उन्हाळी उद्योग ३

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 6:56 pm

छोटा मृदुल (microsoft) जसा दर एक दोन वर्षांत काही तरी नव - नवीन आकर्षणे देत रहातो, तसे काही तरी आमच्या उन्हाळी उद्योगांत करत राहावे लागणार हे आमच्या - म्हणजे मी आणि "सौ", किंवा आमच्या बालचमूच्या दृष्टीने "आबा" आणि "आजी" - कधीच लक्षात आले होते, पण ते प्रत्यक्षात आणण्याकरता हा उन्हाळा लागला.

उन्हाळी उद्योग या बद्दल अपरिचित असलेल्या वाचकांकरता: प्रत्येक उन्हाळ्यात जे "आबा" आणि "आजी" अमेरिकेत काही काळ तरी नातवंडांबरोबर घालवतात त्यांच्याकरता हे उद्योग (नातवंडांबरोबर करण्याकरता) प्रबोधन आणि मनोरंजन अशा दोन्ही दृष्टीने सुचवले होते. घरातल्या टाकाऊ वस्तू वापरून लुटुपुटीचे दुकान तयार करून, तिथे होणाऱ्या व्यवहाराच्या आधारे थोडेसे व्यावहारिक अंकगणित नातवंडाना जास्त ओळखीचे व्हावे हा उद्देश होता.

या आधी लिहिताना, (त्या वेळी) आमच्या "दुकानातील" दुकानदार फक्त वय वर्षे सहा इतका (खरे म्हणजे इतकी) "तयार" असल्याने (आणि धाकटे भावन्ड वय वर्षे ३ चे) असल्याचे सांगितलेच आहे. त्यामुळे त्यावेळी दुकानात काही खास गोष्टीन्ची काळजी घ्यावी लागत असे - जसे दुकानदाराला(खरोखरीच) कुणाच्याही डोक्यावर चढू न देणे. पण त्यापेक्षा आता परिस्थिती बरीच बदलेली होती. बदललेल्या परिस्थितीनुसार काय बदल करावेत हे ठरवणे छोट्या मृदुलला देखील कठीणच गेले असते! दोन्ही नातींची (आता मोठी वय वर्षे आठ आणि धाकटी जवळ जवळ पांच) आवड-निवड वेगळी, वैचारिक कुवत वेगळी पण खेळ एकच हवा तरच सगळयांना एकत्र खेळता येईल!

त्यामुळॆ खेळता खेळता विचारांती खेळ थोडा थोडा बदलत राहिला - वेळ वाचवण्याकरता दुकानात विक्रीकरता ठेवण्याच्या वस्तू "बनवण्या" ऐवजी "तयार"च घेतल्या. त्यांच्याच खेळण्यात असलेल्या बऱ्याच रोजच्या वापरातल्या वस्तूंचा (प्लास्टिकमधल्या प्रतिकृती) एक ढिगारा समोर घेऊन सुरवात केली. आळीपाळीने दोन्ही नातीना त्यातली प्रत्येक वस्तू "dairy", "bakery", "fruits", "vegetables" अशा वेगवेगळ्या भागांत (जसे एखाद्या सर्व वस्तू भाण्डारात असते आणि जे दोघीनीही प्रत्यक्ष पाहिलेले होते) विभागायला सांगितले. मोठीला बऱ्यापैकी जमत असल्यामुळे (की ज्याची आम्हाला कल्पना होतीच), धाकटीला जेंव्हा निवडायची वेळ आल्यावर मदत लागे तेंव्हा मदत करण्याची जबाबदारी मोठीवर टाकली, त्यामुळे "भांडू नका" हा मंत्र जपावा लागला नाही. त्यामुळे खेळाला सुरवात तर चांगली झाली.

दुकानातला माल तर जमला पण वेगळेपणा कसा जमवावा? दोघींच्या वकुबाचा मेळ कसा बसवावा?

मग "double role technique" चा उपयोग करावा लागला. दोघीही दुकानात जाऊन खरेदी करू लागल्या तर कुणी काय मिळवावे/घ्यावे हाच वादाचा मुद्दा ठरू शकत असल्यामुळे खरेदी फक्त आजी आणि आबाच करतील असे ठरले. मोठीचा "additional role" किंमती ठरवणे (ज्या सोयीकरता पांचाच्या पटीत ठेवल्या) आणि "cashier" म्हणून सगळे पैशाचे व्यवहार पहाणे आणि धाकटीचा "additional role" (ज्यामुळे खेळ जास्त रंगला - पुढे विस्तृत माहिती आहे) "स्वैपाक घराची व्यवस्था" आणि आबांना मदत.

