मेंदू
जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू
रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू
बंद कर पारायणे गीताकुराणाची
देवधर्माने अता भंजाळतो मेंदू
दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू
भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण
त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू
तू जरा आता नवी होऊन ये दुनिये
त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू
जीवघेणे तू असे हासू नये राणी
तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू
डॉ.सुनील अहिरराव