ती सकाळ आणि ती!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
1 Sep 2015 - 10:32 am

भाळातली चांदण्याची आरास पुसट होत चालली होती. रात्रीचा खेळ संपवून माघारी चाललेल्या चांदण्यांमधल्या काही उगाच मागे रेंगाळल्या होत्या. वारा कधी झाडांवरच्या पानांबरोबर तर कधी खाली निवांत पहुडलेल्या पाला-पाचोळ्यांबरोबर खेळत होता. धुकही आता आजूबाजूच्या परिसराला मिठीत घ्यायला लागल होत. बाहेर भिरभिरणारा वारा आता शिरीषच्या बेडरुमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आत शिरला व शिरीषच्या तोंडावर झुलणा-या चादरीच्या टोकाला धरून हलवू लागला. एरवी सकाळचे आठ वाजलेले असतानाही कुणी अंगावरच्या चादरीला हात लावला तर वैतागणारा शिरीष आज वा-याच्या मस्तीने जरासा सुखावला व पापण्यांची उघडझाप करीत डोळे उघडून बेडवर बसला. त्याने बाहेर एक नजर टाकली. ना सूर्याचा प्रकाश ना रात्रीच्या खुणा, असे काहीसे धुंद वातावरण बाहेर तयार झाले होते. भिंतीवरच्या घड्याळात बघताच, ब-याच दिवसांनी सकाळचे साडेसहा बघतोय हे त्याला जाणवले. स्वत:शीच हसत तो उठला व बाथरूमकडे रेंगाळत चालू लागला.

तसे पाहता आज घरात त्याला झोपेतून जाग करणार कुणीच नव्हत. आई-बाबा काल रात्रीच नागपूरला त्यांच्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेले होते. त्यांनी बाहेर फिरण्याचा चांगला आठ दिवसांचा कार्यक्रम आखला होता. छोटा भाऊ अभयही कॉलेजच्या सर्व्हे ट्रीपसाठी दक्षिण भारतात चार दिवसांसाठी गेला होता. एकूणच, कितीही वेळ झोपण्याची आयती संधी मिळालेली असतानाही एव्हाना त्याने निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देउन तसेच तोंडाला पाण्याची भेट घडवून द्यायचे काम पार पाडले होते. वेगळीच उर्जा मिळाल्याचे त्याला स्वत:ला वाटत होते. पुन्हा एकदा त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. रस्ता खर्र-झर्र अशा तालात झाडणारी एक बाई, सायकलला पुढे आणि पाठीमागे पेपरचा गठ्ठा लावून जाणारा मुलगा आणि देवळाच्या समोर उजव्या बाजूला असणा-या हार- फूल वाल्याची सकाळची लगबग पाहून त्याने बाहेर 'वॉकला' जायचे ठरवले. असा एवढ्या सकाळी ब-याच वर्षात क्वचितच तो बाहेर पडला असेल. त्यामुळे 'वॉकचा' त्याला विशेष अनुभव नव्हता. नेमके कुठपर्यंत चालत जावे या विचारात असतानाच त्याला सुचल की, सकाळचा पेपर घरी यायच्या आत आपणच तो नाक्यावरच्या किशोरभाउंकडून कलेक्ट करू आणि घरी चहाची खटपट करायच्या ऐवजी कोप-यावरच्या 'मॉर्निंग कॅफे' नावाच्या छोट्या हॉटेलात बसून पेपर वाचता-वाचता चहा घेऊ. अशी 'वॉक'ची मस्त कल्पना डोक्यात आल्याबद्द्ल तो स्वत:वरच जाम खूष झाला. मग टेबलाच्या खणातून घड्याळ काढून हाताला चिटकवीत, चष्मा डोळ्यावर चढवित आणि पाकीट नाईट पॅंटच्या खिशात टाकीत उत्साहाने तो घराबाहेर पडला.

