तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?