(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!)
सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!
पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी
ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला!
आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी?
मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला!
वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही
थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला!
भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या
गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला!