शिवजयंती
त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली.