बोलाचा हापूस!
कुठल्याही विषयावर अखंड बोलणाऱ्या आणि तुम्हाला बोलण्याची अजिबात संधी न देणाऱ्या व्यक्तीच्या तावडीत तुम्ही कधी सापडला आहात काय? सध्या माझे ग्रह जरा पेंगुळलेले असल्याने माझ्या आयुष्यात असे दुर्मिळ योग वारंवार येत आहेत. माझे ग्रह तसे ही अर्धोन्मिलीत अवस्थेत एखाद्या मवाल्यासारखे कुठेतरी भटकत असतात हा मुद्दा वेगळा! जेव्हा नितांत गरज असते तेव्हा माझे ग्रह कुठे उलथलेले असतात कोण जाणे. बाबा पुता करून एकाला पकडून आणावे तर आधी आणून ठेवलेले पसार झालेले असतात. असो. तर सध्या अशा बोलून बोलून समोरच्याला नामोहरम करणाऱ्या बोलर लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे.