पुनश्च १४ मे
सकाळी साडेसहा वाजता गजर वाजला आणि तो नेहमीप्रमाणे आज झोपला आणि काल सकाळी उठला. १४ मेला रात्री झोपला आणि १४ मेला सकाळी उठला!
हा गजर बरा पडतो. बायको उठून गदा गदा हलवून जागं करणार त्यापेक्षा हा नाजूक किणकिण करणारा गजर परवडला. उठायचा अगदी कंटाळा आला होता. रोज रोज उठायचा कंटाळा करून कसं चालेल?
रात्री केव्हातरी त्याला जाग आली होती. कसलं तरी स्वप्न पडत होतं. एकदम वीज कडाडल्याचा आवाज आला होता. त्यानेच झोपमोड झाली. शेजारीच बायको झोपली होती. घोरत होती. झोपेत देखील चेहऱ्यावर तिरसट रागीट नाराजीचे भाव होते. ही कसली स्वप्ने बघत असेल बरं? तीच ती. झाडू पोछा करणाऱ्या बाईला रागावत असेल. नाहीतर महागाईची तक्रार करत असेल. दुसरं काय करणार म्हणा. रोज रोज तेच तेच. तिच्या घोरण्याचा आवाज दाबून टाकण्यासाठी त्याने डोक्यावरून पांघरूण घट्ट ओढून घेतलं. नाक बंद करता येतं, डोळे बंद करता येतात, तोंड बंद ठेवता येतं, पण कान?
तर तो उठला. नेहमीप्रमाणे बायको उठून कामाला लागली असणार.
तो जेव्हा जागा झाला तेव्हा फ्लॉवरपॉटमध्ये तो काल ठेवलेला गुलाबांचा पुष्पगुच्छ तिथे नव्हता हे त्याच्या लक्षात येणे शक्यच नव्हते. शोकेसमध्ये ठेवलेली घडाळ्याची डबी. कुठली डबी? कुणी ठेवली? काहीच्या काही. आणि ते कॅलेनडरवरच्या १४ मे तारखे भोवती लाल शाईने लिहिलेले. “माय लकी डे.” ते ही अदृश्य झाले होते.
तयार होऊन तो किचनकडे गेला. डायनिंग टेबलावर आजचा पेपर पडला होता. बायकोनं त्याच्या समोर चहाचा कप ठेवला.
“ब्रेकफास्टला काय करू? बटाटे पोहे कि उप्पीट?”
“बटाटे पोहे? नाय नाय. रोज रोज काय पोहे. आज ना तू उप्पीट कर.” बोलता बोलता कुलकर्णी हेडलाइन्स वाचत होता.
निवडणुकीत ह्याचा हा होणार.
ह्यांनी ह्याचे हे केले.
त्यांनी त्याला तंबी दिली.
...
...
महागाई ह्याने ही झाली.
साने डेअरीने दुधाचे भाव लिटरमागे एक रुपयाने वाढवले.
साने गुरुजींच्या समग्र वाङमया संच केवळ एक हजार रुपयात घ्या. आपली ऑर्डर आजच नोंदवा.
उप्पीट? साने? साने आणि उप्पीट ह्याचा काय संबंध?
“अरे तुझे लक्ष कुठाय? उप्पीट थंड होतंय बघ.” त्याने पेपर बाजूला केला आणि उप्पीटवर आपले लक्ष केंद्रित केले.
“उप्पीट एकदम फर्मास झालं आहे बरका. मधु. मला एक सांग आपण ब्रेकफास्टला रोज उप्पीट खात आहोत का?”
“काहीतरीच काय? उप्पीट लास्ट केव्हा केले होतं बरं?” मधु आठवायचा प्रयत्न करत म्हणाली.
“हो ना. मी पण तेच त्याला सांगत होतो.”
“कुणाला? कुणाला काय सांगत होता?”
कुलकर्णी गडबडला. आपण कुणाशी काय बोलत होतो. कुणाला काय सांगत होतो. त्याच्या डोक्यात क्रॉस कनेक्शन झाली होती. डोक्यात साने मेंदू कुरतडत होता. कुलकर्णीने जोर लावून त्याला हाकलून दिले.
पुन्हा एकदा चहा झाला. ऑफिसला जायची वेळ झाली.
“आज तू हा दादाने दिलेला शर्ट घालून ऑफिसला जा हं.” मधूने त्याच्या हातात जांभळ्या रंगाचा शर्ट दिला. कुलकर्णीचं जांभळ्या रंगाशी काही खास वैर नव्हते. त्याला खरतर ग्रे कलरचा शर्ट पसंत होता. पण उगाच कशाला विसंवाद? जांभळा तर जांभळा.
“किती शोभून दिसतोय? आता हाच रोज वापरायचा बर.” हे कोण बोलले? दुसर कोण बोलणार? मधुच असणार.
रोज?
“कितीही शोभून दिसला तरी रोज?” कुलकर्णीने गोड तक्रार केली. पण ते वाक्य मधूला ऐकू गेले नसणार. कारण ती कुलकर्णीचा डबा भरण्यात गुंतली होती.
कुलकर्णी ऑफिसची बॅग घेऊन घराबाहेर पडला. आज तो तीन नंबरच्या बसने जाणार होता. रोज तो सात नंबरच्या बसने जातो. तीन नंबरच्या बसचा थांबा ऑफिसापासून जरा दूर आहे. सात नंबर अगदी ऑफिससमोर थांबते. थोडं चालावं लागेल. पर्वा नाही. पण निदान त्या अघाव मुलीचे थोबाड पहावे लागणार नाही.
तीन नंबर आली. तो बसमध्ये चढला. हाय रे त्याचे नशीब. ती होतीच तिथे बसलेली. वर मिरची म्हणजे बसमध्ये फक्त तिच्या जवळचीच जागा मोकळी होती. तो तिथे बसला कि ती तिची पर्स उचलून दोघांच्या मधे ठेवणार होती. आविर्भाव असा कि कुलकर्णी जवळ बसला कि तिच्याशी लगट करणार होता. काय समजते स्वतःला सा...
त्याने उभ्यानेच ऑफिसपर्यंत प्रवास केला. काय करणार बिचारा. सगळं सहन करावं लागतं. आपण पुल्लिंगी पडलो ना.
मिस्टर कुलकर्णी तुम्ही कशानेही प्रवास करा हो. ट्रेनने जा, विमानाने जा, बोटीने जा, अगदी रॉकेटने चंद्रावर जा. प्रवासात ही तरुणी तुमच्या शेजारी असणारच.
कुलकर्णी ऑफिसात आला तेव्हा आजचा दिवस नवलाईचा आहे याची त्याला यःकिंचित जाणीव नव्हती. खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर पांडूने चहा आणून टेबलावर ठेवला. एक बंद लिफाफा समोर ठेवला.
“हा आज सकाळी कुरिअरने आणून दिला.”
कुलकर्णीने लिफाफा एका नजरेत बघितला. वर “कल्पित अकल्पित” मासिकाचा शिक्का होता. आत रिजेक्शन स्लीप असणार ह्याची त्याला पक्की खात्री होती. ही एक्कावनावी नकारघंटा होती. आता बस. हा उपद्व्याप इथेच थांबवायचा. माझ्यात आता ताकद नाही नकार पचवायची.
त्याने लिफाफा बाजूला केला आणि कामाचे कागद समोर ओढले. पण तो लिफाफा. तो उघडण्याचे एक कारण त्याला मिळाले. रिजेक्शन स्लीप कुरिअरने कोण पाठवतो? अगदी थर्ड क्लास कुरिअर देखील पन्नास रुपये आकारत असणार. त्याला नवा हुरूप आला. उघडून बघायला काय हरकत आहे? कथा साभार नाकारली असेल. सो व्हाट?
कधी नव्हे ते त्यांच्या कथेला “कल्पित अकल्पित” मासिकाच्या संपादकाने स्वीकृत केले होते.
“कुलकर्णी, तुमची “प्रेम पहावे करून” ही कथा आम्हाला प्रचंड आवडली आहे. ही कथा आमच्या मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येईल. आम्ही साहित्याचे पैशात मूल्यमापन करण्याच्या जुनाट कल्पनेच्या विरुद्ध आहोत. तरी देखील फूल ना फुलाची पाकळी म्हणून धनादेश पाठवत आहे त्याचा स्वीकार करावा.”
“करणार. करणार.” कुलकर्णी जोरात बोलला. बाजूचे डेस्कटॉप थोडावेळ थिजले. दिवे फ्लिकर झाले. मिस पिंगे वळून म्हणाली, “कुलकर्णी काय झाले हो. माझा डेस्कटॉप हँग झाला.”
कुलकर्णीने हळुवारपणे चेक खिशात टाकला. पुन्हा काढला पुन्हा वाचला. अगदी पुन्हा पुन्हा पुन्हा वाचला. आपण स्वप्नात नाही हे कन्फर्म कसं करावे बरं?
