गाव, शहर आणि बरंच काही

अभिशेखि's picture
अभिशेखि in जनातलं, मनातलं
6 May 2015 - 9:49 am

नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं. त्यामुळेच कदाचित, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला जसा असतो तसा ह्याला ‘godfather’ नव्हता. ह्याच्या जीवाला न कधी आराम असायचा न कधी शांतता. दिवस संपून रात्र होते कधी आणि रात्र संपून दिवस उजाडतो कधी याचं भान त्याला नसायचंच. सगळ्या जगाचा जिवलग असा जो पैसा तो ह्याच्या नसानसांतून वाहायचा. दिवसरात्र कष्ट, काम आणि त्यातून येणारा पैसा ह्या जमिनीच्या तुकड्याची ओळख बनला. न थांबणारे प्रयत्न आणि न थांबणारा पैशांचा ओघ ह्यांनी त्याला आत्मविश्वास दिला. कानाकोपऱ्यातून त्याच्या आडोशाला त्याच्यासारखेच लोक यायला लागले. ‘workoholic’ अशी त्याची ओळख बनू लागली. पैशांचा ओघ चहुबाजुने येऊ लागला. आजूबाजूच्या जमिनींच्या तुकड्यांवर याने कधीच मात केली. पैशांच्या जोरावर ह्याने पाणी विकत घेतलं, वीज विकत घेतली. सारं काही मिळालं म्हणून तो थांबला नाही. त्याचा वेग मंदावला नाही. उलट तो अधिक जास्त मिळवत राहिला. लोकांना हा त्याचा ‘हव्यास’ वाटू लागला पण ‘godfather’ नसलेल्या एका जमिनीच्या तुकड्याला ‘survival’ साठी हे आवश्यकच होतं. त्याने ते केलं आणि लोक त्याला ‘शहर’ म्हणू लागले.
जमिनीचा असाच एक दुसरा तुकडा. त्यालाही सारं काही या तुकड्यागत मिळालेलं पण कदाचित योग्य ‘attitude’ मिळाला नसावा. आधीच्याला मिळाले तसे राबणारे हात मिळाले नसावेत.सगळ्यांना सामावून घेण्याची आणि समान संधी देण्याची गरज कळाली नसावी. संधीचा उपयोग करून घेण्यासाठी लागणारी चतुराई मिळाली नसावी. कष्टांची गरज आणि त्यातून येणाऱ्या पैशांची किंमत कळाली नसावी. नवीन गरजाच निर्माण न झाल्याने “हमारी जरूरते कम हैं ” म्हणण्यातच त्याला मोठेपणा वाटू लागला असावा. केव्हातरी त्या ‘शहरी’ जमिनीच्या तुकड्याकडे जाउन यायचं आणि आल्यावर “आम्हाला आमचाच तुकडा प्यारा” असं म्हणायचं हे ठरून गेलं होतं. आपल्या ह्याच ‘निवांत’पणामुळे आपला “गाव” कधी झाला हे त्या तुकड्याला कळलंसुद्धा नाही.

जमिनीचे असे तुकडे प्रत्येक देशांत असतात. काही ‘शहरं’ म्हणून ओळखले जातात काही “गाव” म्हणून. जमिनीच्या तुकड्यांमधला वर्गसंघर्षच असतो हा. शहर होण्यासाठी आधी गावाच्या गरजा बदलाव्या लागतात, विचार आणि दृष्टीकोण बदलावा लागतो. नुसते डांबराचे रस्ते बांधून आणि विजेच्या तारा टाकून गावाचं शहर होत नसतं. शेवटी प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला त्याचं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व असतं. म्हणूनच आपण कितीही ठरवलं आणि कितीही अभ्यासदौरे केले तरी कोकणचा कॅलिफोर्निया होत नाही, मुंबईचं शांघाय होत नाही, आहो इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं.

-अभिषेक राऊत.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

6 May 2015 - 12:49 pm | मास्टरमाईन्ड

इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं

परफेक्ट

एस's picture

6 May 2015 - 12:54 pm | एस

परफेक्ट.

जमिनीच्या तुकड्यांचे नशिब .. मस्त कल्पना.. लेखन आवडले

एक एकटा एकटाच's picture

6 May 2015 - 1:45 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

सौन्दर्य's picture

6 May 2015 - 11:27 pm | सौन्दर्य

चारी बाजूने वेढलेला समुद्र हा, ह्या 'शहर' म्हणविणार्या जमिनीच्या तुकड्याचा गॉडफादरच तर होता. ह्या समुद्रामुळेच ह्या जमिनीच्या तुकड्याचे नशीब पालटले आणि कितीही प्रयत्न केला तरी प्रतिरूप बनू शकले नाही.

इतकंच काय दुसरी अगदी तशीच्या तशी मुंबैसुद्धा तयार होत नाही तिला ‘नवी मुंबई ‘च म्हणावं लागतं

हा हा हा..

तशी उदाहरणे अमेरिकेच्यासंदर्भात सापडतील बरीच. म्हणजे असं की, मूळचं इंग्लंडमधलं यॉर्क राहिलं एवढुस्सं आणि त्याच्या नावावरुन बनलेलं न्यू-यॉर्क एवढं मोठ्ठं बनलं की लोक त्यालाच जास्त ओळखू लागलेत.
असं इंग्लंडमधल्या बर्‍याच गावांच्या बाबतीत घडलंय. त्या नावाची ठिकाणं अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे मोठी शहरं बनलीत आणि मूळ ठिकाणं मात्र छोटीशीच आहेत अजून.. :)

hitesh's picture

7 May 2015 - 6:07 pm | hitesh

मुम्बै म्हणजे हस्तिनापुर आहे.

नवी मुम्बै म्हणजे इंद्रप्रस्थ .

......

सव्वा गुंठा खांडववनाचा मालक !