काही दिवसांपूर्वी मी ओमान मधल्या शिक्षण खात्याच्या एका बैठकीला उपस्थिती लावली. विषय शैक्षणिकच होते. त्या बैठकीला मस्कत मधल्या सर्व खाजगी आणि आंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नेहमीचे शैक्षणिक विषय चर्चिले गेल्यावर शंका समाधान आणि समस्या निवारणाचा कार्यक्रम पार पडला. जे काही अमेरिकन आणि ब्रिटीश शाळांचे प्रतिनिधी होते त्यांनी अशी समस्या उपस्थित केली कि शिक्षण खात्याची जी परिपत्रके असतात ती अरेबिक मधून पाठवली जातात. आम्हाला ती इंग्रजीत भाषांतरित करून घ्यावी लागतात. हा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी शिक्षण खात्याची परिपत्रके हि इंग्रजीतून पाठवण्याची सोय करावी. सरकारी शिक्षण खात्याकडे भाषांतर करण्यासाठी दुभाष्याची सोय नसेल तर शहरात जे भाषांतर करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून भाषांतर करून परिपत्रके पाठवावीत. त्यावर शिक्षण खात्याच्या ज्या सरसंचालिका महोदया होत्या ( ज्या स्वतः उत्कृष्ट इंग्रजी बोलत होत्या) त्यांनी सांगितले कि “अरेबिक” हि ओमान ची राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे बैठकीचे कामकाज हे सुरुवातीला अरेबिक मधूनच सुरु होईल आणि नंतर लगेच त्याचा अनुवाद सर्वांसाठी इंग्रजीतून केला जाईल. तसेच केवळ शिक्षण खात्याचीच नव्हेत तर सर्व सरकारी खात्याची अधिकृत पत्रके अरेबिक मधेच प्रसृत होतील. शिक्षण संस्थाना त्यांच्याकडे दुभाषक नेमून ति भाषांतरित करून घ्यावी लागतील.त्याच प्रमाणे शिक्षण खात्याशी करावा लागणारा पत्रव्यवहार हासुद्धा अरेबिक मधेच करावा लागेल. हे सर्व संस्थांसाठी अनिवार्य आहे! इंग्रजीतून येणारे कोणतेही पत्र स्वीकारले जाणार नाही किंवा त्याला प्रतिसाद सुद्धा दिला जाणार नाही.
एवढेच नव्हे तर ओमान ची संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या स्वागत कक्षात “ओमानी कॉफी (खास अरेबिक सुरई मध्ये) आणि खजूर” हे ठेवलेच गेले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी होते कि नाही यावर सुद्धा लक्ष ठेवण्यात येईल. (आणि खास अधिकाऱ्यांकडून ते नियमितपणे तपासले जाते.) आपण ओमान मध्ये आहात आणि इथली भाषा आणि संस्कृतीचा आदर करणे सर्वांवर बंधनकारक आहे!
आज महाराष्ट्र दिन. आपल्याकडे मराठीचा असा आग्रह धरणे कठीण आहे का?
जय महाराष्ट्र!!
जय महाराष्ट्र!!
गाभा:
प्रतिक्रिया
1 May 2015 - 10:26 pm | सतिश गावडे
व्यवहारात व्हायला हवे तसे. मात्र सरकारी कागदपत्रांच्या बाबतीत नको. सरकारी कागदपत्रांमधील मराठी कळत नाही हो अजिबात.
1 May 2015 - 10:32 pm | श्रीरंग_जोशी
आपले सांस्कृतिक औदार्य हे आपले शक्तिस्थळ आहे असे मला वाटते.
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!!
1 May 2015 - 11:07 pm | उगा काहितरीच
काही अंशी सहमत , पण याच सांस्कृतिक औदार्यामुळेच जर संस्कृती नष्ट होत आसेल तर ?
1 May 2015 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी
काळाबरोबर काय काय टिकून राहणार. काळाबरोबर संस्कृती प्रगल्भ होत रहायला हवी.
शेवटी प्रत्येक गोष्ट कधी ना कधी नामशेष होणारच त्यामुळे या गोष्टीची काळजी करत बसणे व्यर्थ आहे.
1 May 2015 - 11:56 pm | उगा काहितरीच
बुद्धीला पटतेय हो . पण मनाला नाहीना पटतेय . जाऊ द्या ! तुका म्हणे उभे रहावे । जे जे होई ते ते पहावे ।।
4 May 2015 - 12:54 pm | राही
संस्कृती नष्ट होत नसते; ती बदलत असते, उत्क्रान्त होत असते.
दोन हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आज नाही, दोनशे वर्षांपूर्वीची नाही, अगदी वीस वर्षांपूर्वींचीही नाही.
1 May 2015 - 11:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आग्रह हवा पण अतिरेक नको रे शशीभूषणा.ओढून ताणून शब्द बसवण्यापेक्षा भाषा सोपी,सुतसुटीत कशी राहील ह्यावर लक्ष हवे असे ह्यांचे मत.
आप्ले भाषेचे आग्रही लोक तामिळनाडूचा दाखला देतात. हिंदीला नाक मुरडून असे काय पराक्रम केले ह्या लोकांनी?
2 May 2015 - 9:45 am | सतिश गावडे
तमिळनाडूत काय होतं हे माहिती नाही मात्र पुण्यातील बरेच तमिळ सहकारी व्यवस्थित हिंदी बोलतात. काळाची पावले बहूधा ओळखली असावीत त्यांनी. किंवा त्यांचा पीळ आपल्या राज्यात कायम असावा. बाहेरच्या राज्यात नाईलाज म्हणून हिंदी बोलत असावेत.
