"झोप झाली का आप्पाराव, वाफश्यातनं पाणी भाईर याय लागलयं, दार मोडा तेवडं" आप्पानं जरा डोळं किलकिलं करत शीतलीकडं बघितलं. खरतर त्यानं नुकतचं दार मोडुन नव्या वाफ्यावर पाणी लावलं हुतं. शेताच्या मधावरचं आंब्याची पाच धा झाडं. या झाडांमध्येच लक्ष्मीचं एक देऊळ कमरंऐवढ्या उंचीचं. पण त्याचा कठडा लांबवर पसरत गेलेला. जेवन झाल्यावर आप्पा दुपारचं या कठड्यावरचं डुलकी घ्यायचा. आमराईच्या हिरव्या गारठ्यात त्याला गारगार झोप लागायची. पण ऐण दुपारचं शेरडं राखायला आल्यावर शीतली त्याच्या खोड्या काढायची.
"शीतले, कागं खळीला आलीय, पडु दिकी थोडं" आप्पानं झोपल्याझोपल्याचं उजवा हात डोक्याखाली घेत पायाची तीडी मारत म्हणाला.
" गड्या सारखा गडी लका तु, खुशाल झोपलाय दुपारचं, पाला घीती रयं तेवडा शीवरीचा" तशी पाला काढायला शीतली फडात शिरली.आप्पा बी आलेली मरगळ झटकत ऊठुन बसला. दंडातलं पाणी ओंजळीत घेऊन तोंडावर मारलं. कमरेच्या टावेलानं त्वांड पुसून पुन्हा कठड्यावर येऊन बसला.
"आक्का कावल गय, लवकर उरक" हातावर तंबाकु घेत आप्पा तिथनचं वरडला.
"घीवदी रं थोडं, शेरडास्नी खायला कायच न्हाय" शेवरी वाकवुन शीतली फडातनचं म्हणाली.
तसा आप्पानं बार भरला.टावेल गुंडाळत तो पण फडात शिरला. तरण्याताठ्या शीतलीला फडात एकटं गाठुन काय डाव हुतुय का त्याला बघायचं हुतं.
"शीतले, कशाला येवढ्या ऊनाचं शेरडं फिरावतीय, ऊन उतारल्यावर घीवुन जाकी पाला" आप्पा तिच्या जवळ जात जात बोलला.
"कसलं ऊन घीवुन बसलाय, काल नवऱ्यानं नत इकलीय बाबा त्या दारुच्या पायी, आता एक करडू ईकून नवी घेणाराय म्होरल्या बाजारात, त्येला कळु बी देणार न्हाय" शीतलीसारखी बाई अशी कधी पाघळत नसायची, पण आप्पापुढं आज तिनं फिर्याद मांडली.
"करडू ईकायचं आसलं तर सांग गयं, माझ्या वळखीतला हाय एकजण, बघतू ईचारुन"
"यीवढी शीवरी वाकवुन धर रं, मला एका हातानं काय तोडायला ईना" शीतली जरा फणकाऱ्यानचं म्हणाली.
आप्पानं गप शेवरी वाकवुन धरली. तिचा पाला बी तोडला. भारा बी बांधुन दिला. फडाभाईर आणुन तिच्या डोक्यावर बी ठिवला. डोक्यावर पाला घीवुन शीतली शेरडं हाकत घराकडं चालली. आप्पा नुसता बघतचं राहीला. गड्याचा काय धडाच झाला न्हाय तिला काय बोलायचा.ऐव्हाणा वाफा पण भरायला आला हुता. मग त्यानं खोऱ्या घेऊन दार मोडत नव्या वाफ्यावर पाणी सोडलं.आन पुन्हा कठड्यावर येऊन पडुन राहीला. पण यावेळेस त्याला काय गारगार झोप लागली न्हाय.
