भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले.
सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे.
असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार. मी कोल्हापुरचा आहे हे सुरुवातीलाच डिक्लेअर करुन टाकले आहे) एकदा पिताश्रींच्या एका सुहृदाने "काय रे कोल्हापुरी झालास की नाही" असा सज्जड प्रश्न विचारला होता. मी पुर्ण भंजाळुन हो असे उत्तर देउन टाकले. त्यावर "मग तु *डेच्या म्हणतो की नाही मित्रांना" असे हसत हसत विचारले. यावर पिताश्रींनीही हसुन प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापुरी होण्यासाठी मित्रांना *डेच्या म्हणणे निरातिशय आहे हे मला खुप बालवयात कळुन चुकले. दुसर्याच दिवशी मी खुपच प्रेमाने मित्रावर या गोड शब्दाच उपयोग केला. दुर्दैवाने मित्राची आई वर्गशिक्षिका होती आणि तिने आपला असा प्रेमळ उल्लेख ऐकला. त्यानंतर जे काही झाले ते सांगवत नाही (बाई बहुधा पुणेकर असाव्यात. माझ्या भाषास्वातंत्राचे त्यांना जरादेखील कौतुक नव्हते).
या पहिल्याच मर्दानगीच्या प्रयत्नात वर्गभगिनींसमोर गाल लाल झाले होते त्यामुळे भाषेचे धडे थोडे सबुरीनेच घेतले. पण शाळा बदलली. गाव बदलले. त्यामुळे नविन गाव. नविन विटी नविन दांडु (परा इथे अश्लील अश्लील म्हणण्यासारखे काही नाही आहे. हा एक साधा वाक्प्रचार आहे). नवीन गावातली भाषिक वैशिष्ट्ये पण झटकन आत्मसात करुन घेतली. इथे *सडीच्या हा एक नवीन शब्द शिकलो. आता शब्दाचा अर्थ कळण्याचे वय नव्हते ते. त्यामुळे कोल्हापुरात जे झाले तेच नवीन गावातही झाले. आमच्या दामले बाईंना माझे भाषासामृध्य बघुन दम लागला. आधीच बदनाम त्यात आम्ही खुप भरभर बोलायचो. (जिकडेतिकडे नसती घाई. मरणाची घाई. वाघ मागे लागल्यासारखी). एकदा दामले बाई रजेवर असताना दुसर्या बाईंनी शिकवले. रानडे बाईंनी. दुसर्या दिवशी नेमका आदल्या दिवशीचा वृत्तांत सांगण्यासाठी दामले बाईंनी "शिंचे" मलाच उठवले. मी सुरवातीलाच पचकलो "रांडे बाईंनी ना........". त्यादिवशी मी का मार खाल्ला हे मला बर्याच वर्षांनी कळाले.
दोन गावातल्या दोन तर्हा झाल्यामुळे मी खुप सावधपणे बोलायला शिकलो हे मात्र नक्क्की. तिसरे गाव होते साक्षात मध्यप्रदेशातले. इंदौर. इथे बोलण्याचा वेगळाच लहेजा. सगळे कसे अदबशीर. सगळ्यांचा आप आप करुन उल्लेख व्हायचा. लहान मुलांना शिकवले जायचे की सगळ्यांना "जी" लावुन संबोधावे. याचा कधीकधी अतिरेकही व्हायचा. आम्ही एका वाड्यात रहायचो. वाडामालकांचा नातू असेल ४-५ वर्षांचा. त्याच्या आईने त्याला पढवुन ठेवले होते की सगळ्यांना "जी लावायचे". तो मलाही भैय्याजी म्हणायचा (अजुनही त्या आठवणींनी भिती वाटते. चुकुन कोणाल इतिहास कळाला आणि मी भैय्या आहे असा गैरसमज करुन घेतला किंवा तश्या अफवा पसरवल्या तर काय घ्या? जौनपुरला जाउन शिव्या शिकायला लागायच्या.) तर या बबलूने (नाव आठवत नाही मला त्याचे. आपण बबलू म्हणूयात) एकदा सक्काळी सक्काळी आरोळी ठोकली "मम्मीजी टट्टीजी आइजी". यानंतर संपुर्ण वाडा हास्यकल्लोळात बुडाला होता एक आठवडाभर. असो. तर तो मुद्दा नाही. आपण शिव्यांवर आहोत. या शहरात आपण काहीच शिकु शकणार नाही हे मला लवकरच उमगले. एवढे प्रेमळ, अदबशीर लोका काय शिव्या देणार ना? म्हणजे असे बघा की रस्त्यात भांडण चालले आहे. एक दुसर्याला म्हणतो आहे "*डेच्याजी" आणि दुसरा पहिल्याला म्हणतो आहे "*सडीच्याजी" तर कसे वाटेल ना? मटणात बासुंदी ओतल्यासारखे वाटेल की नाही? पण मी साफ चुकीचा होतो.?सपशेल गलत. (मराठी बोलताना अधुन मधुन हिंदी बोलणे गरजेचे असते. उगाच शुद्ध भाषा बोलायला लागलो तर त्यामुळे ब्राह्मणांबद्दल संपुर्ण भारतात गैरसमज होतात म्हणे. आणि त्यामुळे ब्राह्मण मराठा वाद पण वाढीस लागतो असे ऐकुन आहे). तर या इंदौरमध्येही मी एक खुप गोड शिवी शिकलो (इंदौर ना हे . इथले सगळेच कसे गोड, पद्धतशीर, अदबशीर). ही गोड शिवी होती "*त्या". या शिवीचा काय सांगु तुम्हाला अखिल भारतात प्रसार इंदौरी लोकांनीचे केला बहुधा. याही शिवीचा अर्थ मला कळाला नाही. त्यामुळे एका मित्राला खोपच्यात घेउन आधी अर्थ विचारुन बघितला. तर बेणं पुण्याचं निघालं. असले शब्द वापरत नाही आम्ही म्हणालं. पण एकुणात न वापरण्याजोगा शब्द आहे हे मला कळाले. त्यामुळे शिकलो पण आचरणात नाही आणले.
आता इतकी गावं फिरुन जेव्हा मी ठाण्याला गेलो तेव्हा बाकीचे भाषासौंदर्यात किस झाड की पत्ती असेच मला वाटत होते. परत मी तोंडघशी आपटलो. साफ चुक. सपशेल गलत. माझे वर्गबंधु याबाबतीत माझ्या २ पावले पुढे होती. ६वीत असताना, माईंड इट ११ वर्ष वयाची मुले दिवसाची सुरुवात एकमेकांच्या आयाबहिणींची प्रेमळ विचारपूस करुन करायची. आई बहिणीवरच्या यच्चयावत शिव्यांची देणगी इथलीच. पहिलीनंतर भ ची बाराखडी देखील घोकली इथेच. नंतरची ४ वर्षे माझ्या आयुष्यातली सगळ्यात शिवराळ वर्षे होती. साधारण या वयात मुलांनी नाव, गाव, फळ फुल, आडनाव खेळणे अपेक्षीत असते. आम्ही शिव्यांच्या भेंड्या खेळायचो. "अच्चीत गच्ची......" अश्या काही शिव्या असतात हे इथेच कळाले. मजल इथपर्यंत वाढली की आयला आणि च्यायला किंवा च्यामारी या शिव्या आहेत हेच डोक्यात घुसेना. आमच्या वर्गशिक्षिका अश्या काही जबरदस्त हेल काढुन च्यायला म्हणायच्या की शिवी आहे हा इंडिकेटर मेंदुत लागणे बंदच झाले. पुण्यात नंतर एका मित्राने शिव्या देतो असा आरोप केला तेव्हा मी पुरता भांबावुन गेलो की मी नक्की काय शिवी दिली? (हा मित्र आता सहजतेने "भें८८" म्हणतो ही गोष्ट वेगळी). नंतर कळाले की मी च्यायला म्हणलो होतो.
कालौघात मराठी, हिंदी, इंग्रजी अश्या बर्याच भाषेतल्या झोपाळ्यांवर हिंदोळे घेतले. फकारांती शब्द शिकलो. आपण ज्या सहजतेने बोलतो त्याहुन जास्त सहजतेने मुलींना बोलताना बघितले. आणि त्या शब्दातली मजा पण हळुहळु निघुन गेली. वय वाढले तसे हे शब्द, या शिव्या आपली संस्कृती नाही हे कळुन चुकले. कदाचित तोपर्यंत पुण्याला स्थलायन केले होते त्यामुळेही असेल. पण बोलीभाषेतुन शिव्या हद्दपार झाल्या. आयला च्यायला राहिल्या. पण बाकीच्या गेल्या. खरे सांगु का? शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. आजही शिव्या माहिती आहेत. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या.
आजपासुन ५० वर्षांनी शिव्या अस्तित्वात असतीलच. प्रचलितही असतील. १०० वर्षांपुर्वी कदाचित नालायक, हरामखोर या शिव्या होत्या. अजुन ५० वर्षांनी कदाचित शिव्यांचे स्वरूप बदलले असेल. पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता?
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 5:41 pm | मितान
मस्त खुसखुशीत !!!
26 Oct 2010 - 10:44 pm | बेसनलाडू
मस्त, खुसखुशीत लेख. खूप मजा आली वाचताना.
(वाचक)बेसनलाडू
अवांतर - कंसातील वाक्ये सूचक कोपरखळ्यांसारखी असली, तरी एकंदर लेखाच्या संदर्भात विचार करता अनावश्यक वाटली.
(अवांतर)बेसनलाडू
26 Oct 2010 - 5:45 pm | सूड
मिपावर वाचलेल्या एका (शिवी/ अपशब्द काय म्हणू ?) शब्दासाठी मी मिलिंद बोकिलांचं 'शाळा' वाचल्याचं आठवलं. :)
26 Oct 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले रे एकदम. मस्त फटाके वाजवले आहेस :)
हे लेखन वाचता वाचता बिकांच्या ह्या लेखाची खास आठवण येउन गेली.
26 Oct 2010 - 5:56 pm | मृत्युन्जय
आयला बिकांनी आधीच भला मोठ्ठा लेख लिहिला आहे. हा वाचलाच नव्हता. धन्यवाद.
26 Oct 2010 - 5:48 pm | कानडाऊ योगेशु
(बा*** ! )मस्त खुसखुशीत लेख लिहिला आहेस (भां** )मृत्युंजया!
(कंसातील शब्द ही जुन्या मालकांची मिपाला देणगी! ;) )
(शिवराळ) योगेश
26 Oct 2010 - 5:49 pm | sagarparadkar
>> पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता? <<
पु. लं. चे 'रावसाहेब' वाचून पण आठवेल की संस्कृती ... ते (पक्षी रावसाहेब) काय असंस्कृत होते का?
26 Oct 2010 - 5:54 pm | Dhananjay Borgaonkar
+१
26 Oct 2010 - 5:55 pm | sagarparadkar
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' पण एके ठिकाणी चिंता व्यक्त करतो की मराठीतल्या शिव्या आता फारच जुन्या झाल्यात, आणि नवीन शिव्या काही तयार होत नाहीत, कोण हे काम करणारेय काही कळत नाही ... :)
ते ऐकून माझ्या काही 'पेठेतल्या' मित्रवर्यांनी हे काम स्वीकारले होते पण उदर्निर्वाहाची कामे इतकी वाढली कि त्यांपुढे ह्या कामाकडे मग पारच दुर्लक्ष झाले ... :-)
26 Oct 2010 - 5:58 pm | मृत्युन्जय
काही हरकत नाही. आजही भावे हायस्कूल किंवा नूमवि किंवा सेंट विमलीज च्या बाहेर रोज एक तास उभे राहिलात तर ज्ञानात प्रचंड भर पडेल. ते वयच तसे असते. आणि त्या वयातले सगळे मित्रही आठवणीत तसेच भ च्या बाराखडीतलेच असतात.
