पेटुनी आरक्त संध्या...
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!
मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!
काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!
एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!
मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!
—सत्यजित