पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा...
या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा!
सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची...
तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा!
तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना...
एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा!
चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते?
तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा!
मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी...
वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा!
प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा...
कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा!
—सत्यजित
प्रतिक्रिया
23 May 2017 - 8:18 pm | धनावडे
छान
25 May 2017 - 2:43 am | सत्यजित...
मनःपूर्वक धन्यवाद सुश मय!
आपला एकमेव प्रतिसादही लाख मोलाचाच आहे!