पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Apr 2025 - 6:25 pm

पुस्तक परिचय
पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक: चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.
परिचय कर्ता : चकोर शाह.
रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात
भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री:
इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः
संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की.
या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते. भुंग्याने थोडासा जरी प्रयत्न केला असता तर तो सहज फुलातून बाहेर येवू शकला असता. पण त्याने विचार केला की जर एखादी गोष्ट सहज पणाने होत असेल तर मुद्दाम प्रयत्न कशाला करायचे. त्याने थोडासा आळशी पणा केला आणि झाले भलतेच.
लढा आळशीपणाशी हे पुस्तक वाचताना आपण आपल्याला ताडून पहात असतो.
पुस्तकातील उदाहरणे ही प्रत्यक्ष अनुभवातून आलेली आहेत.
मुळात हे पुस्तक सेल्फ हेल्प बुक प्रकारातील असले तरी ते अनुभवातून लिहीले गेले आहे. लेखकाला त्याने घेतलेल्या शिबीरातून जे अनुभव गोळा करता आले. जे लोक भेटले त्यांचे हे अनुभव आहेत. त्यामुळे पुस्तकात आलेली उदाहरणे ही प्रत्यक्षातली आहेत.
पुस्तक वाचताना त्यातले अनुभव वाचक स्वतःशी ताडुन पहातो. बरेचदा ती तंतोतंत जुळतात.
उदा: लेखीका व्हायची स्वप्ने बघणारी सुधा . खरेतर सुधा उत्तम सुगरण आहे. तीला स्वत्:च्या पाककृतींचे पुस्तक लिहायचे आहे. सुधासाठी ही अगदी सोपी गोष्ट. ती कधीतरी लिहायला बसते मग तीला अचानक काहीतरी आठवते. वहीचे कोरे पान पाहिल्यावर तीला आठवते की तीच्या मुलीला होमवर्कसाठी मदत करायची आहे. ती त्यावर काम सुरू करते. पुढच्या वेळेस जेंव्हा सुधा लिहायला बसते तेंव्हा तीला एखाद्या नातेवाईकाचा वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी ती फोन चालू करते. कोणातरी तीला एक छान चित्र पाठवले आहे.ते ती शाळेच्या ग्रूप मधे फॉर्वर्ड करते त्यावर प्रतिक्रीया पहाते तिथे काही गमतीदार मेसेजेस पहाते. . मग ते ती भावंडांच्या ग्रूप मधे पाठवते. तिथे तीला समजते की आज मंदाचा वाढदिवस आहे. सुधा तीला फोन करून शुभेच्छा देते. या गडबडीत दोन तास निघून जातात. लिहायचे राहूनच जाते. सुधा स्वतःवरच रागावते.इतकी साधी गोष्ट आपल्याला जमू नये? पण ती स्वतःची समजूत घालेते. पुस्तक लिहीण्यात अवघड असे काहीच नाहिय्ये. ते काय कधीही जमू शकते.आणि म्हणते की प्रॉमिस उद्या नक्की लिहायला बसायचे. गेल्या तीन महिन्यात तीने जवळजवळ तीस वेळातीने स्वतःला असे प्रॉमिस केलेले आहे.चाणि काय आहे ना सगळ्या पाककृती तीच्याच तर आहेत. कधीही लिहीता येतील.
गेली पाच वर्षे सुधा स्वतःला पुस्तक लिहायचे आहे हे बजावतेय. पुस्तक पूर्ण करणे सोडा चार पानेही लिहीली नाहीत. तीचा विष्वास आहे की ते काय कधीही करता येईल म्हणताना तो " कधीही " कधीच येत नाही.
पुस्तकातलं हे एक उदाहरण वानगीदाखल. पुस्तकात अशी रोजच्या पहाण्यातली अनेक उदाहरणे येतात.
लेखक या उदाहरणांतील विवीध क्षेत्रातल्या व्यक्तिंच्या वागण्याचे विश्लेषण करतो आणि काही ठळकपणे जाणवलेल्या सर्वात कॉमन असलेल्या गोष्टी नजरेस आणुन देतो.
या सगळ्या व्यक्तीना शक्य असूनही य्श मिळवण्यात अपयश आले कारण त्यानी दिलेली स्पष्टीकरणे
१) माझ्याकडे वेळ नव्हता
