषु पुनर्लोकानवाप्स्यसि ||६||
स चिन्तयित्वा नृपतिर्नृपान्सर्वांस्तपोधनान् |
प्रतीपं रोचयामास पितरं भूरिवर्चसम् ||७||
महाभिषं तु तं दृष्ट्वा नदी धैर्याच्च्युतं नृपम् |
तमेव मनसाध्यायमुपावर्तत्सरिद्वरा ||८||
(Sambhava Parva continued)
“Vaisampayana said, ‘There was a king known by the name of Mahabhisha born in the race of Ikshvaku. He was the lord of all the earth, and was truthful (in speech) and of true prowess. By a thousand horse-sacrifices and a hundred Rajasuyas he had gratified the chief of the celestials and ultimately attained to heaven.
शिवाय तुम्ही लिहिलेल्या नंतरच्या भागांत शंतनु हे नाव लिहिलेले आहे. जे शंतनू नसून शांतनु आहे.
22 Jul 2019 - 5:22 pm | मृणालिनी
http://www.apamnapat.com/articles/Mahabharata005.html
http://www.manuscrypts.com/myth/2011/11/30/ganga/
https://erenow.net/common/the-mahabharata-a-modern-rendering-vol-1/3.php
http://thoughtsonsanathanadharma.blogspot.com/2012/10/esoteric-interpret...
https://sathvishayam.wordpress.com/2014/12/15/life-of-bheeshmacharya/
https://books.google.co.in/books?id=mrCjP8t21RwC&pg=PA45&lpg=PA45&dq=mah...
https://www.speakingtree.in/allslides/15-curses-from-ramayan-and-mahabha...
महाभिषक
22 Jul 2019 - 8:31 pm | प्रचेतस
तुम्ही जे दुवे दिलेत ते मूळ स्रोतांमधील नव्हेत, भांडारकर संशोधित प्रत काय किंवा किसारी मोहन गांगुली ह्यांचा अनुवाद मूळच्या शारदीय आणि त्यानंतरच्या नीळकंठ इत्यादी प्रतींवर बेतलेल्या आहेत.
अर्थात एखादा शब्द कमी जास्त असला तरी फारसा फरक पडत नाही पण केवळ त्यामुळे चुकीचा शब्द जाऊन लेखन सदोष न व्हावे हाच हेतू.
लिहीत राहा.
21 Jul 2019 - 6:56 pm | नाखु
धाग्यावर वस्त्रहरण झालेलं दिसतं आहे
दूरदर्शक नाखु
21 Jul 2019 - 7:28 pm | मृणालिनी
मी पुढील भाग मिपावर टाकण्याचे ठरवले आहे.
21 Jul 2019 - 9:48 pm | जॉनविक्क
तसेच अशीही विनंती करतो की ढळणाऱ्या पदरांचे जरा संभाळून सरसकटीकरण करा. _/\_
22 Jul 2019 - 7:30 am | मृणालिनी
ढळणे म्हणजे जागेवरून खाली घसरणे. ते फक्त वस्त्रहरणाचेच द्योतक नाही. पण वाचताना तसे वाटण्याची दाट शक्यता आहे. कारण गंगेचा पदर वाऱ्याने ढळला यापेक्षा द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा प्रसिद्ध आहे.
यात स्त्रीच्या लज्जेचा धागा समान आहे.
22 Jul 2019 - 7:47 am | जॉनविक्क
पण नंतर ढळणे आणि हात घातला जाणे हे भलेही
स्त्रीच्या पदराबाबत घडते हा समान धागा जरी पकडला तरी पण त्याचे अर्थ फार भिन्न असतात.
पांचालीचा पदर ढळला हा शब्द अग्निपुत्रीवर ओढवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जर गमावायचे नसेल तर पाळायच्या सभ्यतेची मर्यादा म्हणूनही वापरणे एखाद्या निष्णात महाकविलाही अशक्य.
असो, आपण खिलाडू वृत्तीने चर्चेचा घेतलेला पवित्रा बघता हा विषय फार तणावाहि वाटतं नाही. धन्यवाद.
22 Jul 2019 - 5:27 pm | मृणालिनी
मुद्दा मलाही वाढवायचा नाही. पण ओळ परत वाचावी अशी विनंती! त्यात ' तुम्हाला वाटले असेल ना ' अश्या आशयाने द्रौपदी बद्दल लिहिलेले आहे. मला उल्लेख गंगेचाच करायचा होता.
असो. तुम्हाला ते पटले नाही हे माझ्या पर्यंत पोचलेले आहे. धन्यवाद वाचल्याबद्दल!
21 Jul 2019 - 11:52 pm | मुक्त विहारि
लिहीत रहा. ...
लिहता लिहता, इथल्या वातावरणात रमून जा. ..
पण एक जाहीर विनंती आहे.
इतर लेखांना पण प्रतिसाद देत जा.