खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो.
एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत.
आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने. वेगळ्या, जाणकार मित्रांसोबत. जाताना वाटत होतं की खाडी म्हणजे आपली जुनी वाट असेल, आणि ही वेगळीच वाट पाहून थक्क झालो. आपल्या घराच्या इतक्या जवळच इतकं अप्रतिम निसर्गसौंदर्याचं भांडार आहे, आणि आहे तर आहे पण ते इतक्या जवळून अनुभवण्याची सोय उपलब्ध आहे हे मला एवढ्या उशीरा कळावं याची लाज वाटली. खूप चुकचुकल्यागत वाटायला लागलं.
अर्थात् स्वतःची लाज वाटून घेणं मी तात्पुरतं विसरलो. कारण एवढ्या सुंदर जागेत तिची जणू रंगत वाढवणारे, वाटेत जागोजागी माणसांच्या रंगीबेरंगी, आविष्कारी अशा विष्ठादानाचे मास्टर-फिसीस पडलेले दिसत होते. या कलाकृतीचा उपभोग घेण्यासाठी कित्येक माशा हावरटासारख्या घोंघावत होत्या. बिनडोक कुठल्या! मानवी निर्मितीची अशी वाट लावतं का कोणी? असंच करत राहिल्या तर त्या निर्मितीच्या अस्तित्वाची दूरदूरवर जाणीव करणारा घमघमीत सुगंध दिवसेंदिवस दरवळत कसा राहणार? ते विघटनाचं दुर्दैवी दृश्य सहन न झाल्यानं मी पुढे सरकलो.
बरीच चिमण्या पाखरं आजुबाजूला भिरभिरत होती. वेगवेगळे, चित्रविचित्र आवाज काढत होती. साध्या चिमण्या, प्रिनिया, मुनिया, साळुंक्या, अशा छोट्या पक्ष्यांचे छोटे-मोठे समूह आमच्या आगमनाची वर्दी देत दोन्ही दिशांना उडून जात होते. काळे करकरीत डोंगकावळेसुद्धा आमचं मोठ्या धिटाईनं स्वागत करत होते. झाडाझुडपांत, कुठेतरी आत लपून बसलेले, लाजरे-बुजरे भारद्वाज आणि कोकीळसुद्धा आमच्यासाठी स्वागतगीत गात होते. खारं पाणी अनेक छोटेखानी मासे आणि आम्हाला माहीत नसलेले कित्येक जीव दडवून बसलं होतं. मधूनच एखादा शिक्रा आम्हाला हूल देऊन पळत होता. आकाशात पाणकावळे शाळा सुटल्यावर मुलं जातात तसे आपापल्या जोडगोळीसोबत घरी जाताना दिसत होते.
वाटेत जागोजागी काही 'अवली' मंडळीही दिसली. काय ओढून कुठला धूर सोडत होती आणि कुठल्या बाटल्यांत काय मिसळून ढोसत होती ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. आपण कुठल्या जागेत वावरतोय, इथलं महत्त्व काय आणि किती आहे, याच्याशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. फक्त काड्या पेटवणं, इतकंच त्यांना येत होतं. अर्थात् इथे हे असं असतंच याची कल्पना आधीपासूनच होती. एकेकाच्या कानशिलात् ठेवून देण्याची इच्छा आतल्या आत दाबत ते तिथे नाहीच असा आविर्भाव आणत आम्ही पुढे जात राहिलो.
