गावाकडची जुनाट आज्जी .....
जुन्या वहीची कोरी पाने
खिन्न उदासी त्यांच्यावरती
हुशार अवखळ मुले आजची
होड्या का हो बनवत नाही
अंगणातली हळवी माती
वाट पाहुनी थकून गेली
इवले इवले पाय चिमुकले
इथे कधी का धावत नाही
सडा गुलाबी गोड फळांचा
बदाम आहे उभा कधीचा
मगज आतला शुभ्र बदामी
कुणा कधी का खुणवत नाही
आंब्याची ती डहाळ वेडी
कैर्यांच्या वजनाने झुकली
तिला वाटते तुटून जावे
एकाकीपण सोसत नाही
सुट्टी येते ....
संपून जाते.....
गावाकडची जुनाट आज्जी
उगा बिचारी वाट पहाते
.....वाट पहाते....