सारेगमप मपधनिसा- एक आठवण
गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट न झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ५ ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय ४ पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.) त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची.