ती पहा पडली गझल...
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!?
पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!
कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!
काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!
—सत्यजित