फ्लॅटला कुलूप लावत असतानाच शेजारच्या मिसाळकाकूंनी त्याला आवाज दिला, "शिरीष! अरे वंदनाताई बाहेरगावी गेल्यात ना? ये ना मग चहासाठी!" शिरीषला 'मॉर्निंग वॉक' 'मॉर्निंग टॉक' मध्ये बदलत असल्याच चित्र त्याला दिसू लागल! याच कारण म्हणजे मिसाळकाका वनविभागाचे निवृत्त आधिकारी असल्याने त्यांच्याकडे सांगण्यासारख खूप काही असे. पण, मिसाळकाकूंना बोलण्यासाठी कधीच कुठल्या पात्रतेची आवश्यकता वाटलेली नव्हती आणि शिरीष हे पुरेपूर जाणून होता. दोनच सेकंदात भानावर येत शिरीष म्हणाला, "नको काकू, थॅंक्स! सकाळी-सकाळी जरा बाहेर फिरून येतो, बाहेरच वातावरण अगदी मस्त झालय!" "अरे वा! चांगल आहे! सकाळी-सकाळी फिरण हे आरोग्यासाठी केव्हाही चांगल! मी पण आमच्या ह्यांना हेच्च सांगत असते नेहमी. आत्ताच ह्यांना बोलले, बाहेर बघा कश्शी गुलाबी थंडी पडलीये, पण आमचे हे! मुलखाचे आळशी!" आता काकूंनी वेगळाच राग धरलाय हे ओळखून शिरीषने लिफ्टकडे बघितलेही नाही आणि ताबडतोब जिन्याचा रस्ता पकडला व पाठमोराच, "अच्छा काकू, मी निघतो" असे म्हणत सटकला. एक मजला उतरेपर्यंत, "परत आला की ये, मस्त कांदेपोहे बनवून ठेवते!" हे शब्द फेरीवाल्याच्या आरोळीसारखे त्याच्या कानावर आदळले. मिसाळकाकूंनी एवढी विचारपूस करण्यामागे त्यांची ती सांगलीची भाची 'निलाक्षी' आहे हे त्याच्या डोक्यात क्षणभर घोळले, क्षणभरच! कारण, बिल्डींगचा शेवटचा जिना उतरून फाटकापर्यंत चालत येताना, आजूबाजूच्या विरळ होत चाललेल्या धुक्याच्या मोहक गारव्याने त्याला एकदम बरे वाटले व सगळे विचार केसांना कुरवाळीत वा-याबरोबर उडून गेले.

रस्ता अगदी रिकामा होता. एक-दोन पायी चालणारे आणि दोन-तीन व्यायामासाठी पळणारे आणि पुढच्या गल्लीच्या वळणावर थांबलेला रिक्षा एवढीच गर्दी होती. जाताना डाव्या हाताच बाप्पाच मंदीर, त्याच्यापुढची छोटीशी बाग, बाजूला एक पाणपोई, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठराविक अंतरावर मांडलेले बेंच, त्यांच्यावर त्यांच्यापाठीमागे उभ्या चाफ्याच्या झाडांमुळे सांडलेली पांढरी-पिवळी फुले तसेच जाड मोठ्या आकाराची गर्द हिरवी पाने या सगळ्यांमुळे हा परिसर आपण पहिल्यांदाच असा अनुभवतोय अस त्याला वाटल! एरवी इथूनच रोज सकाळी बाईकवरून ऑफिसला जाताना त्याला, कसे पटकन या गल्ली-बोळ आणि कोनाड्यातून बाहेर पडून हायवेवर जाऊन पोचतो अस व्हायच! पण आता याक्षणी तर त्याला इथूनच चालताना खूप प्रसन्न वाटत होत. अगदी अंघोळ केलेली नसतानाही त्याला फ्रेश वाटू लागल होत!

चालता-चालता कधी नाक्यावर पोचला ते त्यालाही कळल नसाव कारण, "काय शिरीषराव! आज सकाळी-सकाळी?" या किशोरभाउंच्या त्याच्याकड न पाहता सराईतपणे पेपरचे गठ्ठे बांधत असताना विचारलेल्या प्रश्नाने त्याची तंद्री भंग पावली. मग भानावर येत, "काही विशेष नाही, आलो जरा, तुम्ही काम व्यवस्थित करता का नाही ते पहायला!" त्याच्या या बोलण्यावर दोघेही हसले. मग किशोरभाउंनी पुन्हा सराईतपणे इकडेतिकडे हात चालवत त्या पेपरांच्या ढीगातून एक सकाळ आणि एक टाईम्स दुमडून त्याच्याकडे न पाहता त्याच्यासमोर धरला. ती पेपरची गुंडाळी शिरीषने बगलेत मारली आणि तो परत माघारी 'मॉर्निंग कॅफे' कडे वळला.

कॅफेमध्ये शिरताच काउंटरजवळून जाताना अगरबत्तीच्या सुवासाने त्याचे झकास स्वागत केले. त्या दरवळातून जाताना त्याच्या मनात त्याला 'सायकल अगरबत्ती' असे जाहिरातीतल्या सारखे उद्गार ऐकू आले आणि तो स्वत:शीच हसला. कॅफेचे मालक देवपूजेत व्यस्त होते आणि दोन वेटर टेबल लावण्यात आणि पुसण्यात. बाहेरच्या बैठकीत उजव्या बाजूच्या शेवटच्या रांगेतला रस्त्याच्या बाजूचा कोप-यावरचा टेबल त्याने निवडला. बाहेरची बैठक सर्व बाजूंनी खुली असल्याने त्या सकाळचा तो मस्त गारवा त्याला अजून मनभरून अनुभवता येणार होता. एक प्लेट उतप्पा आणि एक चहा अशी ऑर्डर देउन त्याने पेपर चाळायला सुरूवात केली. बाहेरच्या वर्दळीने अजून जोर धरला नव्हता तेवढ्यात 'मॉर्निंग कॅफे' च्या त्या तीन लाकडी पाय-या टप्ट्प वाजवत एक मुलगी झपाट्याने आत शिरली. शिरीषचे त्या आत येणा-या दरवाजाकडे लक्ष नसले तरी डोळे आपोआप त्या दिशेला वळले.

पंचविशीतली तरूणी असावी. मोकळे सोडलेले पण व्यवस्थित केस, खांद्यावर रुळणारे. डार्क मरून, खूप सारी एम्ब्रोयडरी केलेला top त्यावर ब्लॅक जॅकेट आणि Levi's जीन्स! खांद्यावरची झोळीवजा पर्स टेबलावर आदळत तीही खुर्चीवर जवळजवळ आदळलीच! नेमके आजच पेपरमध्ये विशेष काहीच नाहीये असे शिरीषला मनापासून वाटले! तिच्या या धांदलीमुळे शिरीषला तिला नीट पाहता आले नाही पण याच धांदलीमुळे त्याला तिला पाहण्याची इच्छा मात्र झाली. तिच्या देहबोलीवरून ती वैतावलेली आहे हे कुणीही सांगू शकले असते. पण शिरीषला त्याचे काय? तो आपला भान हरपून त्या सुंदर दृश्याकडे पाहू लागला. काही वेळानंतर आपल्या आजूबाजूला कोणी आहे अस वाटून त्या मुलीचे लक्ष शिरीषकडे गेले. तर शिरीष तिच्याकडे जणू आजूबाजूला कुणीच नाहिये अशा, फक्त ती आणी हा स्वत: एवढेच दोघे आहेत आणी पाठीमागे कुठेतरी मस्त रोमॅटींक म्युजीक वाजतय अशा थाटात तोंडाचा आ तसाच ठेवून तिच्याकडे बघत होता. तिची नजर त्याच्याकडे वळताच मात्र त्याला जणू शॉक बसला आणि गडबडीने त्याने पेपर झटकला व त्यात पाहू लागला. त्याची ती धडपड तिला समजली असावी कारण आधीच त्रासलेल्या तिच्या मुद्रेवर अजून एक त्रासिक रेष उमटली.

