सांता क्लॉज
जानेवारी महिना सुरु होतोय न होतोय बबड्याचे बाबा बबड्याला दमात घ्यायला सुरुवात करतात.
“बबड्या, अभ्यास कर. नाहीतर सांता क्लॉज रागावेल.”
“बबड्या, काकांकडे चॉकोलेट मागायचे नाही. सांता क्लॉज बघतोय.”
“बबड्या, बस झाले तुझे विडीओ गेम. बंद कर आता. नाहीतर...”
बबड्या, हे करू नकोस आणि ते करू नकोस.
अशाप्रकारे दाढीवाल्या सांता क्लॉजने बबड्याचे बाल्य पार कोमेजून टाकले होते.
फुगे, कचकड्याच्या बाहुल्या, गाड्या (खेळण्यातल्या), साप शिडी, बॅटबॉल, नवा व्यापार आणि मागच्या वर्षी रुबिक क्यूब. ह्या असल्या खेळण्यांसाठी वर्षभर चॉकोलेटचा उपास! धिस इज नोट फेअर डील.
बबड्याला वाटायचे कि हा सांता आहे ना तो आपल्या अतृप्त इच्छा आपल्यावर लादायचा प्रयत्न करतोय. त्याला वाटतंय कि बबड्याने सचिन सारखा क्रिकेटपटू व्हावे, म्हणून बॅटबॉल! अडाणीला लहानपणी नवा व्यापार खेळून मग मोठेपणी व्यापारामध्ये वीज कंपनी, एअरपोर्ट, धारावी कशी मिळवायची त्याचे ज्ञान मिळाले म्हणून नवा व्यापार!
मी काय मागतो आणि हा काय देतो.
“बाबा, तुम्ही का नाही मागत सांता क्लॉजकडे?”
“काय मागू?”
“आपल हेच, म्हणजे एक किलो टोमाटो?”
बाबांना हसू यायला लागले.
“एक किलो टोमाटो? ते किती दिवस चालणार? सांता मोठ्या मुलाना टोमाटो देत नाही तर त्याच्या ऐवजी ज्ञान देतो. म्हणजे टोमाटोशिवाय टोमाटो आम्लेट. कांद्या शिवाय कांदा भजी, साखरे शिवाय साखरभात, भाता शिवाय पुलाव, मुर्गी शिवाय मुसल्लम, पैशा शिवाय बॅंक बॅलंस, आणि प्रेमाशिवाय लग्न अश्या रेसिप्या नेटवरून धाडून देतो.”
डिसेंबर सुरु झाला कि बाबा बबड्याच्या पाठी टुमणे लावतात.
“बबड्या, ह्या वर्षी सांताकडे काय मागणार?”
सांतापेक्षा बाबांनाच जास्त काळजी.
“मी आणि सांता, आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्ही का मधे पडताहात?” असं बबड्याला बोलायचं होतं. पण नाही बोलला.
“मला फेरारी पाहिजे आहे. मिळेल?”
“बबड्या, काहीच्या काही.”
“बाबा, अहो खरी खुरी नाही. खेळातली. जिचे दरवाजे उघडतात. हेडलाईट्स लागतात तसली. सांता काय मला खरी फेरारी देतोय. स्वतः रानहरिणांची गाडी वापरणारा तो.”
“बबड्या, तो रानहरिण गाडी का वापरतो माहित आहे? उर्ज्वेचे संरक्षण, खनिज तेलाचे संरक्षण, हवामान बदल, झालंच तर सतत वाढणारी विश्वाची एंट्रोपी हा विचार करून तो रानहरिण गाडी वापरतो. लोकांनी काही बोध घ्यावा म्हणून.”
ह्या नाताळमध्ये बबड्याला सांताने काय भेट द्यावी? त्याने चक्क आईनस्टाईनने लिहिलेले “स्पेशल अँड जनरल रीलेटीविटी” हे पुस्तक भेट म्हणून दिले. बबड्याने पुस्तक पाहिले, हुः करून कपाटात सारून दिले. का? कारण आईनस्टाईन बबड्याच्या आधी जन्मला म्हणून. नाहीतर बबड्यानेच स्पेशल अँड जनरल रीलेटीविटी शोधून काढली असती.
सांता डंब असावा अशी दाट शंका त्याला आली.
वर लाल टोपी घालतो म्हणून त्याला डोके आहे असं म्हणायचं. पण काय आहे ना टोपी घालायचं डोकं निराळं नि वापरायचं डोकं निराळं.
नाताळची सुट्टी लागली होती.
बबड्याचा क्लासमेट विनू त्याच्याघरी “एलिअनस् आर कमिंग” नावाचा वीडीओ गेम खेळायला आला होता
प्रथम एकमेकांच्या गिफ्टांविषयी गप्पा झाल्या.
“मला आईनस्टाईनने लिहिलेले पुस्तक मिळाले. विन, ही काय गिफ्ट म्हणायची. अरे, पुस्तकच गिफ्ट द्यायचं तर एखादं मार्वलचं कॉमिक तरी द्यायचे. तुला काय मिळालं?”
“मला रिमोट कंट्रोलवाली गाडी मिळाली.”
बबड्या काय समजायचं ते समजला. आपला सांता विनूच्या सांतापेक्षा गरीब आहे ह्याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. आपला सांता महागईने बेजार झाला असावा. (अस बाबाच म्हणाले होते.)
“बबड्या, तू वाचलस आज? अमेरिकेत लोक एलिअन एलिअन नावाचा गेम खेळत आहेत? म्हणून मी आज “एलिअनस् आर कमिंग” ची तबकडी बाहेर काढली. खूप दिवस खेळलो नाहीये आज खेळूया चल.”