26 Oct 2010 - 10:11 pm | एक
आमची शाळा आहेच तशी!!
आजही मित्राशी बोलताना त्याने पहिल्या ४-५ शब्दात "प्रेमळ" पणे विचारपूस केली नाही तर शंका येते कि याला काय झालं? चिडला वगैरे कि काय?
वय वाढलं तसं तोंडावर मान बरेच जण द्यायला लागतात त्यावेळी जमिनीवर येण्यासाठी मित्रांचे हेच ४ "प्रेमळ" शब्द कामी येतात..
--सेंट भावियन्स..
26 Oct 2010 - 6:00 pm | प्रमोद्_पुणे
"अच्चीत गच्ची......" ही शिवी तर फार फार पॉप्युलर अशीच एक म्हणजे "आली घुली..." शाळा फक्त मुलांची.. मुतारीमध्ये अशा काही शिव्या असायच्या की त्यावर एक पुस्तक निघेल. आणि हो काही सदस्यांच्या माहीतीसाठी ह्या शिव्यांना (देणार्याना आणि खाणार्याना) जातीचे बंधन नव्हते!
बाकी लेख मस्त...
26 Oct 2010 - 7:23 pm | अनिल हटेला
:-)
26 Oct 2010 - 7:37 pm | पैसा
शीर्षक वाचून धागा उघडला आणि भलतीच संपत्ती निघाली. पण मस्त खुसखुशीत लेख आहे. बरोबरच, बिकांच्या लेखाची लिंक दिल्याबद्दल पराला धन्यवाद!
26 Oct 2010 - 7:45 pm | धमाल मुलगा
भेटीअंती आपल्या चरणि शिंगलमाल्टचा अभिषेक करणेत येईल असे आम्ही जाहीर करतो.
अरे, काय माणूस आहेस का मजा? कं लिवलंय...कं लिवलंय!
26 Oct 2010 - 8:18 pm | सविता
सही जवाब.... भारी लिवलंय बघा....
26 Oct 2010 - 8:19 pm | तिमा
लेख आवडला. आम्ही वापरत असलेल्या शिव्या व प्रसिध्द गाण्यांची विडंबने आठवून डोळे पाणावले.
26 Oct 2010 - 8:38 pm | प्रदीप
आवडला.
भाषिक संपत्तिवरून मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन सहकार्याने एकदा 'आपण पहाटे उठलो' हे 'I woke up at sparrow-fart' असे सांगितले होते, ते आठवले!
26 Oct 2010 - 9:25 pm | धमाल मुलगा
>>'I woke up at sparrow-fart'
26 Oct 2010 - 10:21 pm | मृत्युन्जय
लै भारी. हे आवडले आपल्याला. वापरणार कधीतरी.
26 Oct 2010 - 8:47 pm | नगरीनिरंजन
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव लेखन की रे भावा!
उगंच एकमेकाला शिव्या घालून याराना दाखवायच्या वयातले दिवस आठवले.
(अवांतरः ओ पुपे, तुमच्या त्या 'परायी बात खच्ची सोळा आणेच सच्ची' ला दुसरी ओळ 'अच्चीत गुच्ची...' बसतंय का बघा जरा. )
27 Oct 2010 - 6:03 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो ते त्यावरूनच लिहीले होते. ;) समझनेवाले को इशारा काफी है असं काहीतरी म्हणतात म्हणे. ;)
26 Oct 2010 - 9:18 pm | ईन्टरफेल
आमि नांगरत आसतांना ..
बेलाला बि शिव्या देतो
26 Oct 2010 - 9:51 pm | मिसळपाव
...मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या. ...
१०००% सहमत!
हॉस्टेलच्या आपल्या खोलीबाहेर मित्रांचं टोळकं नाहि तर प्रिन्सिपल पु.ल. ना घेउन आलेले आहेत हे लक्षात न येउन एकाने 'भडव्यो, जरा थांबाल तर काय मराल?' असं लडिवाळपणे विचारल्यावर खुद्द पु.ल.नी सुद्धा त्याला 'तो पहिला शब्द कधी विसरू नको बरं का' असं सांगितलं होतं !!
26 Oct 2010 - 10:05 pm | सुहास..
_/\_
_/\_
_/\_
बाकी का माहीती माझ्या तोंडुन निघण जरा अवघडच हाय (न पिता..पण पिलोतरी मित्र,स्नेही, ओळखी-पाळखींच्या साठी साध हलकट निघत॑ नाय तोंडातनं (एक टिंग्या सोडुन) )
26 Oct 2010 - 10:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, इना तू ... निरागस नव्हतास! नाटक मात्र चांगलं करायचास हो!!
लिखाण एकदम ए१! म्हणजे नक्की काय ते चारचौघांत नको, उगाच मुलीच्या आयडीतून शिव्या पाहून तुझ्या 'निरागस' मनाला कष्ट व्हायचे!!
26 Oct 2010 - 10:40 pm | मृत्युन्जय
अगं मी तर शिव्या देताना माझे स्वतःचे कान पण बंद करुन घेतो. (शिव्या लिहिताना डोळे बंद करुन घेतो). इतका निरागस आहे मी. (हा निरागस शब्द शाळेतल्या अर्थाने घ्यावा). पण तु बोल बिन्धास्त. काय आहे की भाषिक ज्ञानात जितकी भर पडेल तितकी चांगलीच आहे.
26 Oct 2010 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी अगदी! किती गुणाचा रे बाळ तू! पुढचा फुलपाखरी लेख तुझ्यावरच लिहायला सांगते लिखाळला!
26 Oct 2010 - 10:26 pm | रेवती
दिवाळी जवळ आलेली असताना शिव्यांची फटकेबाजी आवडली.
26 Oct 2010 - 10:58 pm | पिवळा डांबिस
विशेषतः जुना विस्वण (सॉरी, सॉरी, विषय!!) ताज्या सद्यवर्तमानपत्रात गुंडाळल्यामुळे वाचायला अधिक मजा आली!!
अभिनंदन!!
पण बिकाचा मूळ प्रश्न शिल्लक रहातोच...
"सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?"
;)
निरागस बामण,
पिडां
27 Oct 2010 - 6:05 pm | llपुण्याचे पेशवेll
अलाऊड आहे पण लाऊडली नका देऊ. ;)
27 Oct 2010 - 7:59 am | रन्गराव
जमलं गडया! काम फत्ते!
अवांतर: जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडं! ;)
27 Oct 2010 - 10:07 am | मृत्युन्जय
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन झाले रन्गराव. आख्ख्या महाराष्ट्रातल्या शिव्या कोळुन प्यायलो आहे मी. सगळ्या शिव्या इथे दिल्या असत्या तर तुम्हाला फेफरे आले असते. आणि आमचे मान्यवर सुहृद श्री. परा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे एक वेगळे सेंसोर बॉर्ड उघडायला लागले असते शिव्यांच्या स्क्रीनिंगसाठी. आता कुठे गोमुत्र शिंपडायचे आणि कुठे शिवांबु ते तुमचे तुम्ही बघुन घ्या.
27 Oct 2010 - 11:10 am | रन्गराव
पण आयला कॉम्पलिमेंट होती ती. असो आणि कोळून पिण्याबाबतचा आपला दावा बरोबर का चुक हे ठरवायला स्पर्धा ठेवावी लागेल एक ;) मग अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला फेफरे येतील. :) सांगायचा उद्देश असा की नवीन शोध लागणे कधीही थांबत नाही आणि ज्ञान नेहमी अपूर्णच असत, तस तुम्ही लेखात म्हंटलय सुद्धा बहुतेक. असो बाकी लिहिताय मात्र मजेशीर :)
27 Oct 2010 - 11:22 am | मितभाषी
जमल तर कि बोर्डवर आणि धाग्यावर गोमुत्र शिंपडून घे थोडंआयला खपलो. =)) =))
आणि अजुन एक मनातील जागे झालेले विकार जाण्यासाठी शांती करा अथवा खिशात उडीद घेवुन उंबराला तांबड्यात गरके(पक्षी : प्रदक्षिणा) घाला. ;)
बाकी लेख रापचिक.
27 Oct 2010 - 8:35 am | प्राजु
मस्त लेख! एकदम खुसखुशीत..!
बर्याच ठिकाणी गालातल्या गालात हसू आले..
असेच लिहित रहा.
27 Oct 2010 - 9:05 am | शहराजाद
अगदी नेमक्या शब्दांत मांडलेत.
मात्र, मला तरी अगदी कचकावून, ह्रूदयापासून निघणारी शिवी मायबोलीतूनच घालता येते. एरवी भावना पुरेशा शुध्द स्वरूपात प्रकटल्याचे समाधान मिळत नाही.
27 Oct 2010 - 10:49 am | शिल्पा ब
मस्त खुसखुशीत लेख...पण मुलीसुद्धा शिव्या देतात याचे आश्चर्य का वाटले तुम्हाला हे काही कळले नाही बॉ !!
आम्ही जवळीक करु नये की काय? ;)
27 Oct 2010 - 10:58 am | मृत्युन्जय
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित काहीतरी वेगळे वाटले असेल. पण धक्का मात्र नव्हता बसला. एका मुलीला सिगारेट फुंकताना बघुन मात्र पहिल्यांदा मला धक्का बसला होता. खुपच वेगळे वाटले होते. नंतर सवय झाली. असे बघा जेव्हा पहिल्यांदा माझ्या खुपच जवळच्या मित्राने सिगारेट ओढली तेव्हासुद्धा मला आश्चर्य वाटले होते. मुलींनी हे करावे किंवा हे करु नये अश्या अर्थाने बसलेला धक्का नव्हता तो.
27 Oct 2010 - 11:15 am | इन्द्र्राज पवार
धागाकर्ते श्री.मृत्युंजय याना माहितच असेल की, कोल्हापुरी भाषा आणि शिव्या यात तसा जास्त भेदाभेद नाही. किंबहुना एखादा कोल्हापुरी पाटील्/पवार शुध्द बोलायला लागला की, गावातील थोर्र सहकारी मित्र लगेच टोमणा (आमच्या भाषेत मंडळाची किक) मारतात, 'च्यायला, हे ब्येनं पुन्याला क्काय शिकायला गेलं, पार मात्रंच झालं की...!"
"ढापण्या" आणि "बॅटरी" ही त्यातल्यात्यात 'बर्यापैकी' लिहिता येण्यासारखी विशेषणे आहेत.
मी पंजाबच्या ग्रामीण भागात फिरलो आहे. दिल्लीत असताना काही पंजाबी मित्रही झाले होते/आहेत, त्यांच्यासमवेत एकदा गुरुदासपूरमध्ये कट्ट्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील दोघांचौघांची ओळख झाल्यावर त्यातील एकाने माझ्याशी हस्तांदोलन तर केलेच पण दिल्लीच्या मित्राकडे पाहून म्हणाला, "ये इंदर पुत्तर तो हलकट दिखता भला ! क्यूं?" मी हादरलोच. मी 'हलकट'? कशामुळे? मी दिल्लीवाल्याकडे पाहिले तर तो गुरदासपूरवाल्याला सांगत होता....'नही, इंदरतुस्सी कुछ दिनसे बिमार होना !". मी त्याला बाजूला घेवून विचारले की, तो मला 'हलकट' का म्हणतोय....? तर हा बिच्चू हसला आणि म्हणाला...."अरे ऐसी कोई बात नही....पंजाबीमें हलकट का मतलब होता है "लाईट वेट". तू वजनाने थोडा कमी दिसतोस ना म्हणून तो तसे म्हणाला..." ~ मी मनी म्हणालो, 'वाहे गुरू !"
