हा कशाला गोषवारा पाहिजे
फक्त थोडासा इषारा पाहिजे
माणसाला अन्न वस्त्रे खोपटे
शासनाला शेतसारा पाहिजे
श्वासही आहेत चोरासारखे
जिंदगानीवर पहारा पाहिजे
हात या राखेतही टाकेन मी
पोळणारा पण निखारा पाहिजे
जीव ओवाळून टाकावा असा
जीव कोणी लावणारा पाहिजे
घोषणांची केवढी बुजबुज इथे-
देशव्यापी एक नारा पाहिजे
माणके मोती हिरे सगळीकडे
फक्त माती खोदणारा पाहिजे
काजवे उसने किती आणायचे
आपुला कोणी सितारा पाहिजे
टाक तू कचरा पुरेसा अंगणी
स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
25 Jul 2015 - 7:07 pm | जडभरत
छानंय. मध्यमवर्गीय हतबलता व अपेक्षांचे चित्रण चांगलेय.
शेवटची ओळ खोचक आहे. पण मला ते पटले नाही.असो तो खूप वेगळा विषय!
26 Jul 2015 - 10:10 am | drsunilahirrao
खूप खूप आभार जडभरतजी!
26 Jul 2015 - 10:19 am | एस
छान कविता.
26 Jul 2015 - 5:05 pm | कवितानागेश
छान
29 Jul 2015 - 8:07 am | drsunilahirrao
धन्यवाद स्वॅप्स,लीमाउजेट!
29 Jul 2015 - 8:12 am | चित्रगुप्त
जीव ओवाळून टाकावा असा
जीव कोणी लावणारा पाहिजे
..............हे खासच आवडले.