विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान
अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन
✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत
✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट
✪ "सा. सू. आणि सू. न.!”
✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?”
✪ कार्यशाळेत रडणारा बाबा
✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची
✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं
✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण
✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी
✪ प्रश्नांवर उपायही आहेत!
नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ. सचिन नगरकर सरांचं एक विलक्षण व्याख्यान ऐकण्याचा योग आला. विशेष व्यक्तींच्या शारीरिक गरजा व लैंगिक साक्षरता ह्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा ३० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉ. सचिन नगरकर सरांचं दोन तासांचं व्याख्यान व प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम सप्तर्षी फाउंडेशनने सोबती दिव्यांग ग्रूप, निर्वाण दिव्यांग संस्था आणि अभिसार फाउंडेशन ह्यांच्या सहकार्याने पिंपरीतील दिव्यांग भवन येथे आयोजित केला होता. अंगावर शहारे आणणारं, कधी कधी हसवणारं तर कधी रडवणारं हे उत्स्फूर्त भाषण होतं. त्यातले मुद्दे केवळ विशेष व्यक्तीच नाही, तर सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यासाठी सरांनी सांगितलेल्या मुख्य मुद्द्यांचं हे शब्दांकन शेअर करत आहे.
डॉ. सचिन नगरकर सरांनी चर्चा आणि संवाद्वारे सुरूवात केली. विषय अवघड असल्यामुळे पार्श्वभूमी सविस्तर सांगितली. लैंगिकता ही कशी नैसर्गिक आणि जन्मजात आहे, मनुष्य प्राण्यापासून कसा विकसित झाला आहे आणि कसा करूणा, सहानुभूती, समानुभूती ह्या गुणांमुळे तो मनुष्यापासून वेगळा ठरतो, हे त्यांनी सांगितले. बौद्धिक अक्षम किंवा दिव्यांग मुलांनाही लैंगिक जाणीवा व संवेदना असतात. ते बौद्धिक अक्षम असतात, परंतु लैंगिक गरजा त्यांनाही तितक्याच असतात. आणि त्या लैंगिक गरजांना योग्य प्रकारे व्यक्त होणे आवश्यक असते. हे न झाल्यामुळे अनेकदा अशी मुले व प्रौढ चिडचिडे होतात किंवा अधिक अस्वस्थ होतात. अगदी स्वाभाविक किंवा नैसर्गिक अशी गरज पूर्ण न झाल्यामुळे होणारा हा ताण असतो. त्यांची लैंगिकता आपण समजून घेतली पाहिजे व तिचा निचरा होण्यासाठी मदत केली पाहिजे, असं सरांनी सांगितले.
(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. ध्यान, फिटनेस, सायकलिंग, आकाश दर्शन अशा विषयांवर माझे लेख तिथे उपलब्ध. सरांच्या व्याख्यानाचं ऑडिओ रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल. नक्की ऐकावं असं आहे.)
लैंगिकता व लैंगिक संबंध ह्या गोष्टी स्वतंत्र आहेत. लैंगिक संबंध हा अगदी कमी वेळेचा भाग आहे. पण लैंगिकता ही आईच्या पोटात बाळ असल्यापासून असते. त्या बाळाचंही शिष्न ताठरत असतं. इतरही अनेक कारणांमुळे असं होतं आणि ते नैसर्गिक आहे. आणि मृत्युपर्यंत ही लैंगिकता असतेच. सरांनी एक किस्सा सांगितला. त्यांच्या एका मित्राच्या बाबांचं वय ८७ आहे. ते तब्येतीने छान आहेत. मोबाईल वापरत असतात. एकदा त्यांचा मोबाईल बंद पडला. तेव्हा मित्राने तो दुरुस्त करून आणला. सगळं नीट आहे ना, हे तो बघत होता तेव्हा त्याला काकांचा एक ग्रूप दिसला. त्याचं नाव होतं "वी.स. पा. गे." त्याने तो उघडला तो काय! एकदम सगळे डेंजर आयटम आणि फोटो- व्हिडिओज! रागावून त्याने काकांना विचारलं की हे काय आहे? त्यावर आधी ते चिडले की, माझी काही प्रायव्हेसी आहे की नाही. मग त्यांनी सांगितलं की, तो "वी.स. पा. गे." त्यांच्या खास लोकांचा गट आहे- वीर्य संपलेले, पाळी गेलेली. सरांनी अवघड विषय असा हसत हसत समजावला. पुढे सर म्हणाले की, इंटरनेटचा ६५% वापरसुद्धा पोर्नसाठी होतो. हे ऐकताना सतत जाणवत गेलं की, हा किती महत्त्वाचा विषय आहे व सगळ्यांसाठीच किती महत्त्वाचा आहे. आणि मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही किती महत्त्वाचा आहे.