"cashier" ला "incentive" म्हणून बाबांचा (खऱ्या खुऱ्या ) नाण्यांचा डबा वापरायला दिला आणि त्यामुळे "cashier" चा रुबाब भलताच वाढला. आबांना मदत लागणार असें आबांनी आधीच घोषित केल्याने आबा जी वस्तू विकत घ्यायला निघत, ती "बाजारातून" प्रत्यक्ष (त्यांच्याकरता) आणण्याचे काम धाकटीचे ठरले. आबांना "स्वैपाक" (आणि इतरही बऱ्याच गोष्टी जसे बाहुलीचे कपडे बदलणे) जमत नाही पण आजीला काहीही करता येते ही आजी-आबांची कीर्ती सर्वत्र होतीच त्यामुळे जेव्हा आबांनी (धोरणीपणे खेळ सुरू झाल्यानंतर समजलेल्या माहितीवर आधारित) जाहीर केले की आबांकरता दुकानातून आणलेल्या वस्तूचे काहीही बनवायचे असल्यास ते छोटी करेल तेव्हा छोटीने ती ही आबांची जबाबदारी घेतली.

"cashier" ने रुबाबात नाण्यांचा डबा उघडला, नाणी बाहेर काढली, आजी आणि आबांना वापरायला म्हणून काही वाटून दिली आणि बरीच आपल्याकडे ठेवली आणि मग "cashier" - नाण्यांबद्दल अर्धवट आणि पुस्तकी माहिती असल्यामुळे पण नाणी प्रत्यक्षात क्वचितच वापरल्यामुळे - गोन्धळला. प्रबोधनाची संधी मिळाल्यावर आजी आणि आबांनी "cashier" ला वेगवेगळ्या नाण्यांबद्दल पुन्हा खुलासा केला (२५ सेण्ट इ. इ. मूल्ये समजावून सांगितली). "cashier" ला अपूर्णांक माहिती नसल्यामुळे गोन्धळाला वाव राहू नये म्हणून असे ठरले की २५ सेण्ट, १० सेण्ट इ. इ. नाणी ही तेव्हढ्या डॉलरची धरावीत. हे सगळॆ (मोठीबरोबर ) चाललेले असताना, धाकटीला "दुकान नीट लावायला" सांगितलेले असल्याने तिचा "interest" टिकवून ठेवता आला, थोडीशी तिचीही नाण्यांशी ओळख झाली.

बाजार उघडल्यावर आजी आपली शहाण्यासारखी बाजारात आपली आपण गेलीआणि विकायला असलेल्या वस्तू बघू लागली. पण आजीला काय काय हवे असावे याबद्दल (आजीला काही बोलायला जागा न ठेवता मोठी आणि धाकटी यांच्यातच) वाद सुरू झाला. तो वाद मिटवत आबांनी वर सांगितल्याप्रमाणे आपला पवित्रा बदलला आणि आपल्याला आता "breakfast" (न्याहारी) हवी (आणि बाजारातल्या वेगवेगळ्या वस्तू नकोत) असे जाहीर केले. मग "आबांचा मदतनीस" याखेरीज "आबांना स्वैपाक करून घालणारी" अशी जास्त मोठी जबाबदारी घेऊन छोटीने वादाला काही जागा न ठेवता आबांकरता "टोस्ट व चीज" करायचे ठरवले, त्याकरता लागणाऱ्या वस्तू बाजारातून उचलल्या (मोठी पावाची लादी आणि चीजचा गोळा), त्याकरता द्यायचे पैसे आबांकडून मुठीत पकडून घेऊन संपूर्ण जबाबदारीने "cashier" कडे रुबाबात दिले आणि जे काही पैसे "cashier" ने परत केले ते तितक्याच रुबाबात (जरी हिशोब समाजाला नाही तरी) आबांना परत केले. जरूर लागेल तशी "cashier" ला आजी आणि आबांनी हिशोबात मदत केली. आबांच्या "breakfast" साठी "खुस्स", "खुर्र" असे वेगवेगळे आवाज काढत पावाची लादी कापली गेली. आणखी आवाज काढत चीजचे ही तुकडे झाले. आबांपुढे आलेला टोस्ट आणि चीज (म्हणजे दुकानातून आलेलीच लादी आणि चीजचा गोळा, पण एका थाळीतून पुढे ठेवलेला) आबांनी आणखी वेगवेगळे आवाज काढत फस्त करताना सगळ्यांचे मनोरंजन पण केले.

