कॉस्मिक सेन्सॉरशिप
भाग -५
“राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले.
डायहायड्रोजन मोनाक्साइड?
आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील.
“वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका. आणि पुढे गेलात तरी जादुगाराने देलेले पाणी अजिबात पिऊ नका.” जादूगाराची आठवण झाली आणि पुन्हा करमरकरांच्या मेंदूत घणाचे घाव पडू लागले.
"पाणी? राघव अरे पाणी पाणी काय करतोयस? "
शास्त्रीनी त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. किचन मधल्या फ्रीज मधून गार डायहायड्रोजन मोनाक्साइडचा ग्लास भरून आणला, “घे राघव पी. तुला थोडा आराम पडेल.”
“तुम्ही जादुगार पाशा तर नाहीत ना? मला तहान लागली आहे खरी पण तुम्ही जादुगार पाशा असाल तर मला हे पेय पाणी नको.” डॉक्टर निग्रहाने बोलले.
“पुन्हा पाणी म्हणतोयस? नाही, हे पाणी बिणी नाही. हे डायहायड्रोजन मोनाक्साइड आहे. आम्ही हे दिवसातून दोन लिटर पितो. आणि मी पाशा नाही. मी डॉक्टर शास्त्री आहे. काही अनमान न करता पी.”
डॉक्टर जे काय होते ते पेय प्यालेे. खरोखर त्याना आता बरं वाटायला लागले. चित्तवृत्ति उल्हसित झाल्या. डोक्यातला घणाघात बंद झाले.
सोफ्यावर आडवा होऊन ते सीलिंगच्या एलइडी दिव्याकडे बघू लागले.
“मिस लिली, ही जी ह्या बाजूला दिसती आहे ती शुक्राची चांदणी, मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये सांगत होतो ना ह्या ग्रहाचे वैशिष्ट्य...” डॉक्टर बोलत गेले. शेवटी ते एव्हढेच म्हणाले, “आत्या, मला खूप झोप येतेय. मी आता झोपतोय. तू जेऊन घे. मला भूक नाही. माझ्या जेवणाला सुट्टी...”
तो झोपलाय पाहून पुष्पाने बेडरूम मधून एक चादर आणून हळुवारपणे त्याच्या अंगावर पांघरली. बिचारी!
तो गाढ झोपला आहे असं पाहून डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली, “मी त्याला डायहायड्रोजन मोनाक्साइड मधुन झोपेचे औषध दिले आहे. ह्याच्या प्रभावाने आता हा सकाळपर्यंत उठणार नाही. ह्याच्या भडकलेल्या, झपाटलेल्या मेंदूला थोडी विश्रांति मिळेल.”
पुष्पा रडकुंडीला आली होती. तिच्या सुखाच्या संसाराला नजर लागली होती. एका तासापूर्वी सुख दुथडी भरून वाहत होते. आणि आता मधुघट रिकामे झाले होते, “दादा, काय करू? कुठे जाऊ? तूच मला मार्ग दाखव.”
दादा तरी काय उत्तर देणार? शेवटी त्याने धीर धरुन डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर हा काय प्रकार आहे? राघवला भुताने झपाटले आहे का? हा देव देवस्कीचा प्रकार आमच्या कोकणात......”
“पंत, प्लीज. तुम्ही विज्ञानाचे पदवीधर आहात. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐका. ह्या प्रकाराला मानसशास्त्रात डिसोशिएट आयडेंटीटी डिस्ऑर्डर- डीआयडी - असं म्हणतात. कदाचित डिसोशिएट अम्नेशियाही असू शकेल. माझ्या मते राघव फ्यूग अवस्थेत गेला आहे. फ्यूग अवस्थेत गेलेला पेशंट स्वतःची ओळख नाव, गाव, भूतकाळातलं आयुष्य सगळे विसरतो. क्वचित स्वतःची नवी ओळख बनवतो. जसं राघव स्वतःला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ समजायला लागला आहे. हे पेशंट कधी कधी घर सोडून शेकडो मैल दूर दुसऱ्या नावानं वावरतात. म्हणून राघवलाला अजिबात एकटं सोडू नका.”
इतका वेळ धीराने राहिलेल्या पुष्पाचा बांध तुटून पडला आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली.
