बालपण
असंच एकदा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो. चालता चालता नजर रस्त्याबाजूच्या एका छोटयाश्या इमारतीवर गेली. ती छोटी इमारत दुसरं तिसरं काही नव्हे तर एक शाळा होती. शनिवारचा दिवस होता, अर्थात सकाळची शाळा. तो तास खेळाचा होता बहुतेक. छोटयाश्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काही मुली घोळका करून उन्हात उभ्या होत्या, काही उत्साही मुलं शाळेच्या आवाराची साफसफाई करत होते. काही जण झाडांना पाणी घालत होते. तर काही मुलं आबाधुबीच्या नावाखाली आपले हात साफ करत होती. हे सगळं पाहताना दोन क्षण सुखावलो. स्तब्ध, एकाग्रतेने त्या बालपणातल्या निरागस हालचालींच निरीक्षण करत असताना मी काहीसा भूतकाळात गेलो.