कुलकर्णीने फाईल समोर ओढली आणि कामाला सुरवात केली.
पांडू पुन्हा समोर टपकला.
“मोठ्या साहेबाने आत केबिनमध्ये बोलावले आहे.”
साहेबाला आपली आठवण का झाली ह्याची कुलकर्णीला कल्पना होती. पारसमल कंपनीचे हिशेब अजून फायनल झाले नव्हते. कसे होणार? तो साला कागदपत्रे पाठवायला अळमटळम करत होता. आज उद्यां करत होता. कारण साहेबाला सुद्धा माहित होते. साहेबाच नेहमीच वाक्य. “कुलकर्णी, सगळा डेटा मिळाला तर आपला साने पण फाईल क्लोज करेल. त्यात काय विशेष...”
पुन्हा साने. हा साने कसबा गणपतीच्या आजूबाजूला कुठेतरी रहातो. हा साने म्हणजे तो साने नाही बरका. पुन्हा लिंक तुटली.
कातडी निगरगट्ट करून कुलकर्णी साहेबाच्या केबिनकडे निघाला.
“या, कुलकर्णी बसा.” साहेब इतक्या गोड आवाजात का बरं बोलत असावा?
“कुलकर्णी, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. ओळखा पाहू? नाही ओळखत ना. मी सांगतो. आपले मॅनेजर केंकरे नोकरी सोडून चालले आहेत. त्यांच्या जागी मी तुमची शिफारस केली होती. ती मॅनेजमेंटने मान्य केली आहे. तुमचे प्रमोशन आधीच व्हायला पाहिजे होतं. पण म्हणतात ना...”
कुलकर्णीने टेबलाचा आधार घेतला होता म्हणून बरे होते नाहीतर तो कोलमडून खाली कोसळला असता.
“थँक्यू. थँक्यू सो मच!” कसबस बोलून कुलकर्णी बाहेर आला.
“सॉलिड फायरिंग झालेलं दिसतंय.” कोण तरी कुजबुजलं.
पण जेवणाच्या सुट्टीपर्यंत ही बातमी सगळीकडे पसरली. एक एक सहकाऱ्यांनी येऊन अभिनंदनाचा वर्षाव केला. संध्याकाळी सर्वांनी मिळून गुलाबांच्या फुलांचा भरगच्च बुके आणून दिला. येताना वाट वाकडी करून बायकोसाठी टायटनचे नाजूक रिस्टवाच खरेदी करून तो नुकताच नेहमीच्या हॉटेलात येऊन टेकला असेल नसेल तोच वीज कडाडली. लख्ख प्रकाश पडला. कुलकर्णी घाबरून उठून उभा राहिला. बघतच राहिला. हॉटेलमधले वेटर. गल्ल्यावरचा शेट्टी, रस्त्यावरचे लोक जणू काही झालेच नाही अश्या आविर्भावात वागत होते. कदाचित मला भास झाला असेल. होतं असं कधी कधी. कुलकर्णी मनातल्या मनात म्हणाला.
“हा भास नाही, कुलकर्णी.” तो हॉटेलच्या टोकाला बसलेला त्याच्या समोर येऊन बसला होता. “हा भास नाही.”
तो उंच, कृश शरीरयष्टी असलेला आणि गालफाडे बसलेला माणूस त्याच्याशीच बोलत होता. त्याचे नाक गरुडासारखे होते. नजर आरपार जाणारी. एव्हढा सगळा ठसठसीत माणूस का कोणजाणे कुलकर्ण्याला पुस्सट वाटला.
“आठवतंय? काल आपण भेटलो होतो? सांगा पाहू माझं नाव काय आहे?” तो माणूस कोडे घालून बोलत होता.
“साने? आहा. ओळखलं कि नाही. माझ्या स्मरणशक्तीची परिक्षा घेऊ नका. ३० पर्यंतचे पाढे, पावकी, निमकी, पाउणकी. सव्वायकी, दिडकी, आउटकी अजून पाठ आहेत...”
“ओके ओके. आज काल उद्या ह्यातला फरक समजत नाही. मग आज उप्पीट खाल्लं कि नाही? जांभळा शर्ट? काल काय खाल्लं होतं? काल कुठल्या कलरचा शर्ट होता.”
“काल मी कांदा पोहे खाल्ले होते. ग्रे कलरचा शर्ट...”
“कुलकर्णी, ह्या सगळ्या तुमच्या हजार वर्षापुर्वीच्या आठवणी आहेत. तुम्ही महान आहात. तुम्हाला हजार वर्षापूर्वीचे आठवते आहे पण कालचं आठवत नाही. माझच चुकलं. तुम्ही म्हणजे हजार वर्षाचे कंपोस्ट आहात. गुड बाय.”
पुन्हा वीज कडाडली आणि साने चालता झाला.
पुन्हा एकदा वीज कडाडली. कुलकर्णी जणू स्वप्नातून बाहेर पडला. आता म्हणजे दिवसा स्वप्न पडायला लागली होती. स्वप्न नाहीतर काय?
तस म्हटलं तर आजचा दिवस स्वपवत् होता. “कल्पित अकल्पित” नावाच्या मासिकाच्या संपादकाने त्याची कथा स्वीकृत केली होती. थोडे फार मानधनही पाठवले होते. इतक्या ठिकाणाहून नकारघंटा घेऊन आलेली ती कथा! पण सर डॉक्टर भवभूतींनी म्हणून ठेवले आहेच.
“स्पेस-टाईम अनंत आहे. तस्मात् माझी कथा कधीतरी केव्हातरी कुठेतरी कुणालातरी आवडेलच.”
त्याच्यावर विश्वास ठेवून ती कथा यच्चयावत सर्व मासिकांच्याकडे पाठवली होती. आणि सर्व मासिकांनी ती साभार परत पाठवली होती.
पण आजचा दिवस निराळा होता.
अजून एक. कुलकर्णीला आज बढती मिळाली होती. सज्जड पाच हजार दरमहाची बढती.
एक सेलेब्रेशन तो बनता ही है.
एका हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ आणि दुसऱ्या हातात टायटनची लेडीज रिस्टवॉचची डबी घेऊन कुलकर्णीने घराकडे मोर्चा वळवला.
रस्त्यात एका अनोळखी माणसाने त्याला हटकले.
“एक्सक्युज मी, तो साने कुठे दिसला होता का?”
“साने? कोण साने?” कुलकर्णीचा गोंधळ झाला होता.त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला. “नाही बुवा.”
“अहो तो उंच, कृश शरीरयष्टी असलेला आणि गालफाडे बसलेला माणूस त्याचे नाक गरुडासारखे आहे. नजर आरपार जाणारी. तो सान्या. आता मी त्याला जाताना बघितला.”
“सॉरी, हा नाही माहित, एक साने आमच्या ऑफिसमध्ये आहे पण तो बुटका जाडसर आहे. तो तर कसबा गणपतीच्या देवळा जवळ रहातो.”
“तो नाही हो. मी शोधतोय तो साने कुठं काम वगैरे करणाऱ्यातला नाही. एक नंबरचा डांबिस माणूस; भेटला तुम्हाला तर ह्या नंबरवर फोन करून मला कळवा. अरेस्ट वारंट आहे त्याच्यावर. ऑफ़िशिअल सिक्रेट कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. हे माझे कार्ड ठेवा.” अस बोलून तो माणूस चालता झाला.
घरापर्यंत येईस्तवर कुलकर्णी साने एपिसोड विसरून गेला.
घरी बायाकोनं त्याला बघितलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. गुलाबाच्या फुलांचा गुच्छ! आपला नवरा एव्हढा रसिक केव्हापासून झाला? कुलकर्णीने ऑफिसमधला प्रमोशनचा किस्सा ऐकवला. मासिकात छापुन येणाऱ्या गोष्टीची कथा सांगितली.
“आजच्या दिवसाची आठवण म्हणून हे रिस्टवाच तुझ्यासाठी.”
“अहो, कशाला खर्च केला. टाईम काय मोबाईल मधे बघता येतो की.”
चहा पिता पिता अशी बरीच काही बोलणी झाली.
एकूण हा १४ मे. असा हा दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार? चमत्कार रोज रोज होत नसतात. आज झाला. म्हणून रोज थोडाच होणार.
त्याने फुलांचा गुलदस्ता फुलदाणीत ठेवला. नवीन घेतलेले मनगटी घड्याळ बायकोने शोकेसमध्ये ठेऊन दिले. कुलकर्णीने कॅलेनडरवरच्या १४ मे तारखे भोवती लाल शाईने लिहिले. “माय लकी डे.”
सुखी माणसाचा लकी जांभळा शर्ट आता वार्डरोब मध्ये हँगरवर लटकत होता.
१४ मे संपत आला होता.
