लग्न झाले नी अंकल झालो

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
9 Jul 2023 - 9:08 am

गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते. त्यादिवशी:

गुलाबाची कळी: काल न, संध्याकाळी रिक्ष्यात बसून बाजारात जात होते, तेवढ्यात एक बाइकस्वार जवळून गेला १७-१८ वर्षाचा पोरगा असेल. मला पाहत त्याने डोळा मारला व फ्लायिंग किसहि केले. हा किस्सा सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता.

गोबीचे फूल: (मनातल्यामनात, कपाळावर कुंकू लावत नाही आणि गळ्यातहि मंगळसूत्र घालत नाही. स्वत:ला जुही चावला समजते. मी काही मूर्ख नाही, मलाहि कळते, तुझ्या बोलण्यामागचा हेतू. बघ कशी तुझी बोलती बंद करते): त्या मुलाची काय चूक, तू अजूनहि १६ वर्षाच्या तरुणी सारखी दिसते. मुंबईला गेली असती तर जुही एवजी तुलाच सिनेमात काम मिळाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रयत्न करून बघ. इथे उगाच दिवस भर यस सर/यस मॅडम करत वेळ घालविते. ते जाऊ दे, पण एक खटकते, तू एवढी सुंदर पण तुझ्या मिस्टरांचे पोट सुटत चालले आहे. डोक्यावरचे काही केसहि पांढरे झाले आहेत. असेच सुरु राहिले तर एक दोन वर्षांत ते तुझे अंकल दिसू लागतील. बघ जरा त्यांच्या कडे.

तिचे बोलणे ऐकून मला हसू आले. गोबीच्या फुलाला मनातल्यामनात दाद दिली. काय शालजोडी मारली आहे, गुलाबाच्या कळीच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले. मला हसताना पाहून गुलाबाच्या कळीला राग आला. ती माझ्यावर भडकली, काहीना बायकांच्या गोष्टी टवकारून ऐकण्याची भारी हौस असते. मी ही बेशरमपणे म्हणालो, देवाने कान दिले आहे, त्याचा सदुपयोग करणे हा काही गुन्हा नाही. असो.

गोबीचे फूल: लक्ष देऊ नको त्याच्या कडे. एक नंबरचा बेशरम आहे. बाकी काही ही म्हण पटाईत अजूनही हेंडसम दिसतो.

लग्नाला दोन एक वर्ष झाले असले तरीहि माझे काही पोट निघाले नव्हते व केसहि काळे होते. अजूनही मी हंड्सम आणि स्मार्ट दिसत होतो. तरुण पोऱ्या किमान आपल्याला 'अंकल' म्हणणार नाही, प्रयत्न केला तर आजहि त्या आपल्याला 'घास' टाकतील, असा गैरसमज होता.

त्याच दिवशी ऑफिसहून थोडा लवकर निघालो. सूर्यास्ताच्या आधी घराच्या गल्लीत शिरलो. घराच्या दरवाजाच्या बाहेर सौ. शेजारच्या २२-२३ वर्षाच्या तरुणी सोबत बोलत होती. सौ.ची पाठ माझ्याकडे होती. पण त्या तरुणीचे लक्ष माझ्याकडे गेले, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाली, "दीदी, अंकल आ रहे हैं". च्यायला सौ. दीदी आणि मी अंकल, कुठे तरी जळत आहे असे वाटले. घराजवळ पोहचताच, ती तरुणी मधुर आवाजात म्हणाली, 'अंकलजी नमस्ते'. आतामात्र तळपयाची आग मस्तकात गेली. मी भडकलेले डोके शांत ठेवीत तिला म्हणालो, "जिजाजी को अंकल कहोगी तो दीदी को भी आंटी कहना पड़ेगा". नकळत मी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. मी घरात शिरलो, सोफ्यावर जाऊन बसलो. सौ. ही पाठोपाठ आत आली. नेहमीप्रमाणे तिने प्यायला पाणी आणून दिले. पाणी पिणे झाल्यावर सौ.कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. ती रागातच म्हणाली, आजकाल तुमची जीभ जास्तस चरचर करू लागली आहे. तोंडावर ताबा ठेवा, तुमचे लग्न झालेले आहे, किमान हे तरी लक्षात असू द्या. "मी दीदी असली तरी, शेजार-पाजारच्या तरुणी तुमच्या साळ्या नाहीत. तुम्ही त्यांचे अंकल आहात. तिच्या बोलण्यातील वैधानिक चेतावनी स्पष्ट होती तिच्या बहिणीशी जास्त गूटरगूँ केलेली तिला आवडत नाही.

