हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!