व्यवस्थित बसून झाल्यावर तिने डाव्या बाजूला मान वळवून वेटरला ऑर्डर सोडली, "एक कॉफी, प्लीज!" गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, पांढरे-टपोरे काजळावर भिरभिरणारे डोळे, सरळ नाक. अहाहा! एव्हाना एकदोनदा उतप्प्याऐवजी टेबलावर पसरलेला पेपरही खाउन झाला होता शिरीषचा. हे बहुधा तिने पाहिले कारण ती एकदा खुदकन हसलीसुद्धा! तिचे ते लाघवी स्मित पाहून शिरीषला त्याची स्वत:ची कविताच (लिहिलेली) आठवली! 'ती आहे लालपरी....' मनातल्या मनात या ओळी तो घोळवू लागला आणि लगेचच स्वत:वरच वैतागलाही, स्वत:लाच म्हटला, "नाही, ही नाही, ही थोडी सॅड आहे!" या त्याच्या बोलण्याच्या आवाजामुळे तिने त्याच्याकडे पाहिले, तो पुन्हा दचकला आणि पेपरात वाकला. मग दोन चार सेकंदानी पुन्हा नजर तिरपी करत त्याने दुसरी कविता आठवायला सुरूवात केली...'काव्य माझे घडते, अवघडते...', आता यावेळी तो एकदम दचकला, कावराबावराच झाला! 'एवढ्यात कशी गायब झाली ती? आता तर होती ना इथे! अरे यार!' अशा या विचारात असतानाच डावीकडे रस्त्याच्या बाजूला पाहिले असता ती पळत पळत एका टेम्पो ट्रॅव्हलर गाडीच्या दरवाजातून चढत असताना दिसली. शिरीषचा एकदम सॅड स्माईलीसारखा चेहरा झाला. कॅफेच्या काऊंटरवर असलेल्या देवाच्या फोटोकडे पाहत त्याने, "खुश तो बहोत होंगे तुम आज, हांय!" असा डायलॉगही, बच्चन स्टाईलने मारून टाकला.

आता नाष्टा संपवून शिरीष उठून काऊंटरवर बिल देण्यासाठी गेला. बिल देऊन मागे वळला तसा मघाच्या 'त्या' टेबलाकडे त्याच लक्ष गेल आणि काय आश्चर्य! त्या तरूणीची ती झोळीवजा पर्स तिथेच पडली होती! शिरीष या योगायोगावर भलताच खूष झाला. या पर्समध्ये नक्कीच तिच नाव, पत्ता असेल! फोन नंबरही असेल. कदाचित फोटोही! मग आपण तिला फोन करून कुठेतरी पर्स घ्यायला बोलवू किंवा पर्स द्यायला जाऊ किंवा कशाला, सरळ पत्त्यावरच जाऊ आणि तिच्या काळजीत पडलेल्या चेह-यावर चकाकी आणू. अशा अनेक गोड शक्यतांच्या भविष्यकाळाने त्याच्या वर्तमानाला गुदगुल्या करायला सुरूवात केली. काऊंटर कडे पाठमोरा राहत त्याने मागच्या कुणालाही शंका येणार नाही अशा सफाईने ती पर्स उचलली आणि झपाट्याने पाय-या उतरून खाली आला. तो त्या पर्सकडेच पाहत होता. खूपच खूष झाला होता तो.

तसेच पर्सकडे पाहत त्याने घराचा रस्ता पकडला. अचानक त्याला समोर कोणीतरी उभे राहून रस्ता अडवल्यासारखे वाटले. समोर पाहतो तर तीच! मघाची सुंदर तरूणी! त्याला एकदम घामच फुटला. आवंढा गिळत अडखळत तो तिला सांगू लागला "अहो....मी...तिथे तुमची....मी द्यायलाच...." तिने हात पुढे केला. त्याने तिच्या हातावर पर्स ठेवली. आता तिच्या चेह-यावर एकदम हसू फुटले आणि ती म्हणाली, "थॅंक्स हं!" तिच्या हसण्याने शिरीष थोडा नॉर्मल झाला आणि म्हणाला, "ओह! वेलकम!....मी शिरीष....मी इथे जवळच राहतो. इथे येत असतो सारखा... सकाळी सकाळी...." ती पुन्हा हसली व म्हणाली, "थॅंक्स अगेन, मी निघते माझ्या मैत्रीणी वाट पाहतायेत पुढच्या कॉर्नरला." आणि ती झपाट्याने त्याला ओलांडून निघून जाऊ लागली. काहीतरी हातातून निसटून चालल्यासारख वाटल शिरीषला. तो गडबडीत बोलला, "तुमच नाव?" ती चालता चालता पाठीमागे पाहत हसून म्हणाली, "निलाक्षी".