“अरे अमेरिकनांचे काही सांगू नकोस. ते तर सपाट पृथ्वी गोल आहे असेही म्हणतात म्हणे. म्हणजे खाली रहाणारे लोक जमिनीवर उलटे उभे रहातात.” ह्यावर दोघेही खळखळून हसले.
तर बबड्याला असे अनेक संशय होते.
बबड्याने गेमची तबकडी लॅपटॉपच्या आत सरकवली. बबड्या सुसर एलिअन झाला आणि विनू होमो सेपिअन झाला. (शी! काय नाव आहे म्हणे होमो)
सुसरीने हवेत ट्रिपल जंप मारून सेपिअनवर बॉंबचा वर्षाव केला.
“सेपिअन, आता तू तो गया.” बबड्या ओरडला.
“अरे सेपिअन कधी मरत नाहीत.”
“म्हणजे?”
“बबड्या, मी हा गेम हॅक केला आहे. मला इंफायनाईट लाइव्ह्स आहेत.”
सेपिअनने एक रॉकेट सुसरीवर सोडलं. स्फोटाच आवाज झाला आणि सुसरीच्या ठिकऱ्या उडाल्या.
“गेम ओव्हर.” चे म्युसिक सुरु झालं.
बबड्याने लॅपटॉपचे झाकण बंद केले.
“विन, मी असला खेळ खेळणार नाही. तू नेहमी विनर आणि मी नेहमी लूजर. ह्यात काय मजा. जीवन कसं “कभी विन कभी लूज.” ह्या पिक्चर सारखे असते. विन सम लूज सम.”
“माझे नावच मुळी विन आहे ना.” विनू हसायला लागला.
गेम बंद करून बबड्याने लेज चे दोन पॅक आणले. एक विनुला दिला एक स्वतःला दिला.
“विनू खा. नवीन फ्लेवर. “इंडिअन मसाला विथ इटालिअन पास्ता ट्विस्ट! खाओ जी भरके. बडी पॅक. सॉरी बडा पॅक!” बबड्याने “बडी पॅक” ला खोडून स्ट्राईक थ्रू केले.
“डेविल्स डिलाईट! वर २५% एक्स्ट्रा फ्री. म्हणजे पाच चिप्स आणि २५ सीसी नायट्रोजन फ्री. आहे की नाही मज्जा. हे अमेरिकानो लहान मुलाना च्यु समजतात.” ह्या ह्या ह्या करून विनू भरल्या तोंडाने हसायला लागला, “नाउ, बी सिरिअस. बबड्या, तू बाबाना सांगितलेस कि नाही?”
“काय सांगायचे?”
“हेच कि, सांता क्लॉज वगेरे सब झूट आहे.”
“नाही रे. उगाच कशाला रे त्यांना त्यांच्या गोड स्वप्नातून जागं करायचे. बिच्चारे बाबा. त्यांच्या आयुष्यात सांता क्लॉजच्या मिथक शिवाय दुसरं काय आहे? लेट हिम बी हप्पी. सम डे ही विल ग्रो आउट ऑफ इट.” बबड्यातला द फिलॉसॉफर जागा झाला.
“किंवा आपल्या बाबांना कधीच समजणार नाही.”
“शक्य आहे. गॅलट पोलच्या लेटेस्ट ओपिनिअन पोल प्रमाणे ७९% अडल्ट बिलीवर आहेत. फक्त २% लोकांचा विश्वास नाही. ३% लोकांनी “सांता हू?” असं विचारलं तर उरलेल्या लोकांना काही मत नाही.” बबड्या.
कठीण आहे रे मुलांनो.
प्रतिक्रिया
26 Jul 2023 - 7:09 pm | टर्मीनेटर
आवडली... कथा ठिकठाक आहे 👍
27 Jul 2023 - 4:13 pm | भागो
आभार!
27 Jul 2023 - 3:04 am | चित्रगुप्त
अलिकडे भारतात सुद्धा ख्रिस्तमास, सांता, नाताळची सुट्टी, 'नवीन वर्ष' साजरे करणे, ह्याप्पी न्युइयर, ह्याप्पी बड्डेला मेणबत्या, केक, उंच टोप्या, पिझा वगैरेंचे पाषांड बोकाळलेले असले, तरी एकूण कथा पाश्चात्य वळणाचीच वाटली.
-- यावरून तर खात्रीच पटल्यागत झाले आहे.
27 Jul 2023 - 4:21 pm | भागो
काय बोलू ? असंं लिहीलंं तरी प्रॉब्लेम "तसंं" लिहीलंं तरी प्रॉब्लेम.
माणसाने करावे तर काय?
27 Jul 2023 - 4:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
बबड्याचे कौतुक करावे की त्याच्या बाबांची कीव करावी हे समजले नाही.
27 Jul 2023 - 4:46 pm | भागो
ज्यावरून ही कथा बेतली तो किस्साच सांगतो. मग तुम्हीच ठरवा.
बबड्याने एकदा आईला विचारले, "आई लहान बाळंं कुठून येतात?"
"अरे, आई-बाबा देवाकडे प्रार्थना करतात कि आम्हाला एक बाळ दे. मग तो बाळ पाठवून देतो."
बबड्याने मग बाबांना विचारले, आजीला विचारले, आजोबांना विचारले. सगळ्यांनी असच काही तरी सांगितले.
देव बाळ म्हणे कुरिअर ने पाठवून देतो.
मग बबड्याने विनूला सांगितले, "विनू, आपल्या दोन पिढ्यांना काही अक्कल नाही. अगदी वाया गेल्या. एवढि वयंं झाली पण अजून मुल कशी होतात हे ह्यांना समजले नाही."
आता बोला.