आम्हाला या खारफुटी जंगलाचा राजा शोधायचा होता. या राजाची खासियत निराळीच. या राजाला पाय नाहीत. लोकांत मिसळायची फारशी आवड नाही. सळसळत एंट्री आणि सळसळतच एक्झिट करायची हौस. ही सळसळ अगदी अंगावर काटा आणणारी. जवळ येणारा प्रत्येक जण पंगा घ्यायलाच येणार अशा समजुतीमुळे फारसं कोणाशी जमतही नाही याचं. शक्यतो राडा टाळायचा नाहीतर इंगा दाखवायचा असा याचा बाणा. आणि या बाण्याला साजेसा असाच याचा फणा. हा नागोबा आम्हाला पाहायचा होता. पण तो नाही तर निदान त्याच्या दरबारातले घोणस(रसल्स वायपर), ग्लाॅसी मार्श असे आणि इतर दिग्गज दिसले तरी आमची हरकत नव्हती. आम्ही पडलो गरीब जनता, कसंका होईना, काम झाल्याशी मतलब. पण या व्हीव्हीआयपी लोक्सांची अपाॅइंटमेंट इतक्या सहजासहजी मिळणं शक्य नव्हतं. शेवटी सरकारी मंडळी म्हटल्यावर खेटे घालायला लावणार हे उघडच होतं. तरीही माझ्या पायगुणानं दर्शन घडतं का हे पाहायला त्याच गुणी पायांना तुडवत आम्ही वाट काढत होतो.
वाट मध्येच अरूंद व्हायची, मध्येच वाटेतच काटेरी झुडपं यायची. दुतर्फा झाडांचा गोतावळा होताच. पहिल्यांदाच जात होतो म्हटल्यावर धास्ती होतीच मनात. अचानक एखादा प्राणी कुठूनतरी येऊन आपल्यावर झडप घालेल आणि अंगावर तुटून पडेल अशी भिती मनाला लागून राहिली होती. दिवस हिवाळ्याचे होते. झाडांची दाटी असली तरी, 'हे काहीच नाही. पावसाळ्यांत बघ खरी मजा' असं मला सांगण्यात येत होतं. बापरे. म्हणजे ही मंडळी मला पावसातही इथे घेऊन येणार तर! पण त्यासाठी आज इथून जिवंत परतलो पाहिजे ना. आला एखादा प्राणी अचानक समोर तर?
आणि त्याच विचारांत मी गुंतलेलो असताना समोर एक आकृती येऊन उभी राहिली. मी दचकलो. बाकीचे हसले. लहानसं कुत्रं होतं. मला वाटलं, याच्यापेक्षा नाग परवडला. मला कुत्र्यांची भिती वाटते खूप! पण माझे मित्र तर त्याला जवळ बोलवत होते, यु यु करत होते. एक जण तर त्याचेच फोटो काढत बसला. तो कुत्रा हलला तर हा ओरडायचा. मग ते कुत्रं निमूटपणे पोज देऊन बसत होतं. आणि बटण दाबायच्या क्षणी हलत होतं. असं थोडा वेळ चाललं. माझी भिती थोडी कमी झाली. ते कुत्रं आमच्या सोबत पाठी पाठी यायला लागलं. मध्येच मुख्य वाट सोडून झाडांत घुसायचं, इथे तिथे हुंगायचं, थोडा वेळ गायब व्हायचं आणि परत कुठून तरी उपटायचं. साहजिकच ते वाटेतल्या संभाव्य सजीव गोष्टी पळवून लावत असणार. म्हणून आम्ही त्याला सभ्यपणे पाय आपटून हाकलून लावलं. हट्टी होतं. पण गेलं बिचारं.
पुढे एका अंतरावर नागाची कात सापडली. साप विषारी की बिनविषारी हे कसं ओळखायचं, त्याच्या डोळ्यांलगतच्या चौकटी कशा असतात, हे मित्रानं ती कात दाखवून सांगितलं. मी दोनदा विचारलं, पण तरी मला नीटसं कळलं नाही. शेवटी नुसतीच नंदीबैलासारखी मान हलवली. कात सापडली, म्हणजे नागही सापडेल, असं वाटून माझी धाकधूक वाढली होती आणि मी काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो.
साप काही केल्या दिसला नाही. मध्येच एका झाडापाशी एक मोठ्ठी सळसळ ऐकू आली. माझ्या अंगावर तेवढुशानं काटा आला. मित्र धावले. लगबगीनं शोधू लागले. पुन्हा सळसळ ऐकू आली. 'उंदीर असला तर एखादा? किंवा पाल' मी खरं तर मनातली इच्छा बोलून दाखवली होती. पण, 'एवढी मोठी सळसळ करणं उंदीर-पालीचं काम नाही. हा कोब्राच आहे.' माझी फाटलीच. हा कोब्रा मित्रांना आधीच्या एका फेरीत दिसला होता. म्हणे खूप मोठा आणि माजुरडा होता, आणि चपळसुद्धा. आज हे साहेब माज दाखवतील की नुसती चपळाई, असा विचार करत मी जागच्या जागी उभा राहिलो. साहेब अंतर्ज्ञानी असावे. नुसती चपळाई दाखवली आणि दर्शन न देता गुल् झाले. मित्र शिव्या घालत बसले, आणि मी मनातल्या मनात त्याचे आभार मानत बसलो.
पुढे शेवटपर्यंत चालत गेलो. वाट संपली. ओहोटी लागली होती. पण मध्ये रान खूप उंच वाढल्याने पाण्याचा प्रवाह दिसत नव्हता, आणि दाटी असल्याने पुढेही जाता येत नव्हतं. तिथेच टंगळमंगळ करत आम्ही परत फिरलो. परतताना प्रकाश मंदावत चालला होता. मंडळींना आपापलेच फोटो काढायची हुक्की आली. एक ग्रुप सेल्फी घेण्यासाठी सेल्फीस्टिक म्हणून आम्ही मित्राचा ट्रायपाॅड सरळ करून तिरपा वर धरला. प्रत्येकाने आळीपाळीने तो तसा दहा सेकंद वर धरून ठेवला. मला काही तो फारसा पेलवला नाही. हौस भागल्यावर, आणि प्रकाश जास्तच मंदावल्यावर, अंगाभोवती घोंघावणा-या डासांना चापट्या हाणत आम्ही परतीचा रस्ता धरला.
खाडीच्या वेशीबाहेर पडेपर्यंत मी सावध होतो. पायांनी वेग पकडला होता. वाटेत काय दिसेल न दिसेल याची जराही फिकीर नव्हती. मित्रांनाही दिसू नये अशीच इच्छा होती. मानवी 'आविष्ठाकारा'चा दर्प नाकात साठताक्षणी हायसं वाटण्याची ही माझी पहिलीच वेळ असावी. पण जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा अचानक आत परत फिरण्याची इच्छा निर्माण झाली. अंगात बारा हत्तींचं बळ म्हणावं तशी वीरश्री वगैरे संचारली. छाती वेगात धडधडत होती. खारफुटीच्या जंगलातला प्रत्येक क्षण मला माझ्या जीवावरचं माझं प्रेम दाखवत होता. आणि म्हणूनच की काय, त्या संधिप्रकाशात अंधारत जाणा-या त्या खाडीत आता माझा जीव अडकला होता. आणि तो मला पुन्हा पुन्हा इथे घेऊन येणार होता, याची मनोमन खात्री बाळगत मी घराच्या दिशेनं पावलं टाकायला लागलो.
क्रमशः
- © कौस्तुभ अनिल पेंढारकर
प्रतिक्रिया
23 Jul 2015 - 9:30 am | कपिलमुनी
गणेशा झालाय
24 Jul 2015 - 3:44 pm | नाखु
मलाही दिसेना ( दोनदा मानीटरला हलवलं तरीही!!!!)
अचंबीत नाखु
24 Jul 2015 - 3:49 pm | टवाळ कार्टा
मानिटरला हलवून काय बघायचे होते? ;)
24 Jul 2015 - 4:12 pm | नाखु
कळाले
क्ल्जी नसावी
23 Jul 2015 - 10:11 am | कंजूस
फोटो खारफुटीतल्या भरतीत बुडाले असतील तर वर काढा. मुंम्ब्रा-अलिमघर ?
23 Jul 2015 - 6:48 pm | पैसा
छान लिहिलंय!
24 Jul 2015 - 2:48 pm | ऋतुराज चित्रे
खारफुटी सफर आवडली. पटापट टाका पुढील भाग.
24 Jul 2015 - 3:11 pm | खटपट्या
जबरद्स्त !!