वटवृक्ष!
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा.