सख्या रे..
न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..
न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.
न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.
न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.
न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..