कवितेत भेटती डोह कधी
कधी कोडे सहज न सुटणारे
कधी आभासी जगतामधले
अस्पर्श्य, अलख, मोहविणारे
कधी लाट विप्लवी, विकराळ,
फेसाळ, किनारी फुटणारी,
शोषून उषेचे सर्व रंग,
नि:संग निळीशी उरणारी
कधी व्याधविद्ध मृगशीर्षासम
मिथकांशी पाऊल अडखळते
कधी चंद्रधगीच्या वणव्यातून
नक्षत्र वितळणारे दिसते
कधी ओळींच्या मधली जागा
अस्फुट ऊर्जेने लवथवते
शब्दातून अवचित ओथंबत
अलगद काही हाती येते