पंजाबी टर्म "चक दे फट्टे...." अलिकडे इकडे फार फेमस झालेली आपण पाहतो, ऐकतो ('चक दे इंडिया' मुळे)....पण प्रत्यक्षात तिथल्या ग्रामीण भाषेत, "अरे भाड्या/अगं भवाने आवर कामं पटापट"... या अर्थानेच आई/सासूबाई वापरतात...(चक दे = उचल.... फट्टे = लाकूडसामान.... म्हणून, 'आवर आवर जेवणाची वेळ झालीय'...या अर्थाने).
पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.)
इन्द्रा
27 Oct 2010 - 12:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पंजाबी शिव्यांची फार गंमत सांगता येईल.....(पण इथे ते अवांतर होईल.)
इथे कसे काय अवांतर होईल बुवा ?? इथेच ते मुद्द्याला धरून होईल. त्यामुळे तुम्ही इथे त्या गमती सांगाव्यात असा प्रस्ताव मी मांडतो. इथे सांगायच्या नसतील तर वेगळा लेख लिहा. पण लिहा.
27 Oct 2010 - 1:08 pm | प्रदीप
म्हणतो. इंदर, लिहाच तुम्ही ते येथे.
बाय द वे, वरील 'हलकट' हे [हलका -हलकट-(हलकेस्ट?)] असे काहीसे असावे असे वाटते. त्यावरून (अवांतर) आठवले, आमच्या कॉलेजसमोर एक अगदी खास मराठी 'मिल्क बार' होते. ते तीन बंधू मिळून चालवायचे. मराठी रेस्टॉरंटात नेहमी होते तसे हे मालक लोक विरूद्ध नोकरचाकर असा नेहमीचा थाट तेथे असायचा. काही कारणांमुळे नोकर सदैव मालकांशी फटकून असायचे, त्याचा फायदा घेऊन कॉलेजातील टारगट मुले जे खात त्यापेक्षा कमी बिल देऊन जात असत. मालक नेहमी नोकरांवर गल्ल्यावरून ओरडत असायचे. त्या तीन भावांपैकी मधल्याने अगदी हिटलर छाप मिशा ठेवलेल्या. त्याच्या नोकरांवर डाफरणे व ह्या मिशा हे मिळून पोरांनी त्याचे नाव ठेवले- हिटलर. अर्थात धाकटा झाला 'हिट' व सर्वात मोठा झाला 'हिटलेस्ट'!
27 Oct 2010 - 1:44 pm | मृत्युन्जय
नाय हो अवांतर नाही व्हायचं. तुम्ही लिहा बिन्धास्त.
27 Oct 2010 - 1:20 pm | जागु
छान लिहील आहे.
27 Oct 2010 - 6:09 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं लेख रे मित्रा.
बाकी मायझंव हा शब्द कोकणातल्या बायका देखील अगदी सहज बोलून जातात. हे मी स्वतः ऐकलं आहे. विशेषतः म्हातार्या किंवा जुन्या पिढीतल्या बायका. गंमत वाटली होती पहील्यांदा ऐकून.
27 Oct 2010 - 6:15 pm | धमाल मुलगा
एक एकांकिका करायला घेतली होती कालेजात असताना (हा 'मी कॉलेजात जात होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न नाही, एकांकिका करत होतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न आहे.' ;) ), पण त्यात पावलापावलावर "अक्करमाश्या मांयझया' असे शब्द होते. आमचे गुर्जी पडले देशावरचे, त्यांना लाख समजाऊन सांगितलं, की अहो, आपल्याकडं च्यायला किंवा ए रत्ताळ्या... वगैरेसारखं अगदी सर्रास वापरले जाणारे कोकणातले शब्द आहेत ते...बाकी काही नाही झालं, आमची आयकार्डं जप्त करुन घेतली मास्तरानं. :(
27 Oct 2010 - 11:28 pm | शाहरुख
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक फार जुनी गोष्ट आठवली..
मी एका शिवाजी पेठेतल्या मित्राकडे गेलो होतो..त्याच्या घरुन दोघे कुठेतरी जायला निघालो..घराबाहेर २-३ वर्षांचा एक मुलगा खेळत होता..मित्राने सहज त्याच्या डोक्यात टपली मारली..तर मुलगा म्हणाला "ए लवल्या, मालतोस का"
माफ करा, शिवीत फुली घातल्यास गोष्ट कळाली नसती :-)
28 Oct 2010 - 4:42 am | अडगळ
अवांतर :
ज्ञानेश्वरीतील एका मजेदार शिवीसाठी "एक महान शिवी" हा म्.वा.धोंडांचा लेख जरूर वाचावा.(ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी)
------------------------------------------
अंगावर ट्रक घालून ड्रायव्हर म्हणाला
दिखता नही मादरचोद , दिखता नही ?
किर्यानिष्ट क्लीनर (अडगळ)
28 Oct 2010 - 4:24 am | सन्जोप राव
शिव्यांबाबतचा हा झणझणीत लेख वाचून तोंडाची बाबळी गेली. (कोल्लापूरकरांना हे कळावे. इतरांनी माडगूळकरांचा 'हॅलो, मिस्टर डेथ' आठवून 'तोंडाची अळशी गेली' असे वाचावे). 'रांडेच्या' किंवा 'रांड्या' हा शब्द कोल्हापुरात 'अरे' या अर्थाने वापरतात. 'रांड' हा शब्द तर अतीवापराने आपला तिखटपणा हरवूनच बसला आहे. बायकोला फक्त याच शब्दाने संबोधणारा दळवींचा 'प्रवासी' आठवावा. 'उंडगी' या शिवीचेही तसेच. 'तुमचे पत्र मिळाले आणि मला चार दिवस कुठेतरी उंडगेपणाने फिरुन आल्यासारखे वाटले' असे जी.ए.कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णींना लिहीले आहे. (दोघेही कुलकर्णी हा फक्त योगायोग म्हणावा. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे काही यात शोधू नये) . 'गवतात उंडगेपणाने चरत जाणार्या ढोरासारखे माझे वाचन आहे' यात तर 'उंडगा' या शब्द शिवी म्हणून न येता सभ्य क्रियविशेषण म्हणूनच येतो. बाकी कोल्हापूर हे महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असल्याने खास कानडी ढंगाच्या म्हणून ज्या मराठी शिव्या आहेत, त्या अगदी रसरशीत आहेत. 'व्हयमाले', 'हादरगित्तीच्या', 'खज्जाळीच्या', सुक्काळीच्च्या' या शिव्या या लेखामुळे अगदी सकाळी सकाळी आठवल्या आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यासारखे वाटले.
28 Oct 2010 - 8:39 am | स्पंदना
माझ्या एका मामाला त्याच्या आत्त्या कडुन 'शिव्यांचा पाढा ' म्हटला तरच गोळ्या( तेंव्हा चोकलेट नव्हती) मिळायच्या.
कोल्हापुरी असल्यान शिव्या माहिती आहेत पण बहुतेक शिव्या आई किम्वा बहिण अश्या स्त्री नातेवाइकांवर असल्याने थोडासा निषेध.
बाकी लेखा बद्दल ' च्यामारी तुम्ही तर फर्स्टक्लास लिहिलय राव'