( www.misalpav.com/node/30211 यावरुन सुचलेले काहीबाही)
............................................................................
काल संध्याकाळी मी ढाब्यावरचं होतो. खाऱ्या शेंगदाण्याची पुडी मीच फोडली. डाव्या बाजुला उकडलेल्या अंड्याच्या फोडी, टेबलावर गलास, बाटली, कांदा, शेवचिवडा बेत अगदी फक्कड जमला. सत्यानं बाटली फोडली. आणि गलास भरायला घेतले. बापूशेट गल्ल्यावरुन म्हणाले " पावणं, रोज येत चला, बघा तब्येत कशी सुधारतेय"
अर्धा गलास रिचवत मी म्हणालो " मला काय बेवडा बिवडा समजलात काय?, ह्या सत्याच्या नादानं आलो, आमचा गावठी गुत्ता कधीबी भारी" बापूशेट एकटाच हसला. मी शिगारेट पेटवली. सत्यानं दुसरा गलास भरायला घेतला. विषय संपला.
विषय संपला असला तरी घोटाघोटांमध्ये मनातल्या मनात अजुनच फुलत गेला. तो काळ मागे पडला, जेव्हा सुखदेवच्या गुत्त्यावर पाच रुपायाला गलास भरुन मिळायचा. आज आपण केवळ इंग्लिश पितो. पण कोणताही भेदभाव न करता कॉकटेल पिणारे आहेतच की. बिगर सोड्याचं पिलं पाहिजे हां विचार मान्य करतो. अनेक विदेशी कंपन्या बाटल्या घेऊन ईथे आल्याच आहेत की. पण इंग्लिश पिल्यानंतरचा नाजुक धिंगाणा हा केवळ ट्रेलर असतो. गावठी गुत्त्यांतुन पराक्रम गाजवत अनेक बेवडे पुढे येतातच की.
आचजे ड्रिंकर उद्याच्या पेताडांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देतात. नवीनच सुरु झालेले ड्रिंकर- ड्रिंकरी एकमेकांचे छंद जोपासतात. गावठी पिण्याची त्यांना घाई नसते. कारण गारगार बाटलीत त्यांना सर्व प्रकारची गरमागरम सुखं घ्यायची असतात. त्याचबरोबर तोंडाला फेसही आणायचा असतो.
यासर्वात आपण इंग्लिश व्हल्सेस गावठी या मद्यपींच्या तिर्थाला शिंपडुन देत आहोत का?
आता डोक्यात साठलेले काही विचार तुमच्यासमोर मांडतो.
गावात धा पैकी आठ घरात कोंबड्या पाळलेल्या असतात. दर मंगळवार, शुक्रवार त्यांच्यातली एकेक रात्रीचं गायब व्हायला लागली. सकाळी आमच्या घरामागच्या उकिरडायावर त्यांची हाडकं दिसायची. कदाचित यामुळेच शेजापाजारी आमास्नी 'कोंबडीचोर' म्हणायला लागले. मग अशा लोकांच्या पत्र्यावर आम्ही रात्रीचं दगडं फेकायचो.
मला आजही आठवतं मी सखुबाईची पहिली कोंबडी चोरलेली. रात्रीचं काट्याकुट्यात पळुन पळुन दमछाक झाली. सत्याच्या रानात तीन दगडं मांडुन खरपुस भाजली. मग आणलेल्या दोन संत्र्यांसोबत आम्ही दोघांनी तिचा चांगलाच फडशा पाडला. सकाळी सखुबाई दारात हजर. बापानं लय बदाडलं. त्यादिवशी तेल लावून आंघोळ केल्याचं चांगलच आठवतयं मला.
अजुन दोन पिढ़या मागे गेलं तर एक लक्षात येईल की त्याकाळचे बापलोक खुपच खवीस होते. पोराठोरांना गुरासारखे बदडायचे. दुपारच्याला पारावर त्यांच्या गप्पा चालायच्या.
"आरं म्हादबा, येकादा वला फोक हायका? राती माळीनमावशीची कुंबडी चुरीला गीलीय मनं, रातच्याला कारट बी घरी न्हवतं" असे सांगताना कोणी बापमाणुस ओशाळत नसे. आणि असे फटके खाणारी पिढी भलतीच आडदांड होती हे ही तेवढेच खरे.
त्या काळात लिंबुनीच्या झाडाखाली अशा गप्पा चालायच्या. आमुश्या पोर्णिमेला तर ईथे जत्राच भरायची.
त्यानंतरच्या पिढीच्या मात्र थोड्या अपेक्षा वाढल्या. घरी टि.व्ही बघतचं ही लोकं गलासं भरायला लागली. बाजारातुन रबराचं चिकन आणुन ह्यांचा कार्यक्रम होत असे. घरटी बाई पण एकदोन घोट घेत असे. एकदोन किका बसल्याशिवाय तिलापण रात्री झोप येत नसे.
महिलामंडळात यांचे गप्पांचे विषयदेखील ठरलेले असतं. "अगं काल आमच्या ह्यांनी टुबॉर्ज आणली होती, तु ट्राय केलीस का?" किंवा " अगं शेवंता मी तुझ्यासाठी कुरवड्या भातुड्या पाठवुन देते, तळुन खात जा मग घोटाघोट घेत जा".
बदलत्या काळाबरोबर विचारही बदलत आहेत. पब, ढाबे, हॉटेल असे जवळचे अॉप्शन आपण विचारातही घेत नाही. 15 दिवसातून एकदा बाहेर जाऊन ढोसायचे. कंटाळा आला की घरीच पार्सल आणुन तर्राट व्हायचे हे खूपच कॉमन झाले आहे.
आज मला फक्त एकच प्रश्न भेडसावतो आहे. नव्या पिढीला आपण 'सर्व दृष्टीने सुदृढ पेय' देतो आहोत का? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनातच द्याव... कारण बेवडा सुखी तर जग सुखी.
प्रतिक्रिया
15 Oct 2015 - 9:15 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
16 Oct 2015 - 12:58 pm | जव्हेरगंज
:)
18 Oct 2015 - 6:50 pm | सोंड्या
ताडीला अणुल्लेखाणे मारल्यामुळे तीव्र णिषेध
18 Oct 2015 - 6:54 pm | पाटीलअमित
daance बर वर पण टाका
18 Oct 2015 - 7:03 pm | बाबा योगिराज
काल संध्याकाळी मी ढाब्यावरचं होतो. खाऱ्या शेंगदाण्याची पुडी मीच फोडली. डाव्या बाजुला उकडलेल्या अंड्याच्या फोडी, टेबलावर गलास, बाटली, कांदा, शेवचिवडा बेत अगदी फक्कड जमला.
आरा रा रा, जव्हेर भौ,
काय केलत हे???
आता तुमिच् चला आमाले घेउनशानि.
रात्रभर प्यासा प्यासा खेळत बसु.....