भर बैठकीमध्ये येऊन आणि कपडे काढून हस्तमैथून करणार्या विशेष मुलाचं व त्याला अगदी प्रेमाने समजावणार्या शिक्षिकेचं उदाहरण सरांनी दिलं. ह्या गरजांचे शमन होण्यासाठी व योग्य प्रकारे त्यांचा निचरा होण्यासाठी विविध उपाय आहेत. लहानपणापासून मुलांना हळु हळु सवय लावणे, सामाजिक प्रकारे स्वीकारार्ह व योग्य पद्धतीने त्या व्यक्त करण्याचे प्रशिक्षण देणे, प्रसंगी भिन्न लिंगी व्यक्तींची सोबत- सहवास आणि लैंगिक टॉयजचा योग्य वापर असे उपाय त्यांनी सुचवले. एखादी गोष्ट करता येत नसेल, व्यक्त होत नसेल किंवा सतत विरोध केला जात असेल तर दिव्यांगच काय आपणही चिडतो आणि अस्वस्थ होतो. काय करायचं नाही, हे सांगण्यासह काय करायचं हेही सांगितलं पाहिजे. आणि जास्त सूचना देणं म्हणजे त्या व्यक्तीला रिजेक्ट करणं होतो, त्याउलट छोट्या गोष्टींचं कौतुक स्वीकार भाव दर्शवतो आणि पुढच्या पावलासाठी मदत करतो, असं सर म्हणाले. ("सा. सू." म्हणजे सारख्या सूचना आणि "सू. न." म्हणजे सूचना नको!)
सरांनी अशाही काही पालकांचे अनुभव सांगितले जे म्हणायचे की, त्याला किंवा तिला "ही गोष्ट" होतेच कशी. किंवा मनात ती भावना येतेच कशी. एक बाबाने तर पक्कड घेऊन मुलाचं शिश्न चिरडलं होतं. पण सरांनी सांगितलं की, कार्यशाळेमध्ये आल्यावर तोच बाबा नंतर रडला. त्याला चुकीची जाणीव झाली. आज काल लोक आपल्या कुत्र्यांनाही मेटींगसाठी नेतात- वाट्टेल तिथे जाऊन त्यांना पार्टनर मिळवून देतात. मग कुत्र्यांसाठीही आपण हे करतो, तर मुलांसाठी का नाही, हा प्रश्न त्यांनी केला.
विशेष मुलं- व्यक्ती मग ते सर्व प्रकारचे असतील- ऑटीझम असलेले, डाउन्स सिंड्रोम, बहुविकलांग, लर्निंग डिसेबलिटी, एमआर, एडीएचडी आणि इतर- मुलांना कमी वयापासून सवय लावली तर हळु हळु ते शिकू शकतात (Early intervention). नव्याने एकदम त्यांना सांगितलं तर ते विरोध करतात. पण हे सगळ्यांना लागू होतं. गाडी तरुण वयात सहज शिकता येते. साठीच्या वयामध्ये शिकताना त्रास पडतो. सरांनी त्यांचं वय ६० सांगितलं, पण त्यांची ऊर्जा व फिटनेस वेगळंच वय दर्शवत होते! सर म्हणाले की, लैंगिकता ही चूक नाहीय. किंवा ती असावी का नसावी हा प्रश्नच नाही. कारण ती आहेच. फक्त तिला योग्य दिशेने कसं अप्रोप्रिएट करता येईल, हे आपल्या हातात आहे. आणि विशेष मुलांसाठी इतरांसमोर कपडे न बदलणं किंवा हस्तमैथून करायचं तर बाथरूममध्ये जाऊन करायचं अशा सवयी हळु हळु लावता येतात. अगदी विशेष मुलींना तीन कार्यशाळांमध्ये मासिक पाळीबद्दलही प्रशिक्षण देता येतं. पालकांना विशेष शिक्षक व तज्ज्ञांची मदत मात्र लागते.
जे निसर्गत: मिळायला हवं ते नाही मिळालं तर तणाव निर्माण होतो. अस्वस्थता आणि चिडचिड होते. त्यामुळे अनेकदा असे विशेष मुलं किंवा प्रौढ कधी कधी इतरांच्या जवळ जातात. किंवा काही पालक सांगतात की, त्यांचा मुलगा हस्तमैथून करून दिल्याशिवाय त्यांना बाहेरच पडू देत नाही. ह्या मुलांनाही आनंद कसा मिळतो, हे कळत असतं. सरांनी सांगितलं की, एका कार्यशाळेमध्ये मुलांना एक चित्र दाखवलं ज्यात एक मुलाने हात खाली केलेले होते. त्यावरून विशेष मुलांनी बरोबर ओळखलं की, तो शूच्या जागेवर मजा करत होता. त्यांना संवेदना आणि इच्छा तितकीच आहे हे सर सांगत होते. व्याख्यानात सरांनी एक वेगळा अनुभव सांगितला. एका संस्थेमध्ये एक प्रयोग केला गेला होता. एका विशेष मुलाला व विशेष मुलीला एकत्र ठेवलं. नवरा बायकोसारखे ते सोबत राहिले. सोबत राहायला लागल्यावर त्यांची चिडचिड व अस्वस्थता कमी झाली. ते खूप शांत झाले आणि एकमेकांची काळजी घेऊ लागले. जेवताना ते एकमेकांजवळ बसायला लागले. संस्थेला वाटलं की, त्यांच्यात लैंगिक संबंध येईल. पण ते इतके शांत झाले आहेत आणि इतके हळवे झाले आहेत की, अद्याप लैंगिक संबंध झालेला नाही.