दुसऱ्या दिवशी शीतली काय आमराईत आली न्हाय. कठड्यावर आप्पा तंबाकुचे बारावर बार भरत राहिला. गारगार झोप सोडा त्याला एकाजागी बसनंबी हुईना. संध्याकाळी सायकलवर टांग टाकुन तो घराकडं निघाला. उतारावर त्याला डोक्यावर सरपान घेऊन जाणारी शीतली दिसली. आप्पा क्षणभर थांबला. पुढं जायच्या ऐवजी सहज राजाभाऊची गाठ घ्यावी म्हणुन त्यानं सायकल जमदाड्याच्या शेताकडं वळवली. राजाभाव ईकनं घीऊन घराकडं जायच्या तयारीत हुता. "झालं कारं पाणी दीवुन, खोडवा कसा आलाय?" स्टँड लावत आप्पा खाली ऊतरला.
"आरं बरं झालं तु आला, दोनेक हजार दीतुकारं ऊसनं, सताठ दिसात फिडुन टाकतू" म्हसरं सोडत राजाभाव म्हणाला.
"कशाला रं?, येवढं काय झालयं" बुचकळ्यात पडत आप्पानं विचारलं.
"आरं नत करायचीय नाकातली, तशी बोली हाय, काय सांगायचं तुला, शीतली आलती दुपारच्याला सरपान न्ह्यायला, म्या दारं धरत बसलू होतू, ह्यो ऊनाचा कार......"
आप्पाला म्होरचं काय ऐकू येईना. बधारल्यासारखा तो तसात कितीतरी वेळ सायकलच्या चाकाकडं बघत ऊभा राहिला.
...................................................................
(ईच्छुकांनी राजाभावच्या म्हसरावर लक्ष ठेवावे www.misalpav.com/node/32888 )
प्रतिक्रिया
18 Oct 2015 - 10:29 am | निनाद
दुसरा भागही आवडला. वाचकाला काही मोकळ्या जागा भराव्या लागतात आणि संदर्भ जोडावे लागतात पहिल्या भागाशी. एक खेळच आहे हा.
लेखन आणि लेखनात असलेली भाषेची लय फार सुंदर टिकवता.
लेखन आवडते आहे... तिसरा भागही येणार का?
18 Oct 2015 - 2:41 pm | जव्हेरगंज
असाच कधी योगायोग जुळुन आला तर तिसराही भाग होऊन जाईल :):)
18 Oct 2015 - 10:38 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! मस्त.
18 Oct 2015 - 12:35 pm | बाबा योगिराज
जव्हेर भौ, मस्तच वो....
जरा दमान घ्या बर्का.
18 Oct 2015 - 1:49 pm | कंजूस
सांगली जिल्ह्यातलं वातावरण,भाषा आहे.उसाचं रान,शेवरी इत्यादीचे फोटू त्या निमित्ताने टाका राव.
18 Oct 2015 - 2:43 pm | जव्हेरगंज
ते फोटो मिपावर टाकनं सध्यातरी मला अवघड वाटतयं. :)
तेवढंपण जरा शिकुन घेतो. :):)
18 Oct 2015 - 2:31 pm | एस
आधीचा शेवरीचा पाला आणि मंदी कुठे गेले?
18 Oct 2015 - 2:39 pm | जव्हेरगंज
मंदीची जागा आता शीतलीनं घेतलीय, आणि शेवरीचा पाला आता म्हसरं खाणार हाईत. :)
(किंचीत बदल करुन दुसऱ्या कथेशी लिंक लागत होती म्हणुन लावली :) )
18 Oct 2015 - 2:42 pm | चांदणे संदीप
मीही त्याच शोधात आहे.
आजकाल मिपाकर लेखक लेखांच्या नवनवीन लीला दाखवित आहेत! :)
अच्छा है! अच्छा है! (इथे नाना पाटेकर यांना इमॅजिनाव!)
18 Oct 2015 - 9:00 pm | रातराणी
खी खी.पोपट झाला आप्पाचा :)
19 Oct 2015 - 1:44 pm | जगप्रवासी
मस्त जमलाय लेख
19 Oct 2015 - 2:29 pm | नाखु
केला गाव खुळा !!!!
फर्मास लेखन अजून येउद्या.
"पकाव लेखांना आणि चिखल धाग्यांना कावलेला गाव वाला नाखु"