याक्षणी, आताच नाष्टा केलेला असतानाही शिरीषला कधी एकदा मिसाळकाकूंकडे जाऊन कांदेपोहे खातोय असे झाले! आता त्याची पावले त्याच्या बिल्डींगच्या दिशेला झपाझप पडत होती. शिरीषला 'ती सकाळ' आणि 'ती' प्रचंड फ्रेश वाटू लागली!

- संदीप चांदणे (३१/८/२०१५)

कथामौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

1 Sep 2015 - 10:48 am | मांत्रिक

सुरूवात तर जब्बरा! आत्ता पूर्ण वाचू शकत नाही. पण अगदी ताकदीचं लेखन. संध्याकाळी निवांत वाचणार.

मांत्रिक's picture

1 Sep 2015 - 11:00 am | मांत्रिक

वेळ नाही म्हणत म्हणत सर्व कामे बाजूला ठेवून वाचलीच. अगदी सुंदर लेखन. अंगावरून मोरपिसे फिरावित तशी गोग्गोड लव्ह अॅट फर्स्ट साईट प्रेमकथा.खूप आवडली.

चांदणे संदीप's picture

1 Sep 2015 - 8:27 pm | चांदणे संदीप

मांत्रिकजी, तुमच्या या प्रतिसादाने खूप काही मिळाल!

रातराणी's picture

1 Sep 2015 - 10:48 am | रातराणी

छान लिहिलंय. आवडलं :)

मितान's picture

1 Sep 2015 - 11:42 am | मितान

छान :)

एस's picture

1 Sep 2015 - 12:01 pm | एस

हाहाहाहा!

क़ाश! :-)

सिरुसेरि's picture

1 Sep 2015 - 12:25 pm | सिरुसेरि

छान भाग .. "मुंबई - सांगली - मुंबई" असा चित्रपट निघाला , तर सुरुवात अशीच .

संजय पाटिल's picture

1 Sep 2015 - 12:55 pm | संजय पाटिल

कथा छान आहे, पण सकाळी साडे सहालाच उत्तप्पा म्हण्जे जरा हेवी वाटतय. बाकी आपल्या आपल्या सवईंचा प्रश्न आहे.

बाबा योगिराज's picture

1 Sep 2015 - 2:12 pm | बाबा योगिराज

एकूणच, कितीही वेळ झोपण्याची आयती संधी मिळालेली असतानाही एव्हाना त्याने निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देउन तसेच तोंडाला पाण्याची भेट घडवून द्यायचे काम पार पाडले होते.

आवो यच्यात येळ गेला असन की वो....... ७:०० - ७:१० तरी झाले असतीलच की...............

अवांतरः- ह. घ्या............

मांत्रिक's picture

1 Sep 2015 - 2:25 pm | मांत्रिक

हा हा हा!!!

मित्रहो's picture

1 Sep 2015 - 2:05 pm | मित्रहो

मस्त कथा

पद्मावति's picture

1 Sep 2015 - 2:30 pm | पद्मावति

वाह अतिशय फ्रेश प्रेमकथा.
मस्तं वाटलं वाचून. क्रमश: नाहीये का? ही कथा विस्तारीत रूपात वाचायला आवडेल.

चांदणे संदीप's picture

1 Sep 2015 - 8:36 pm | चांदणे संदीप

माफ करा...या कथेचा विस्तार / क्रमश: अस काही ठरवल नव्हत... स्कोप आहे खरा. पण 'थोड्यात गोड' असा विचार करून बाकी विचारांना फुलस्टॉप दिलेला आहे.

तुम्हाला कथा आवडली याचा खूप आनंद आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

1 Sep 2015 - 8:29 pm | चांदणे संदीप

मांत्रिकजी, तुमच्या या प्रतिसादाने खूप काही मिळाल!

चांदणे संदीप's picture

1 Sep 2015 - 8:52 pm | चांदणे संदीप

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
मिपामुळेच मी एक मोठ्ठा गॅप घेऊन परत लिहिता झालोय. मिपासही पुन्हा पुन्हा धन्यवाद!

