माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती. बाबा जरा हळू चालले असते तर मला प्रत्येक वस्तू नीट बघता आली असती, परंतु बाबाच्या चालण्यावरून त्यांना ह्या गोष्टींमध्ये काही रस होता असे वाटत नव्हते, त्यांची नजर वेगळेच काहीतरी शोधत होते.