तात्पर्य एवढेच, लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

9 Jul 2023 - 10:44 am | चलत मुसाफिर

ज्याचं जळतं त्यालाच कळतं

खुसखुशीत लेख, आवडला

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2023 - 11:34 am | प्रसाद गोडबोले

हा हा हा !

मजेशीर लेख !

पण लक्षात ठेवा - स्त्रीयांसाठी वयाची १८-२३ वर्षे ही प्राईम असतात , तसे पुरुषांच्यासाठी ३५-४५ ही वर्षे प्राईम असतात ! स्वतःच्या फिजिककडे , आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही , शरीरयष्ठी सुदृढ ठेवली तर व्यवस्थिथ एस्टॅब्लिश्ड झालेले , फायनन्शियली इन्डिपेन्ड्डंट आणि मॅच्युअर्ड असे "अंकल" जबरदस्त स्कोअर करु करु शकतात ;)
मिलिंद सोमण ह्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा !
मेन नेव्हर गेट ओल्ड, दे गेट एज्ड लाईक अ प्रीमीयम सिंगल्माल्ट स्कॉच व्हिस्की !

चीअर्स !

विवेकपटाईत's picture

9 Jul 2023 - 1:55 pm | विवेकपटाईत

फार उशीर सल्ला मिळाला. आता काहीही उपयोग नाही.

सुरिया's picture

9 Jul 2023 - 5:21 pm | सुरिया

शरीरयष्ठी सुदृढ ठेवली तर व्यवस्थिथ एस्टॅब्लिश्ड झालेले , फायनन्शियली इन्डिपेन्ड्डंट आणि मॅच्युअर्ड असे "अंकल" जबरदस्त स्कोअर करु करु शकतात ;)

अगदी अगदी.
खरे म्हणले तर अशा षोडशा अंकल म्हणू दे नाहीतर काही म्हणू दे. कमॉन बेटा म्हणत त्यांना त्यांच्या इन्स्टारील आणि तीस चाळीस किलोच्या कवल्या बीएफ साठी सोडून द्यायचे. अशा न तशा त्यांना कसेही राहू दे , आपण एकदम पांढरे जरी झाले केस तरी शिस्तीत लेटेस्ट कट करुन त्याच शुगर न सॉल्ट ची मस्त दाढी मूछ मिरवायची. जिममध्ये जाऊन तब्येत मापात ठेवायची, एखादी वज्ज्जनदार बाईक घेऊन कॅमाफ्लज कार्गो बिर्गो घालून फिरा. कशा नजरा फिरतात तुमच्याकडे नुसते बघा. पोरी सोडा, बर्फ्या अन काजुकतल्यांच्या डोळ्यातला हेवा एंजॉय करायचा.
उगी वयाच्या तिशी पस्तीशीनंतर फेसबुक न सोशल मिडीया करण्यापेक्षा अ‍ॅक्चुअल सोशल व्ह्यायचं. एखादा चांगला इंटरॅक्टीव्ह छंद जोपासायचा (आपल्यासाठी चांगलाच असतो पण इंप्रेशन पाडायला मदत होते. नुसते मला आवडते म्हणून गड किल्ले फिर्तो हे जगन्न्नाथाला शरण जाण्यासारखे असते. ;)) हे ढीगभर वाचन, राहुलमोदी, धर्मरक्षण, इतिहास अन नॉस्टेल्जिक पोस्टींच्या बुंद्या पाडत बसण्याऐवजी अ‍ॅक्चुअल माणसाला वाचायचे. सोशल बिशल मिडीया नुसता च्युपणा असतो त्याऐवजी स्टायलिश राहुन मॉलात फिरा, पिक्चर टाका, पार्कात जॉगिंग आणि स्ट्रेचेस मारा. वय बिय सोडा, बघा कशी एकेक अस्सल सौन्दर्यस्थळे गवसतील. जीवन तेच हो.
कुणीतरी लैच जुन्या काळी संगीत नाटकांत म्हणूनच ठेवलंय बघा, "तेच पुरुष भाग्याचे, अंगे भिजल्या जलधारांनी, ऐशा ललना, स्वये येऊन आलिंगती ज्यांना"
.

मेन नेव्हर गेट ओल्ड, दे गेट एज्ड लाईक अ प्रीमीयम सिंगल्माल्ट स्कॉच व्हिस्की !

हेच आणि हेच आणि फक्त हेच.......
.
.
-असाच शंभर नजरांतला हेवा मिरवणारा चाळीशीपार सेक्सी अंकल

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2023 - 5:44 pm | चौथा कोनाडा

अगदी खरंय ...... लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात !

पण हे अंकल लैच पॉप्यूलर आहेत !

DUNCGRT45

वामन देशमुख's picture

9 Jul 2023 - 8:12 pm | वामन देशमुख

किमान मला तरी असे वाटते.

#MeToo

विवेक पटाईत साहेब,

तुमचे आध्यात्मिक धागे वाचून तुमचं हे रूप असेल असं वाटलं नव्हतं. पण वर मार्कस ओरॅलियस यांनी म्हटल्याप्रमाणे' "मेन नेव्हर गेट ओल्ड, दे गेट एज्ड लाईक अ प्रीमीयम सिंगल्माल्ट स्कॉच व्हिस्की !" हेच सत्य!

मीही पंचेचाळीशीचा आहे, इतर समवयीन पुरुषांप्रमाणे मला देखील "तारुण्य नुकतंच कुठं सुरू झालंय" असं वाटतं.

स्त्री असो की पुरुष, माणसांनं कधी मनाने म्हातारं होऊ नये, मरेपर्यंत तरुण राहावं; त्यासाठी मरेपर्यंत काम करत राहावं, रिटायर होऊ नये.

लेख आणि प्रतिक्रिया आवडल्या आणि रिलेट् झाल्या.

इतर वाचकांच्याही प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

विवेकपटाईत's picture

10 Jul 2023 - 9:18 am | विवेकपटाईत

माझ्या सर्व कथा मागील एखादी सत्य घटना असते. बाकी ९० टक्के कल्पना.बाकी अध्यात्म हा जीवनाचा एक भाग आहे

कंजूसपणा सोडा.

"नमस्ते अंकलजी" म्हणणारीस आपण "नमस्ते आंटीजी" म्हणत दिल्ली स्टाईलने 'पायलागू' करायचे. (अर्थात असे करण्याचे वय आता गेले)
-- लेख एकदम फर्मास. .

सौंदाळा's picture

10 Jul 2023 - 10:29 am | सौंदाळा

भारीच लेख,
पटाईतकाकांची ही बाजू माहिती नव्हती.

मजेशीर लेख आणि मार्मिक प्रतिसाद 😀
वरिल मार्कस ऑरेलियस, सुरिया आणि वामन देशमुख ह्यंच्या प्रतिसादांशी पुर्ण सहमत!

लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.

अनेकदा ह्याच्या उलट प्रकारही बघायला मिळतो. दाढीमिशा 'सॉल्ट अँड पेपर' टाईप झालेले प्रौढ पुरुष अनेक तरुण मुलींना 'एजिंग ग्रेसफुली' वाटत असल्याने त्या अशा पुरुषांना दादा किंवा भाई वगैरे संबोधतात पण त्यांच्या बायकांना मात्र काकू किंवा आंटी म्हणतात तेव्हा 'आंटी' म्हणवले गेलेलया स्त्रियांच्या चेहऱ्यावरील भाव बघितले कि 'हम पांच' ह्या झी टीव्हीवरील एकेकाळी गाजलेल्या सीरिअल मधली "आंटी मत काहो ना" म्हणणाऱ्या पूजा 'आंटी' ची आठवण आल्याशिवाय राहत नाही 😂

सुबोध खरे's picture

11 Jul 2023 - 12:36 pm | सुबोध खरे

मी मुंबईच्या नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयात इंटर्नशिप करत होतो (लेफ्टनंट होतो) तेंव्हा ऑफिसरच्या ओपीडीत रुग्ण पाहून बाहेर आलो आणि माझ्या मोटर सायकल कडे आलो. तेंव्हा तेथे के जी मधली दोन गोड मुले उभी होती. छान पैकी शाळेचा गणवेश होता. त्यातील मुलीने बाजूला उभ्या असलेल्या मुलाकडे बोट दाखवून विचारले, अंकल, आप इसके पापा हो?. मला हसूच आलं.
पूर्ण गणवेशातील एक अधिकारी पाहून त्या गोड मुलीला मी त्या मुलाचा बाप असावा असे वाटले. अर्थात मी हसून तिला नाही म्हणालो आणि पुढे निघालो. त्या वेळेस माझं वय केवळ २२ होतं आणि ती मुलं फारच गोड आणि निरागस होती त्यामुळे मला त्याची गंमत च वाटली.

पुढे चार वर्षांनी माझं लग्न झालं आणि मला पुण्यात घर मिळालं. त्या वेळेस आमच्या घराखाली एका ऍडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर राहत होते. ते ए एम सी मधील नॉन टेक ऑफिसर होते म्हणजे सोल्जरचे ऑफिसर झालेले असल्याने त्यांचे वय जास्त होते आणि त्यांची २१ वर्षाची बी एस सी झालेली मुलगी होती. त्या दिवशी आमच्या कॉलनीत पाणी येणार नव्हते म्हणून हि मुलगी आमच्या घरी आली आणि तिने माझ्या पत्नीला सांगितले कि आंटी आज पाणी येणार नाही.

