शशक | आवंढा
माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला. काकांनी खिडकीशेजारी बसलेल्या काकूंना सांगितलं - 'ये ऊठं गं, पाण्याची बाटली दे, खिडकीतनं बाहेरची झाडं काय कवा बघितली नाईस काय?' काकूंनी धडपडत वरच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि काकांना दिली.