गाव, शहर आणि बरंच काही
नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं.