इशकजादे – २
सकाळचे साडेआठ वाजत आलेले होते. रितू कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. रेडिओवर गाणं लागलेलं, ‘हाय वो परदेसी मन में कौन दिशासे आ गया…’ थोडंसं थबकून ती मध्येच ते गाणं लक्षपूर्वक ऐकत होती. आज तिने मुद्दाम कालचाच तो गुलाबी ड्रेस घातलेला होता. उत्सुकता आणि एक हुरहुर! थोडंसं घाबरल्यासारखंच होत होतं तिला आज.
एवढ़्यात माई तिची गडबड बघून बाहेर आल्या. ‘काय गं रितू? एवढी कसली गडबड?’
‘काही नाही गं माई! आज जरा लायब्ररीत जायचंय. उशीर झाला तर पुन्हा रांगा लागतात मग.’
‘बरं! ठीक आहे.’