gazal

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
24 Apr 2017 - 12:32 pm

अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)

जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे

नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे

असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)

जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे

तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे

डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझलgajhalgazal

घोर हा घनघोर आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 5:31 am

चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!

जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर हा कमजोर आहे!

तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!

ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!

जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!

वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

गंधभारल्या रात्री होत्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 3:09 am

स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते...
गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते!

केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा...
फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते!

विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना...
लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते!

मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर?
तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते!

निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा...
पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
19 Apr 2017 - 1:49 am

कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे
वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे!

खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले
धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे!

मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी
नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे!

अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली
खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे!

वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही
वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

तडा गेलाच आहे तर...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 6:49 am

नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या!

नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या!

घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या!

अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या!

मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!

नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या!

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 12:47 am

नाद मेघांचाच दर्जेदार होता
पावसाचा जोर फुसका बार होता!

ओल आहे काळजाच्या खोल रुतली
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता!

रात्र होती चंद्र होता गार वारा
चांदण्याचा कवडसा अंगार होता!

सावल्याही हाय मज सोडून गेल्या
की उन्हाचा रंग काळाशार होता??

सापडेना खंजिराची खूण कोठे
काळजावर काजळाचा वार होता!

ओळखावे तू मला ही आस नव्हती
हा तसा माझा नवा अवतार होता!

का प्रवासाला निघाला एकटा?तो...
सूर्य होता वा कुणी अंधार होता?

फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन
आज बहुधा वाटते रविवार होता!

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

दाही दिशांस जेंव्हा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Apr 2017 - 10:54 pm

दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता
भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता!

पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते
माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता!

ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली?
हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता!

अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू
मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता!

लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन्
एका क्षणात अवघा दर्याच आटला होता!

मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे
माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता!

मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता
पत्रामधून माझा पत्ताच काटला होता!

—सत्यजित

गझलgajhalgazalमराठी गझल

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 Apr 2017 - 4:01 pm

साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!

जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!

एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?

फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!

सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!

—सत्यजित

गझलgajhalgazalमराठी गझल

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 Apr 2017 - 11:20 pm

ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!

ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!

तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!

तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!

केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!

नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 Apr 2017 - 3:38 pm

मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!

वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला
माझ्याच सावलीचा मज भार होत आहे!

झाली नवीन ओळख,माझी मला अशी की
ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे!

सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना
फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण?
एकेक पाकळीचा गुलजार होत आहे!

—सत्यजित

कवितागझलgajhalgazalमराठी गझल