प्रेमाची सोबत मिळाली, हातात हात येऊ दिला तर पुढची आक्रमकता येतच नाही, अशी उदाहरणं आहेत. केवळ भिन्न लिंगी व्यक्तीची सोबत मिळाली तरी घुसमट दूर होते. एक संवाद आणि प्रसन्नता येते, सरांनी सांगितलं. आणि मुलींच्या सोबत वावरणारे मुलंही हळु हळु संवेदनशील झाले. कधी मुलगी चिडली तर पाळीमुळे तिचा मूड स्विंग झाला असेल, असंही आता मुलं सांगतात, सर म्हणाले. अनेक बाजूंनी सरांनी मार्गदर्शन केलं. हे व्याख्यान आवर्जून ऐकावं आणि विशेष मुलांच्या पालकांसोबत शेअर करावं, असं आहे. लैंगिक गरजांचं समाधान, विशेष व्यक्तींनी विवाह करावा किंवा करू नये, त्यातून येणारी जवाबदारी आणि गुंतागुंती अशा मुद्द्यांवरही सरांनी चर्चा केली. त्या त्या परिस्थितीमध्ये मदतीसाठी व आधार देण्यासाठी किती व्यक्ती आहेत, सपोर्ट सिस्टीम कशी आहे ह्यानुसार ह्या गोष्टी ठरतात. कदाचित एकटे कुटुंब किंवा फक्त पालक अपुरे असतील, पण अनेक पालक एकत्र येऊन उपाय शोधू शकतात किंवा संस्था मिळून त्यावर मार्ग काढून हा आवश्यक सपोर्ट उपलब्ध करून देऊ शकतात, असं ते म्हणाले. ज्यांना कळतं त्यांनी दोन पावलं टाकली तर गोष्टी सोप्या होऊ शकतात.
सरांच्या हसत- खेळत झालेल्या भाषणाला व सोप्या पद्धतीने कठिण विषयाला हात घालणार्या भाषणाला पालकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि ऑटीझम असलेल्या मुलाने लग्न करावं का, मुलाला सगळ्यांच्या समोर कपडे बदलू नको असं कसं शिकवायचं, मुलींना पाळीचं प्रशिक्षण कसं द्यायचं अशा व इतर प्रश्नांच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. पाळीबद्दल आजही "माझी अडचण आहे," असंच बोललं जातं. हा दृष्टीकोण बदलला पाहिजे असं सांगत सरांनी ह्या सर्व प्रश्नांना व इतरही प्रश्नांना उत्तरे दिली व उपलब्ध साधने, सुविधा व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. लैंगिकता हा विषय दाबून टाकण्याचा किंवा त्यांना कुठे आल्या वासना किंवा जाणीवा असं म्हणण्याचा नाही तर त्या लैंगिकतेला योग्य प्रकारे व्यक्त होण्यासाठी त्यांना मदत करण्याचा आहे असं ते म्हणाले. दिव्यांग व्यक्तींच्या लैंगिकतेसंदर्भात अडचणी व मर्यादा असल्या तरी त्यावर मार्ग काढता येतो आणि मुलांची व प्रौढांची ऊर्जा अन्य विषयाकडे वळवता येते.
इतकं सुंदर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल माझा मित्र- मनोज बोरसेची सप्तर्षी फाउंडेशन व इतर संस्थांना पुनश्च धन्यवाद. वाचल्याबद्दल धन्यवाद. ऑडिओही ऐकू शकता व जवळच्यांसोबत शेअर करू शकता. - निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 10 ऑक्टोबर 2025.
प्रतिक्रिया
10 Oct 2025 - 11:06 am | युयुत्सु
महत्त्वाचा विषय! अभिनंदन!!
10 Oct 2025 - 1:56 pm | चौथा कोनाडा
खुप माहितीपुर्ण लेख !
धन्यवाद !
10 Oct 2025 - 3:28 pm | युयुत्सु
जे निसर्गत: मिळायला हवं ते नाही मिळालं तर तणाव निर्माण होतो.
हे वाक्य फार महत्त्वाचे आहे, आणि म्हणूनच आवडले.
11 Oct 2025 - 7:53 pm | गामा पैलवान
मार्गी,
आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत.
कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html
दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस.
आ.न.,
-गा.पै.
11 Oct 2025 - 11:02 pm | चौथा कोनाडा
दिलीपची कहाणी वाचुन सुन्न व्हायला झालं !
12 Oct 2025 - 12:35 pm | श्वेता२४
आपले लेख नेहमीच वाचते . खूप वेगवेगळ्या विषयांवर समाजात काम चालू आहे याची जाणीव त्यामुळे होते. धन्यवाद...
12 Oct 2025 - 8:53 pm | मार्गी
सर्वांना धन्यवाद!
@ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.