माया -२ (भयगुढकथा)

तुडतुडी's picture
तुडतुडी in जनातलं, मनातलं
4 Aug 2015 - 5:22 pm

चंद्रा . नावाप्रमाणेच चंद्रासारखा मुखडा . का त्या मुख्ड्यावरूनच नाव ठेवलं गेलं होतं कुणास ठावूक .गव्हाळ रंग . टपोरे बोलके डोळे आणि लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते . तेवढ्याच भांडवलावर तिला पहिल्यांदा पाहताच राजीव ने आपली संमती कळवून टाकली . राजीव हि चांगला देखणा होताच . बाकी कुठल्याच गोष्टीत दोघांच्यात साम्य नवतं . चंद्रा उत्साहित , बडबडी, थोडीशी बालिश तर राजीव अबोल . कामापुरतं बोलणारा . एखाद्या दिवशी हसला तर आज सुर्य कुनिकड उगवला असा प्रश्न पडायचा सावित्रीला . थोडासा तिरसटच . राजीव च्या घरची परिस्थिती चांगली होती .तर चंद्रा गरीब . राजीव चं तालुक्याच्या ठिकाणी वडिलोपार्जित ऐसपैस घर होतं . तर चंद्राच्या वडिलांचं ह्या छोट्या गावातलं हे झोपडीवजा घर .दोन्हीकडची संमती झाल्यावर लग्न ठरलं . मैत्रिणी चेष्टा करू लागल्या . धाकटी बहिण आणि भाऊ पण चिडवू लागले . चंद्राचं एक लाडकं कुत्रं होतं . अगदी छोटं पिल्लू असताना तिला ते सापडलं होतं .तिनं पाळल होतं त्याला. ह्या मरतुकड्या कुत्र्यावर चंद्राचा जीव होता .
भावाने विचारलं "ताई तू इथून गेल्यावर ह्या कुत्र्याचं काय होणार ? "
"मी त्याला पण माझ्या सोबत घेवून जाणार आहे " - हसत म्हणाली ती

लग्नाचा बार उडाला .चंद्रा राजीव विश्वासराव भोइकरांची सून झाली .एवढं मोठं घर बघून चंद्रा हरखून गेली. दुमजली घर . मोठाल्या खोल्या .खाली सोपा , माजघर , स्वयंपाक घर . वरती दोन शयनगृह . मोठी माडी . मोठं आंगण . पण ह्या अंगणात तिच्या घरच्यासारखी झाडं नवती कि तिचं ते लाडकं कुत्र पण नवतं .

सावित्रीला तर आकाश ठेंगणं झालं होतं. रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या ती आठवणीत हरखून गेली . तिला तिचे प्रेमळ आईवडील आठवले . सावित्री बाईंना १ भाऊ होता . आपल्याला बहिण असती तर किती मज्जा आली असती असं त्यांना लहानपणी वाटायचं . पण ते नाही झालं .विश्वासरावांशी त्यांचं लग्न धडाक्यात झालं . १ दीर होता . नणंद नाही . २ वर्षांनी राजीव चा जन्म झाला होता . त्याला वाढवण्यात त्यांचा दिवस कसा जायचा त्यांनाच कळायचं नाही . अगदी सुखी कुटुंब होतं . राजीव ४ वर्षांचा झाल्यावर त्यांची आपल्याला १ मुलगी हवी असण्याची उर्मी उफाळून आली .पण ते नशिबात नवतं . काहीतरी आजाराचं निमित्त होवून सावित्री बाईंच्या नवऱ्याचं निधन झालं. पतीच्या नोकरीतून मिळालेल्या काही पैशांच्या आणि स्वताच्या कष्टांच्या जोरावर त्यांनी राजीवला वाढवलं होतं . तो हि चांगला शिकत गेला . चांगल्या मार्कांनी पास होत गेला .इथंच तालुक्याच्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळाली . आता त्यांना वेध लागले होते त्याच्या लग्नाचे . दुधाची तहान ताकावर भागवावी तसं त्या मुलीची तहान सुनेवर भागवणार होत्या . विचार करता करताच त्यांचा डोळा लागला .

चंद्राला सावित्री बाई हि आपली सासू नसून दुसरी आईच आहे असं वाटत होतं . राजीव ला जास्त बोललेलं आवडत नसे . मग तो कामाला निघून गेल्यावर ह्यांच्या गप्पा रंगत .दोघी एकमेकींच कौतुक करायच्या . दोघी एकमेकींना आवडणाऱ्या विषयात इंटरेस्ट घ्यायच्या . सावित्री तिला वेगवेगळे पदार्थ शिकवी . पण राजीवला मठ्ठा सारखा नुसतं खायचं माहित होतं . कशाचं कौतुक पण करायचं असतं हे कुठलं त्याच्या गावी असायला . चंद्राला पुस्तकं वाचायची आवड होती. ती सावित्रीला मस्त मस्त कविता वाचून दाखवायची . सावित्री आवडीनं ऐकायची . राजीवलाहि वाचून दाखवायची . तो हुंकार भरायचा आणि 'हे कवी लोक इतके भावनिक का असतात ? असं अवघड का लिहित असतात ? कवितेतून रडत का असतात ' अशी प्रतिक्रिया द्यायचा . रात्रीचा शृंगारहि सपकच असायचा . प्रेमाच्या गोष्टी बोलणं अगदी क्वचितच किवा नाहीच . सावित्रीने त्याचं मन बदलण्याचा किती वेळा प्रयत्न केला . पण कंटाळून तिला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला .

एकदा चंद्राने विचार केला एवढं मोठं अंगण आहे तर त्यात सुंदर सुंदर फुलझाडं लावता येतील . देवालाही फुलं होतील आणि अंगण सुगंधाने दरवळून जाईल. तिला मोगर्याची फुलं खूप आवडायची .आणि हो त्यानंतर एक कुत्रं पण पाळायचं . तिने सावित्रीकडे विषय काढला .
"बघ बाई तुझ्या नवर्याला विचार . त्याला म्हण रोपं घेवून ये घरी येताना "
रात्री चंद्राने विषय काढला . "अहो मला अंगणात बाग फुल्वायचीय . उद्या येताना थोडी रोपं घेवून या ना "
"घरातली कामं कमी झालीयेत का तुला ? कशाला ती झाडं बीड हवीत . आणि त्याच्या पानांचा कचरा किती होतो . राहूदे मोकळं आहे तेच "
"असा कसा आपला नवरा इतका अरसिक. साधी फुलझाडांची आवड नाही ह्याला . " - चंद्रा मनोमन म्हणाली. कुत्र्याचा विषय दूर कुठतरी कोपऱ्यात जावून कडमडला .

चंद्राला दिवस गेले . सावित्रीला तिला कुठे ठेवू अन कुठे नको असं झालं होतं . ती तिची सगळ्या प्रकारे काळजी घेत होती . ती नेहमी आनंदात राहील असा प्रयत्न असायचा तिचा .राजीव हि काळजी घेत होता तिची . ९ महिने हा हा म्हणता सरले . चंद्राला तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये नेलं होतं . अन तो दिवस उगवला . दुपट्यात गुंडाळलेला , गोंडस , लालसर गोळा तिच्या हातात देण्यात आला . त्या इवल्याश्या जीवाकडे बघताना ती भान हरखून गेली होती. डोळ्यांतून आनंदाश्रू स्रवत होते . राजीव आणि चंद्राला मुलगी झाली होती . चंद्रासारखाच गोड चेहरा. केतकीसारखा रंग . सावित्रीने तर तिचं नामकरण पण केलं 'केतकी'. राजीव नेहमीसारखाच अबोल आणि मक्ख होता . त्याला आनंद झाला होता का नही कुणास ठावूक .पण झाला असावा .

सावित्री आणि चंद्राचं तर आयुष्य आता केतकीच्या भोवतीच गुंफलेलं होतं . त्या इवल्या बाळाला बोललेलं काही समजायचं नाही . तरीपण तिच्याकडे बघून वेडंवाकडं तोंड करून तिला हसवायचा प्रयत्न करणं, उगीच तिच्याशी बडबड करायची , तिचे कपडे , तिच्यावर लक्ष ठेवणं , जर कुठं रडायला लागली तर शांत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं अशी सगळी मजा मजा गेले ३ महिने चालू होती . पण आताशा चंद्राला तिच्याशी खेळताना दम लागू लागला . काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवू लागला होता . बाळंतपणामुळे असेल म्हणून जास्त सिरीयसली नाही घेतलं गेलं . पण सावित्री तिच्या खाण्यापिण्याकडे निट लक्ष देवू लागली . तरीही तिचा अशक्तपणा वाढू लागला . ताप येवू लागला .हात पाय दुखू लागले . दवाखान्यात २ दिवस आडमिट कराव लागलं .मग बरं वाटू लागलं. १ आठवडा चांगला गेला अन पुन्हा आजार उलटला .औषधं चालू होती . चंद्राला फणफणून ताप आला .ग्लानी आल्यासारखं झालं . राजीव काळजीत पडला . ती ग्लानीत काहीतरी बडबडत होती . पण ह्या दोघांना काही कळत नवतं .औषध दिल्यावर ती जर शांत झोपली . हे दोघही झोपले . सावित्री बाई तिच्या जवळच तिचा हात हातात घेवून बसून होत्या . त्यांना तशीच झोप लागली . मध्यरात्री थंडगार स्पर्शाने सावित्रीला जाग आली . त्यांच्या हातातला चंद्राचा हात थंडगार पडला होता . चंद्रा हे जग सोडून गेली होती .

अंत्ययात्रेची तयारी झाली . नातेवाईक फार नव्हते . आईवडील भाऊ बहिण आले होते . केतकी सगळ्या गोंधळाकडे टुकूटुकू बघत होती . पण तिला कुठं काय कळतंय ? दुपारपर्यंत चितेला भडाग्नी दिला गेला . सावित्रीच्या शोकाला सीमा नव्हती . राजीव मूकपणे अश्रू ढाळत होता . चंद्राचे दिवस झाले . बराच वेळ कावळा पिंडाला शिवण्याची वाट बघण्यात आली . पण तो काही पिंडाला शिवायला तयार नव्हता . जवळ यायचा आणि दूर जायचा . राजीव ने केतकीला निट सांभाळीन म्हणून बोलून दाखवलं .पण छे . सावित्री बाईंना कळेना हिची कुठली इच्छा अपूर्ण राहिलीय . शेवटी दर्भाचा कावळा करून त्याचा पिंडाला स्पर्श करण्यात आला .

क्रमश:

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

मितान's picture

4 Aug 2015 - 6:01 pm | मितान

ह्म... कुत्रा पाळावा लागेलसं दिसतंय !

जडभरत's picture

4 Aug 2015 - 6:18 pm | जडभरत

मस्तंय.!!!
पु.भा.प्र.

एस's picture

4 Aug 2015 - 6:59 pm | एस

छान आहे! पुभाप्र.

रेवती's picture

4 Aug 2015 - 8:12 pm | रेवती

वाचतिये.

पुणेकर भामटा's picture

4 Aug 2015 - 10:14 pm | पुणेकर भामटा

हा भाग पटापट उरकल्यासारखा वाटत आहे , पु ले शु

पाटील हो's picture

5 Aug 2015 - 9:31 am | पाटील हो

पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

6 Aug 2015 - 12:00 am | बोका-ए-आझम

संपवलात हो हा भाग. आणि मागच्या भागाची लिंक द्या की. बाकी कथा छान आहे.पुभाप्र.

पद्मावति's picture

6 Aug 2015 - 1:09 am | पद्मावति

खूपच मस्तं चाललीय कथा. पु.भा.प्र.