शेवरीचा पाला आणि म्हसरं
"झोप झाली का आप्पाराव, वाफश्यातनं पाणी भाईर याय लागलयं, दार मोडा तेवडं" आप्पानं जरा डोळं किलकिलं करत शीतलीकडं बघितलं. खरतर त्यानं नुकतचं दार मोडुन नव्या वाफ्यावर पाणी लावलं हुतं. शेताच्या मधावरचं आंब्याची पाच धा झाडं. या झाडांमध्येच लक्ष्मीचं एक देऊळ कमरंऐवढ्या उंचीचं. पण त्याचा कठडा लांबवर पसरत गेलेला. जेवन झाल्यावर आप्पा दुपारचं या कठड्यावरचं डुलकी घ्यायचा. आमराईच्या हिरव्या गारठ्यात त्याला गारगार झोप लागायची. पण ऐण दुपारचं शेरडं राखायला आल्यावर शीतली त्याच्या खोड्या काढायची.