अन् मलाही!
एक सांगू? ऐकशील?
ते कंगव्यातून सुटणारे केस
राहूदे तसेच, भुरभुरूदे
तेवढाच त्यांना विरंगुळा
...अन् मलाही!
वाराही कधी लाडात येतो
पदराशी सलगी करतो
तू तशीच राहा, मला सावरू दे
खेळू दे त्या दोघांना
...अन् मलाही!
मोकळी छान हसताना
इकडे तिकडे पाहताना
वेडी डूलं झुलत राहतात
झुलू दे त्यांना मजेत
...अन् मलाही!
गालावरच्या खळ्यांना
लाल ओठ नि चंद्रबिंदीला
न्याहाळत बसतो आरसा
पाहू दे ग निवांत त्याला
...अन् मलाही!
- संदीप चांदणे