अवांतर : माझे काही प्रतिसाद दोनदा प्रकाशित होत आहेत, कारण कळेना! मी स्वत: ते काढून टाकू शकतो की, संपादकांना विनंती करावी लागेल?

मदतीच्या प्रतिक्षेत असलेला :(
Sandy

यशोधरा's picture

1 Sep 2015 - 8:57 pm | यशोधरा

संपली कथा? अर्र!

कथा आवडली. उगीच हाणामारीचे धागे वाचण्यापेक्षा नक्कीच छान वाटले.

उगा काहितरीच's picture

2 Sep 2015 - 1:16 am | उगा काहितरीच

छान फ्रेश कथा ... आवडली.

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 1:37 am | प्यारे१

क्रमश: नाही काय????
बघा की ज़रा शेटीङ्ग लावून काय जमतंय काय?
हिरविनीचं नाव आडौलं. नीलाक्षी. लेन्स लावती काय ओ?

अर्धवटराव's picture

2 Sep 2015 - 3:48 am | अर्धवटराव

:)

काकुंनी मुद्दाम पाठवली का तिला ? :)

स्पंदना's picture

2 Sep 2015 - 5:23 am | स्पंदना

फ्रेश फ्रेश लिखाण.
आवडल. सुरवातीच वर्णन फारच छान जमलय, फक्त वेळ जरा गंडलीय. ५ किंवा साडेपाच म्हणा.

नाखु's picture

2 Sep 2015 - 10:34 am | नाखु

जवानी जानेमन हसीन दिलरूबा ! शिकार खुद यहां शिकार हो गया !!

लीना घोसाळ्कर's picture

2 Sep 2015 - 12:53 pm | लीना घोसाळ्कर

मस्त वर्णन.

जातवेद's picture

2 Sep 2015 - 3:11 pm | जातवेद

मूड रिफ्रेशर!

मि पा वरील 'कर्तव्य' असलेल्यांपैकी निदान १ - २ जण तरी आता पहाटे उठुन बाहेर फिरायला जातील.

जव्हेरगंज's picture

20 Jan 2016 - 12:26 am | जव्हेरगंज

परफेक्ट जमलयं की राव!

अजून लिहा या टाईपचं काहितरी!!

चांदणे संदीप's picture

20 Jan 2016 - 8:04 am | चांदणे संदीप

धन्यवाद जव्हेरभाऊ! ___/\___
लिहिणे सुरूच आहे. फक्त चमकवायला वेळ मिळत नाहिये. :(

बादवे, तुमच्याकडे थंडी जास्तच पडलीये का? येऊद्या झक्कासपैकी.... थंडीत गरमागरम सूप पिल्यासारखं वाटेल असं काहीतरी! :)

Sandy

अभय म्हात्रे's picture

20 Jan 2016 - 8:49 am | अभय म्हात्रे

लिखाण मस्तच आहे. खुप आवड्ले.

प्रतिक कुलकर्णी's picture

20 Jan 2016 - 9:08 am | प्रतिक कुलकर्णी

व्वा ! फारच सुरेख लिखाण :)

अनुराधा महेकर's picture

20 Jan 2016 - 9:35 am | अनुराधा महेकर

मस्त! एकदम फ्रेश!

ब़जरबट्टू's picture

20 Jan 2016 - 10:08 am | ब़जरबट्टू

अगदी आवडली...

बाकी अगदी अंघोळ केलेली नसतानाही त्याला फ्रेश वाटू लागल होत या वाक्याचा आमच्याकडून जाहीर निषेध !!!!
अंघोळीची गोळी घेऊन फ्रेश असणारा ...

चांदणे संदीप's picture

20 Jan 2016 - 10:23 am | चांदणे संदीप

नवीन वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार!
:)

Sandy

एक एकटा एकटाच's picture

20 Jan 2016 - 11:09 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलीय

आवडली

अजुन येउद्यात

हेमंत लाटकर's picture

20 Jan 2016 - 12:04 pm | हेमंत लाटकर

छान लेख.
मिसाळकाकूचा प्लॅन तर नसेल. :)