अशा प्रकारे ते सुखी जोडपे एकमेकांच्या मिठीत सुखाने झोपी गेले.
तर असा १४ मे रोज येत होता. कुलकर्णी रोज सकाळी उप्पीट खात होता. जांभळा शर्ट घालून ऑफिसात जात होता. रोज त्या आगाव मुलीचे दर्शन घेत होता. रोज त्याची कथा संपादकाला प्रचंड आवडत होती. त्याचे प्रमोशन होत होतं. बायकोसाठी नाजूक रिस्टवाच आणि फुलांचा गुच्छ घेऊन घरी परतत होता.
फुलांचा गुलदस्ता फुलदाणीत ठेवत होता. नवीन घेतलेले मनगटी घड्याळ बायको शोकेसमध्ये ठेऊन देत होती. कुलकर्णी कॅलेंडरवरच्या १४ मे तारखे भोवती लाल शाईने रोज लिहित होता. “माय लकी डे.”
तर अशी हजारो वर्षे गेली. आणि एके दिवशी संध्याकाळी त्या हॉटेलात कुलकर्णी गुलाब फुलांचा गुच्छा आणि टायटनच्या लेडीज रिस्टवाचची डबी घेऊन बसला असताना वीज कडाडली आणि मिस्टर साने अवतीर्ण झाले.
“काय कुलकर्णी ओळखलत कि नाही? का एव्हढ्यात विसरलात मला.”
“साने? कसा विसरेन. कालच आपण भेटलो नाही का? काय चहा घेणार?”
“घेणार पण तत्पूर्वी मला सांगा आजच उप्पीट कसं होत?”
“एकदम चवदार! खूप दिवसांनी केलं होतं ना. खूप छान करते हो. उप्पीट. माझी बायको.”
“आणि हा जांभळा शर्ट. मेव्हण्याने कालच भेट म्हणून दिला असणार. हो ना.”
“आवडला ना? ऑफिसमध्ये सगळ्यांना आवडला.”
“कुलकर्णी, अरेरे. मला वाटलं होतं निदान तुम्हाला तरी... पण नाही. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे.” इतके बोलून साने जागेवरून उठला, “कुलकर्णी, मी तुमचा एक फोटो काढू काहो?”
“काढा. बिनधास्त काढा.”
सानेने खिशातून कॅमेरासारखे काहीतरी बाहेर काढले. ते कुलकर्णीवर रोखले.
“रेडी, स्टेडी अँड गो.”
वीज कडाडली आणि साने अदृश्य झाला.
zzzzzzzzzzzzzzzzzzzz भाग २ संपला.
प्रतिक्रिया
2 Aug 2023 - 1:56 pm | टर्मीनेटर
वाचतोय...
मागे एक हॉलीवुडपट पाहिला होता (अत्ता नाव आठवत नाही) त्याची आठवण आली! अर्थात कथानक वेगळे आहे पण त्यातही नायक एका रहस्याची उकल करण्यासाठी असाच एका लुप मध्ये फसतो (जातो), एकच प्रसंग चित्रपटात वारंवार येत असला तरी पिक्चर चांगला होता. नाव आठवले तर प्रतिसादतो.
2 Aug 2023 - 2:21 pm | भागो
किंवा हा ही असू शकेल.
short Oscar-nominated film, 12:01 PM (1991) directed by Jonathan Heap.
ह्यात एका तासाचे टाईम लूप आहे. दुपारी १२ ते १ वाजे पर्यंत.
2 Aug 2023 - 2:05 pm | भागो
Groundhog day.
हा चित्रपट बघितला नाहीये. पण साधारणपणे रूप रेखा माहित आहे. अर्थात माझी कथा त्यातूनच स्फुरली आहे.
2 Aug 2023 - 2:47 pm | टर्मीनेटर
Groundhog day मी पण नाही पहिलाय!
सापडला... Source Code मध्ये तसे प्रसंग आहेत. अर्थात वरती म्हणाल्याप्रमाणे कथानक वेगळं आहे, पण चांगला साय-फाय वाटला होता. युट्युबवर हिंदीत उपलब्ध दिसतोय. https://www.youtube.com/watch?v=X_tNRH3cqhQ
2 Aug 2023 - 3:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त चालली आहे कथा
असा एक चित्रपट बघितलेला आठवतोय "छोडो कल की बाते"
https://www.imdb.com/title/tt2343417/
2 Aug 2023 - 3:33 pm | भागो
हा जरा जवळचा वाटतोय पण नेतवर कुठे दिसत नाहीये. So Sad!