जाता जाता, हिंदी राष्ट्रभाषा नाही असं म्हटलं की उत्तर भारतीय चवताळतात. बहूधा हिंदीला राष्ट्रभाषा मानणं हा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असावा.
2 May 2015 - 12:04 am | वेल्लाभट
उसासा ~
2 May 2015 - 3:59 am | सौन्दर्य
मराठी भाषेचा आग्रह धरणे आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी, पण ती मराठी क्लिष्ट नको, सगळ्यांना समजेल अशी साधी-सोपी-सरळ असावी. जर मराठीचा आग्रह धरला नाही तर मराठी, हळूहळू का होईना नक्कीच नामशेष होईल.
2 May 2015 - 5:41 am | अत्रन्गि पाउस
सगळाच प्रोब्लेम आहे ...
पण तुम्ही म्हणताय ते वह्यला हवे आहे ...
2 May 2015 - 8:37 am | नाखु
इतक आणि इतकंच फक्त भारतात झालं तरी पुष्कळ आहे. मूळ पूर्वांचलमधील पण सध्या शिक्षण्-नोकरी निमित्त राहणार्यांना चिनी-नेपाळी न म्हणता प्रथम भारतीय म्हटले तरी पुष्कळ.
मातृभाषेचा अभिमान म्हणजे इतर भाषांचा दुस्वास+हेटाळणी नाही हे ठाम मत असलेला.
कानडीने केला मराठी भ्रतार फेम
अनुभवी नाखु
4 May 2015 - 12:24 pm | राही
आपण मराठीभाषक इतर भाषा आणि भाषकांना दुय्यम दर्जाचे लेखतो असेच माझेही निरीक्षण आहे.
हे लोक जर कधी आपल्याशी तोडक्या मोडक्या मराठीत बोलण्याचा प्रयत्न करू लागले तर 'किती हा गांवढळपणा'(खरे तर नीचभ्रूपणा )अशा दृष्टीने आपण त्यांच्याकडे बघतो. किंवा दुसर्या टोकाचे म्हणजे त्यांनी मराठीची अशी मोडतोड करू नये म्हणून आपणच त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलू लागतो.
2 May 2015 - 1:32 pm | सर्वसाक्षी
एका मराठी संस्थळावर चक्क मराठीचा आग्रह धरताय? नवसदस्य आहात का?
4 May 2015 - 12:51 pm | राही
कालच मुंबईच्या नेहरू तारांगणात छोट्या मुलांसह जाणे झाले.आग्रहाने मराठी खेळाची तिकिटे घेतली. आयत्यावेळी ठरल्यामुळे शेवटची सहा तिकिटे उरली होती ती मिळाली. वरळीसारख्या आडनिड्या ठिकाणचा मराठीतला खेळ 'हाउस्-फुल्ल्'असतो हे बघून छाती क्षणभर अभिमानाने फुलून आली, पण काही काळच. कारण, नंतर कळले की इंग्रजीतले खेळ दोन-दोन महिने आधीच 'बुक्ड'असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपापल्या विद्यार्थ्यांसाठी ते बुक करतात. असो. नंतर प्रत्यक्ष खेळ सुरू झाला आणि हाय रे दैवा. आधीच दीर्घिका, तेजोमेघ, कृष्णविवर,असे पारिभाषिक शब्द,(जे कदाचित अटळ होते)आणि त्यात संस्कृतनिष्ठ निवेदनाचा कहर. तेजामध्ये भूलोक न्हाऊन निघणे काय, शकले होऊन अंतरिक्षात विखुरणे काय, नभोगोल काय, स्वप्नमय सृष्टी काय, आठ दहा वर्षांच्या मुलांसाठी खरेच कठिण भाषा होती. आणि मुलांना 'ब्लॅक्-होल' हा व असे अनेक इंग्रजी शब्द माहीत होते.
मुले चक्क झोपल्री. सर्व वर्णने अलंकारिक भाषेत होती. यातल्या कितीतरी ठिकाणी साधी सोपी देशी क्रियापदे, शब्द वापरता आले असते.
शिवाय प्रिन्ट किंवा सीडी जे काही असेल ते, जुनाट होती आणि वारंवार व्यत्यय येत होता ते वेगळेच. नुसत्या संस्था अथवा इमारती बांधून भागत नसते, तर वारंवार देखभाल, डागडुजी, सुधारणा आणि पुनर्संपादन होणे गरजेचे असते, त्यासाठी आस्था लागते, आस्थेवाईक कर्मचारी लागतात हे पुन्हा कितव्यांदा तरी नव्याने कळले.
4 May 2015 - 12:55 pm | संदीप डांगे
शब्द माहित असणे आणि अर्थ माहित असणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे नाही का? कृष्णविवर म्हटल्याने समजले नाही आणि ब्लॅक-होल म्हटले की चटकन समजते असे काही आहे काय? इथे भाषेपेक्षा संकल्पना समजावून सांगण्याची हातोटी आणि इच्छा महत्त्वाची आहे असे मला वाटते. डिस्कवरी वैगेरे वर असे कार्यक्रम बघितले आहेत. ब्लॅक-होल आणि तत्सम गोष्टी ते लोक चित्र-भाषेतून व्यवस्थित समजावून सांगतात.
मलातर कितीतरी वेळा वाचून अभ्यासून ब्लॅक-होल आणि रिलेटीवीटी अजूनही पुर्णपणे समजले नाहीत. मला सगळ्या संज्ञा मराठी-इंग्रजी दोन्ही भाषेत माहिती आहेत पण ज्ञान नाही.