२) त्या वेळेस इतर बरीच महत्वाची कामे होती
३) मी वेळेत निर्णय घेतला नाही कारण मला चुकीचा निर्णय घेतला गेला तर नुकसाहोईल ही भीती वाटत होती
४) ते तसेही इतके महत्वाचे नव्हते. ती माझी लहानपणापासूनची एक इच्छा होती इतकेच.
५) ती गोष्ट अवघड अजोबात नव्हती. सहज करू शकलो असतो. पण मी पहिले तेंव्हा माझ्यासमोर कामांचा ढीग पडला होता. त्यामुळे हे काय सहज करता येईल या विचाराने पुढे पुढे ढकलत राहीलो.
६) माझ्या कडे वेळ नाही, पैसा नाही , माहिती नाही, ताकद नाही ......
लक्ष्यात येतंय का यातले कोणीच स्वतःला दोष देत नाहिय्ये.
अशी सुरवात करून देत लेखक अनेक प्रश्नांना वाचा फोडतो.
आणि आपल्या आळशीपणाची एक एक रहस्ये उघड करतो.
हे पुस्तक लेखकाच्या लाईफ कोचिंग व्यवसायाशी निगडीत वर्कशॉप मधील अनेक लोकांच्या अनुभवावरुन लिहीले आहे. त्यामुळे लेखनाची शैली तुमच्याशी समोर बसून थेट गप्पा केल्या सारखी आहे.
पुस्तकात केवळ अनुभवच आहेत असे नाही तर आळशी पणाची लक्षणे त्यामुळे होणारे अपाय ही आहेत. आणि मुख्यतः त्यावरचे उपाय देखील आहेत.
आपण एखाद्या गोष्टी बाबत आळशीपणा का करतो याची अनेक कारणे आहेत. यात एखाद्या गोष्टीची नावड असणे, एखादी गोष्ट खूप कठीण आहे या बरोबरच एखादी गोष्ट अगदी सहजसाध्य असणे अशीही कारणे आहेत. आपण ती वाचताना मनात हसत असतो कारण या गोष्टी आपल्यासोबतही घडलेल्या असतात.
आळशी पणा करणार्‍या लोकांची वर्गवारी करताना ती १ )श्री संशय शंकेखोर २) श्री परीपूर्ण बिनचूक ३) श्री सर्वकर्ते ४)श्री दूरदर्शी ५) श्री आगविझवे अशा गमतीदार नावानी केली आहे. ही वर्गवारी वाचताना आपण हसतो आणि त्या सोबत तूलनाही करायला लागतो.
लेखक आळशीपणाची कारणे शोधताना आपल्या सूप्त मनाचाही वेध घेतो. मानवी मनाला कोणी आज्ञा देते आहे हे आवडत नाही. मग ती आज्ञा देणारे तुम्ही स्वतःच असला तरीही मानवी मन त्या विरुद्ध बंड करते. त्यामुळे आपण एखादा संकल्प करतना स्वतःची भाषा कशी बदलायची. हे यात दिलेले आहे.
एखाद्या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही तो वेळ कसा काढायचा यासाठी लेखकाने काही टूल्स दिलेली आहेत उदा: आइअसेनहॉवर मेट्रिक्स. यात एखादी गोष्ट महत्वाची आहे की तातडीची आहे हे ठरवून त्याचे नियोजन करता येते. तसेच कामाचा अग्रक्रमही ठरवता येतो. यातून प्रत्येक गोष्टीसाठी वेल कसा काढायचा हे माहीत होते.
आळशीपणाचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे सांगताना लेखक तुमच्या शारीरीक मानसीक आर्थिक सामाजीक स्वास्थ्यावर आळशीपणामुळे काय दूरगामी परिणाम होतात हे सोदाहरण सांगतो.
आपण आळशी पणा करतो त्यामागे काही भीती देखील असतात ( उदा : लोक काय म्हणतील , अपयशाची भीती इत्यादी) या भीतींचे विश्लेषन आणि त्यावरचे सोपे उपाय देखील सांगितले आहेत.
आपली ठरवलेली उद्दिष्ठे साध्य करण्यासाठी लेखक काही सोपे उपाय सुचवतो. ते ताडून पहाण्यासारखे आहेत. उदा : कामाचे भाग पाडणे , कामाची प्रायॉरिटी ठरवणे , लक्ष्य विचलीत करणार्‍या गोष्टींवर मात कशी करायची यासाठी आपल्याला काही रकाने ( मेट्रिक्स ) दिलेले आहेत. त्याचा वापर आपण रोजच्या उपयोगात करू शकतो
पुस्तकात मनाला तयार करण्यासाठी "लै भारी " जादूची छडी असे एक प्रकरण आहे. ते म्हणजे खरोखरीच तुमच्यात जादूच्या छडीने बदल घडवते. हे वाचण्यासारखेच नव्हे तर अनुभवण्यासारखे आहे.