डॉक्टरांनी तिला रडू दिले. दुखःचा पहिला उमाळा ओसरल्यावर त्यांनी हळुवारपणे सुरुवात केली, “वैनी, आता तुम्ही मी काय सांगतो ते ऐका. हा अम्नेशियाचा प्रकार असेल तर हा आजार बरा होउ शकतो. पण राघवला केव्हा नॉर्मल होईल? अगदी उद्या सकाळी किंवा कदाचित वर्ष देखील लागेल. पण जर का हा आयडेंटीटी डिस्ऑर्डरचा प्रकार असेल तर मात्र त्याला दीर्घकाळ उपचारांची गरज लागेल. माझ्या मते तो निश्चित नॉर्मल होईल. हा तुमच्या कसोटीचा काळ आहे खरा.” इतका वेळ चूप बसलेल्या दादाला कंठ फुटला, “पण आमच्या राघवलाच हे दुर्दैवाचे दशावतार का बघावे लागत आहेत? आमच्या हातून कुलदेवतेचं करण्यात काही उणीव, त्रुटी राहिली असेल काय?”
“पुन्हा तुम्ही वेडगळ समजुतींना कवटाळून बसला आहात? तुम्हाला मनःशांति मिळत असेल तर काय पाहिजे ते दैवी उपाय खुशाल करा. मी काय सांगितलं ते मात्र विसरू नका. मी उद्या वेळ काढून येईन. तेव्हा सविस्तर बोलू.” डॉक्टर निघून गेले.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
चोवीस तास उलटून गेले. “मेमरीआरएनए”ने आपले काम संपवले होते. डॉक्टरांच्या मेंदूच्या एका भागात... नाही नाही, तसं नाही, राघव करमरकरच्या मेंदूच्या एका भागात... माझाही गोंधळ झाला आहे..
महिन्याभरात राघव तसा वरकरणी नॉर्मल झाला. त्याला त्याच्या भूतकाळातील अगदी बारीकसारीक गोष्टी आठवत गेल्या. चार वर्षांचा असताना त्याच्या बाबांनी कृष्णामाईच्या जत्रेत त्याला खांद्यावर बसवून कसं नाचवलं होतं, त्याच्या आईने त्याचा अकरावीचा रिझल्ट असलेलं वर्तमानपत्र कसे जपून ठेवलं होतं ( आई गेल्यावर तिच्या बॅगमध्ये तो पेपर मिळाला होता.) आयुष्यातील अपमान आठवले. (मान नाही आठवले.) आठवणी अश्या कितीतरी!
राघवच्या पाकिटात “कॅफे वाडेश्वर” ची इडली वडा सांबारची पावती आहे. राघवने ही पावती जपून ठेवली आहे. त्या पावतीवर तारीख आहे ७जुलाई २०५२! जेव्हा जेव्हा तो ही पावती बघतो तेव्हा तेव्हा त्याच्या मनात अनामिक भाव दाटून येतात. केव्हा? का? हे “कॅफे वाडेश्वर” कुठे आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे ओझे खांद्यावर घेऊन तो जगतो आहे.
त्यांच्या अंतर्मनाच्या अज्ञात कोपऱ्यात अंधारात भरभक्कम कुलूप लावून बंद केलेलं एक कपाट आहे. ते त्याला उघडण्याची खूप इच्छा आहे. बिचारा अंधारात चाचपडत किल्ली शोधतो आहे केव्हापासून!.
अशा वेळी त्याच्या मनात शास्त्रज्ञ करमरकर अवतीर्ण होतात.
“प्लीज, माझी छत्री मला परत कराल का?” ती करुण विनवणी राघवला ऐकवत नाही. तो दोनी हातांनी कान बंद करून घेतो. पण त्याचा काही उपयोग होणार नसतो. कारण आवाज बाहेरून येत नसतो. तो त्याच्या मेंदूतून येत असतो. त्याला कसं आडवणार?
राघव बाहेर कुठेही जाताना ती छत्री घेऊन बाहेर पडतो. काय सांगावं कदाचित डॉक्टर करमरकर त्याला रस्त्यात भेटतील. म्हणतील, “अरे वा. ही तर माझी छत्री.”
छत्री हाताशी असली की ज्याची त्याला हातासरशी परत करता येईल. एकदा त्यांची छत्री परत केली कि त्याचा आणि “त्यांचा” संबंध संपेल.
पुष्पाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, “अरे, असं रात्रंदिवस, तिन्हीत्रिकाळ, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा तू छत्री घेऊन फिरतोयस. लोक काय म्हणत असतील. कधी विचार केला आहेस?”
“पुष्पा, तूच विचार कर, “ते” भेटले आणि “त्यांनी” छत्री मागितली तर?”
राघवलाला जाणीव आहे कि लोक त्याच्या पाठीमागे त्याची टिंगल करतात, त्याला वेडा म्हणतात.
राघव हल्ली आरशात बघायचे टाळतो.
असच एकदा त्याने आरशात बघितले होते तर त्याला धक्काच बसला. आरशात त्याला जवळजवळ पूर्ण टक्कल पडलेला, उंच कपाळ असलेला, भेदक डोळे असलेला, बुद्धिमान चेहरा दिसला. मी असा दिसतो? मला टक्कल केव्हा पडलं? हे नाक, हे डोळे खचितच माझे नाहीत.
“हेलो मिस्टर, कोण आहात तुम्ही? माझ्या आरशात तुम्ही कसे घुसला आहात? तुम्ही बाजूला व्हा पाहू. मला केस विंचरायाचे आहेत.” राघवने थोड्या कडक आवाजात सुनावले.
“माफ करा. पण तुमच्याशी संपर्क साधण्याचा ह्या शिवाय दुसरा मार्ग नव्हता. मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे? मी आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर राघवेंद्र करमरकर, पुण्याच्या “भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” चा डायरेक्टर! माझे “कृष्ण विवर” ह्या विषयावरचे संशोधन जगन्मान्य आहे... मी मुद्दाम तुम्हाला भेटण्यासाठी आलो कारण माझी छत्री तुमच्याकडे आहे. ती मला परत कराल का?” त्या आरशातील प्रतिबिंबाने विचारले.
पुष्पा जवळच होती.
“अरे, राघव असं स्वतःशीच काय बोलत बसला आहेस? आणि ते देखील त्या डॉक्टरच्या आवाजात.”
“मी बोलत होतो?”
“मग काय. तूच तो आवाज काढत होतास ना. की “... ती मला परत कराल का?” राघव, तुझ्या अश्या विचित्र वागण्याने तू स्वतःला आणि मला पण केव्हढं टेन्शन देतोयस. तुला काही कल्पना आहे त्याची?"
त्याला पुष्पाला सांगायचे होते कि आरशात डॉक्टर आले होते आणि “ते” बोलत होते. पण त्याने वेळीच सावरले. त्यानं काही सांगायचा प्रयत्न केला असता तर पुष्पा त्याला सरळ दवाखान्यात घेऊन गेली असती. कमी बोलणे वा न बोलणे हा सुरक्षित पर्याय होता.
जेव्हा जेव्हा डॉक्टर करमरकर “येतात” तेव्हा तेव्हा राघवचा आवाज बदलतो, त्याच्या बोलण्याच्या, चालण्याच्या लकबी बदलतात. विज्ञानाची भाषा बोलायला लागतो. मूड बदललेला असेल तर शाहरुख, आमिरच्या गोष्टी सांगायला लागतो.
“एकदा मी मनाशी ठरवलं कि मग मी माझं स्वतःचं सुद्धा ऐकत नाही.” किंवा
“पुष्पा रुक क्यू गयी, गाओ ना. तुम्हारा नाम तो मीरा होना चाहिये.”
ऐकून पुष्पाच्या अंगावर अनामिक भीतीने शहारे येतात. तिच्यावर वेड लागायची पाळी आली होती. खरच हा आपला नवरा राघव आहे कि शास्त्रज्ञ राघव आहे? ह्या संशयकल्लोळाने ती अस्वस्थ होते. राघव मानसोपचारतज्ञ xxxx च्या देखरेखेखाली आहे. तो, तिचे नातेवाईक, मित्र, ओळखीतले त्याला राघवच समजतात, पण पुष्पाची खात्री नाही होतंं. हा संशय तिला बिट बाय बिट खात आहे.
एकदा तर कहर झाला.
राघव आणि पुष्पा बसने सेन्ट्रल प्लाझाकडे चालले होते. बस वाहकाने येऊन तिकिट विचारले.
“एक सेन्ट्रल प्लाझा” डॉक्टर करमरकरांनी एका तिकिटाचे पैसे दिले.
“अरे आणि माझं तिकीट कोण घेणार?” शेजारी बसलेल्या पुष्पाने त्याला विचारले.
“हलो मॅडम, माझं तिकीट कोण घेणार? तुमचं तिकीट तुम्हीच घ्यायचं. तुमच्याकडे पैसे नसतील किंवा कमी पडत असतील तर मी देऊ का? नंतर सावकाश परत करा.” डॉक्टर करमरकरांनी उदार मनाने मदत करायची तयारी दर्शवली.
पुष्पा काय समजायचे ते समजली.
वादळ जसं घोंघावत यायचं तसं निघूनही जायचं.
पुन्हा एकदा त्याची आणि डॉक्टर करमरकरांची आरशात गाठ भेट झाली. त्या दिवशी राघव एकटाच घरी होता. मुलं शाळेत गेली होती. पुष्पा सामान खरेदी करण्यासाठी बाहेर गेली होती. (राघव ऑफिसात जात नव्हता. त्याने बहुतेक मोठी सुट्टी घेतली असावी. किंवा नोकरी सोडून दिली असावी.)
“डॉक्टर, प्लीज जाऊ नका. मला तुमच्याशी बरेच काही बोलायचं आहे,”
“मलाही,” डॉक्टर हसून उत्तरले.
“डॉक्टर हा सगळा काय प्रकार आहे. तुम्ही माझ्या अस्तित्वामध्ये का प्रवेश केला आहे? मला तुमच्या समोरा समोर बसून एकदाचा हा प्रश्न निपटायचा आहे. साक्षमोक्ष करायचा आहे. मी तुम्हाला कुठे आणि कसे भेटू?”
“राघव, तुला वाटतं तसं हे सरळ सोप नाहीये. मलाही माझं अस्तित्व परत पाहिजे आहे. तू तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर हे साध्य करू शकतोस. माझी कैदेतून सुटका करू शकतोस.”
“हे पहा, मी तुमच्या सारखा वैज्ञानिक नाहीये. मला तुमची गूढ भाषा समजत नाही. तेव्हढी माझी कुवत नाही. मला समजेल अश्या भाषेत बोलून, माझ्याच्यानं जमेल असा मार्ग दाखवा.” राघव अगतिग होऊन बोलत होता.
“राघव, प्रत्येक मानवामध्ये सुप्त इच्छाशक्ती असते. तिचा वापर करून तू पुण्याला येऊन माझा शोध घे.”
“डॉक्टर...” राघवला काही बोलायच्या आत डॉक्टर आरशातून नाहीसे झाले.
त्या आरश्यातल्या डॉक्टरांनी त्याला एवढेच सांगितले होतं की ते पुण्यात रहातात. सगळा गुंता क्षणार्धात सुटला होता. एकदा पुण्यात पोहोचलं की झालं. तिथं डॉक्टरांना शोधणं अवघड नव्हतं. कसं शोधणार? पुण्याला पोहोचलो की पुढचा मार्ग दिसेल. पुण्यात त्यांना कस शोधायचं ते नंतर बघता येईल.
पण डॅम इट! हे पुणे जगाच्या पाठीवर कुठे आहे?
“पुष्पा, तुला पुणे हे गाव –शहर म्हण– कुठे आहे माहित आहे?”
“पुणे?” पुष्पा विचार करत होती. “नाही बाई. नाव ऐकल्यासारखे पण वाटत नाहीये.”
राघवलाने संगणक सुरु केला. सर्च इंजिन वापरून “पुण्याचा” शोध घ्यायचा प्रयत्न केला.
search
Try using words that might appear on the page that you’re looking for. For example, 'cake recipes' instead of 'how to make a cake'.
Need help? Take a look at other tips for searching on Google.
हे असलं भंकस केवळ गूगलच लिहू शकतो.
असं म्हणतात ना कि तुमच्या दुर्दम्य इच्छा आकांक्षांसमोर ह्या अफाट विश्वाचा कारभार चालवणाऱ्या कर्तुमकर्तुं, हुकुमत गाजवणाऱ्या डायरेक्टर (ऑपरेशन-मल्टीवर्स) ला देखील माघार घ्यावी लागते.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
ह्या आधीचे भाग इथे आहेत.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-३
https://www.misalpav.com/node/51398
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२
https://www.misalpav.com/node/51386
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग - १.५
https://www.misalpav.com/node/51388
कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१
https://www.misalpav.com/node/51232
प्रतिक्रिया
5 Aug 2023 - 11:42 am | आनन्दा
डबल झाला वाटतं..
उत्कंठावर्धक आहे.