आंटी म्हणाल्यामुळे बायकोचा पापड मोडला.

माझी पत्नी नुकतीच एम बी बी एस झालेली होती आणि तिचे वय २३ होती म्हणुजे या मुलीच्या पेक्षा केवळ २ वर्षाने मोठी. आणि माझी पत्नी सडपातळ होती (आजही तशीच आहे).

केवळ २ वर्षाने मोठी असली तरी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झालंय म्हणून आंटी म्हणवलं गेलं याचा माझ्या पत्नीला फार संताप झाला. आणि मला फार हसू येत होतं.

विवेकपटाईत's picture

12 Jul 2023 - 7:44 am | विवेकपटाईत

हा! हा! हा! . अंकल/ आंटी संबोधन आदर देण्यासाठी असतो. पण वेळ काळ चुकत असल्याने असा आदर सन्मान आपल्याला नकोसा वाटतो.

कानडाऊ योगेशु's picture

12 Jul 2023 - 9:48 am | कानडाऊ योगेशु

ह्याच्या उलट किस्सा माझ्याबाबतीत घडला. पत्नी राज्यस्तरीय सरकारी अधिकारी असल्याने एका तालुकावजा खेडेगावात तिची बदली झाली होती व ती बेंगलोरवरुन तिकडे गेली होती सोबत त्यावेळी ७-८ वर्षेच्या कन्येला घेऊन.बेंगलोर ते हे गाव हा फार मोठा सामाजिक सांस्कृतिक फरक होता व साहजिकच तिथल्या शाळेतल्या तिथल्या मुलींना माझ्या मुलीचे फार अप्रूप होते. म्हणजे प्लेन मधुन आली.बेंगलोरमध्ये राहिलीय वगैरे. मी तोपावेतो त्या गावात गेलो नव्हतो. आणि इकडे बेंगलोरमध्ये काही दिवस एकटा राहत होतो.
आणि एके दिवशी त्या गावात जाण्याचा योग आला. पत्नीला चकित करायला मी भरपूर दाढी वाढवली होती.(बघ तुझ्या शिवाय जगताना काय हाल होताहेत माझे असे आडवळणाने दाखविण्याचा हेतु होता.). तिकडे मुलीने शाळेतल्या मैत्रिणींना सांगितले कि माझे पपा येणार आहेत. तर मी गावात आल्यानंतर मुलीला घ्यायला सरकारी वाहनाने शाळेत गेलो होतो. तिने अगोदरच तिच्या मैत्रिणींना सांगितले होते कि माझे पापा येणार आहेत तर शाळा सुटली मी बाहेर उभा होतो मुलीचा वर्ग दुसर्या मजल्यावर होता व तिथुन प्रवेशद्वार दिसत होते. मुलीसोबत तिच्या मैत्रिणीही उडत बागडत जिन्यावरुन येत असताना मुलीने माझ्याकडे बोट दाखवुन सांगितले माझे पपा. मला पाहुन त्या उछल कुद करण्यार्या मुलींचे हावभाव जिन्याच्या प्रत्येक पायरीगणिक बदलत गेलेले मी पाहिले. (मी पूर्ण दाढी वाढवली होती.).मुलीला ही माहिती नव्हते कि मी दाढी वाढवली आहे ते. तिला विचारले कि तुझ्या मैत्रिणी अश्या भूत पाहिल्यासारखा चेहरा का करुन गेल्या? ती म्हणाली त्यांना वाटले शाहरुख खानच माझे पापा आहेत ते.(७-८ वर्षातली निरागसता.). कालांतराअने माझ्या वडिलांना हा किस्सा सांगितला व पूर्ण अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीतला फोटो दाखवला तर ते म्हणाले मुलीच्या मैत्रिणी का चकित होणार नाहीत. तू तर चक्क चंबळ मधला डाकु दिसत होतास तेव्हा म्हणुन.

वामन देशमुख's picture

11 Jul 2023 - 12:52 pm | वामन देशमुख

याचा माझ्या पत्नीला फार संताप झाला. आणि मला फार हसू येत होतं.

दुष्ट दुष्ट!

---

हघ्याहेवेसांन

अनिल हटेला's picture

12 Jul 2023 - 9:50 am | अनिल हटेला

तात्पर्य एवढेच, लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.

अगदी मान्य..
लेख आवडला....