मग "आजीला काय हवे" या केलेल्या विचारणेला आजीने "नूडल्स" असे उत्तर देऊन जरी थोडी दाणादाण उडवली तरी फारसा वेळ न दवडता (अनपेक्षितपणे साधारण योग्य रंगाच्या विणण्याच्या लोकरीच्या एका धाग्याच्या स्वरूपात) "नूडल्स" मिळवल्या आणि शिजवल्या जाऊन (त्या जरी न शिजवताच आजीला हव्या होत्या तरी) आजीला मिळाल्या.

याच तऱ्हेने द्रौपदीच्या इच्छापात्राइतक्याच तत्परतेने आजी आणि आबांच्या वेगवेगळ्या वस्तू खाण्याच्या इच्छेला दाद मिळत गेली - मागितलेली खायची वस्तू तयार करायला काय काय लागेल (किंवा काय काय चालेल) हा विचार करत, त्या करता लागणाऱ्या वस्तू आधी दुकानाकरता पैदा करून (जसे वर उल्लेखलेला लोकरीचा धागा), मग त्या दुकानातून विकत घेतल्या जाऊन, त्याकरता लागणारे पैसे आजी आबांकडून घेतले जाऊन आणि दुकानात दिले जाऊन झटपट तयार खाद्यवस्तू पुढे येत गेल्या. करणाऱ्याना आणि खाणाऱ्याना दोघानाही वारंवार कल्पनाशक्तीचे सहाय्य घ्यावे लागले. आजी शाकाहारी असल्याचे विसरून तिला दिलेले तांबडे दिसणारे सॉसेज म्हणजे Tomato च कसा आहे हे पटवल्यानंतर कौतुकाने ते मानून घ्यावे लागले. जेव्हा cashier च्या लक्षात आले की एक एक वस्तू विकली गेल्यावर पुन्हा तीच वस्तू विकत घेणाऱ्याना ती पुरवता येत नाही तेंव्हा चाणाक्षपणे cashier ने फतवा काढून टाकला की घेतलेल्या वस्तूंचे खाद्य पदार्थ बनवून खाऊन झाले की सगळा कच्चा माल पुन्हा दुकानात (आणखी एकदा विकत घेण्याकरता) जमा करायला हवा. आबांनी जेव्हा त्याचे पैसे परत मागितले त्यालाही cashier ने (हिशोब पुन्हा करायला नको म्हणून धूर्तपणे) नकार दिला पण आणखी पैसे "तसेच" हवे असले तर उदारपणे (बाबांच्या डब्यातून) देऊ केले.

जशी जशी कल्पनाशक्ती वापरली गेली तसा तसा खेळ जास्त रंगला - धाकटीला "आबाना मदत" करता करता सगळ्यांना (तिच्या) मनाला येईल ते (ती ठरवील त्या पद्धतीने शिजवून) तयार करून खिलवता आले, मोठीचे अंकगणित, नाणी वापरण्याची सवय तर झालीच पण cashier चा रुबाबही झाला.

असा "भांडू नका" हा मंत्र जपावा न लागता साधारण पाऊण तास चाललेला खेळ, कंटाळा आल्याची चिन्हे दिसू लागता "आता आजी आबांचे पोट भरले" अशी घोषणा करून (त्या दिवसापुरता) थांबवला. या आवडी/कुवतीनुसार केलेल्या बदलाने छोटा मृदुल नक्की खूष झाला असता. वस्तू आणि नाणी जागेवर जाऊन, आवरासावर करून सगळे जण पांगले. Happy Cashier

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

हाहाहा! फार गोड आणि कल्पक! :-)

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 2:24 pm | पद्मावति

खरोखरीच गोड लिहिलय. उन्हाळ्यात मुलांना बिझी ठेवणं म्हणजे महाकठीण काम. जिथे आई ( माझा अनुभव) हात टेकते तेच काम मुलांचे आजी आबा अगदी सहजतेने करतात. तो पेशन्स बघून खरोखरच थक्क व्हायला होतं.

छान पण कस () कमि करता आले तर आनखि छान् होइल.

कल्पना आवडली.
भातुकली अधिक व्यापार ?