"कासवाचे रेसच्या घोड्यात रूपांतर कसे कराल" हे प्रकरण तर आपले डोळे उघडणारे ठरते. एकूणातच आपण जे काही करतो किंवा करायचे टाळतो, त्यामागचा उद्देश त्यामागची प्रेरणा बदलायला भाग पाडते.
" लढा आळशीपणाशी " हे पुस्तक हे निव्वळ सेल्फ हेल्प प्रकारचे पुस्तक नाहिय्ये. वरवरचे क्विक फिक्स उपाय सांगण्यापेक्षा आपल्या आळशीपणाचे विश्लेषण करून तो मुळापासून संपवण्यासाठी मदत करते.
पुस्तक हे लेखकाने घेतलेल्या वर्कशॉप मधे आलेल्या सहभागी झालेल्या लोकांच्या समस्या आणि अनुभवांवर बेतलेले आहे . त्यामुळे यात सांगितलेले सगळे उपाय अगदी प्रॅक्टीकल आहेत. पुस्तक लेखकाच्या स्वतःच्याच " बीट द फ्रेंडली फो - प्रोक्रॅस्टिनेशन " या इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर आहे. पण ते इतक्या अस्सल मराठीत आहे. की रुपांतरीत आहे असे कुठेही वाटत नाही.
" लढा आळशीपणाशी " हे पुस्तक एकदाच नाही तर कालांतराने पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे. प्रत्येक वेळेस आपण नव्याने घेतलेल्या अनुभवांशी ते ताडून बघतो आणि स्वतः मधे बदल करत जातो.

पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक : चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

17 Apr 2025 - 8:20 pm | चित्रगुप्त

पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत.

आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४
दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास ।
निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५
निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण ।
येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६

दासबोधः दशक ८ समास ६.

रामचंद्र's picture

17 Apr 2025 - 10:17 pm | रामचंद्र

<आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥>

याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो.

दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात.

पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

हे पुस्तक मी अगोदर इंग्रजीत लिहीले होते. नंतर ते मराठीमधे अनुवादीत केले.

मुक्त विहारि's picture

17 Apr 2025 - 10:52 pm | मुक्त विहारि

धन्यवाद..

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2025 - 4:41 pm | कर्नलतपस्वी

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू.

प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला.

आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

कर्नलतपस्वी's picture

18 Apr 2025 - 4:41 pm | कर्नलतपस्वी

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू.

प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला.

आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

विवेकपटाईत's picture

18 Apr 2025 - 6:06 pm | विवेकपटाईत

आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली
हा अनुभव तर सर्वांनाच येतो.

विजुभाऊ's picture

24 Apr 2025 - 4:58 pm | विजुभाऊ

धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

25 Apr 2025 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं.
संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली.

---

झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.