आयड्याबाज

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
5 Jun 2016 - 4:37 pm

गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच विनायकराव एकटेच डोक्याला हात लाउन बसलेले. पाच दिवसांनी आमदार साहेब येणार ही गोष्ट त्यांना आजच समजलेली. ती समजल्या पासून विचार करुन करुन त्यांच्या डोक्याचा पार खुळखुळा झालेला. आता पुढल्या दोन चार महिन्यात आमदारकीचे मतदान. म्हणजे साहेब आले की जाऊन थेट लोकायलाच भेटनार. अण मग गावातले लोक त्यांना आपल्या चाढया सांगणार.
ते आपल्या पक्षाचे असते तर त्यांना ग्रामपंचायतमधे आणून पार मंजूर करुन आनलेल्या योजनांपासून ते थेट सरकार कडून आलेले अनुदान आणि त्याचा विनियोगपर्यंत सगळी कागद-पत्रं दाखीविली असती. पर हूंबल अशी झाली कि ते पडले विरोधी पार्टीचे म्हणजे आम्ही विरोधी पार्टीचे अण ते सरकार मधले. नको त्या त्या लोकायला, पत्रकारायला बोलावून ते आपली चप्पी करणार! आणि दाखविल्याल्या कागदांची पुंगळी करणार!
विनायकरावांचे टेंशन वाढतच चाललेले. सरकार कडून एक ना एक रुपया वसूल केलेला पर केलं कैच नै. आता पाच दिवसात करुन करुन तरी काय करणार.
गल्लो गल्ली सूर्यावरचे लाईट बसिवनार?
का बोळी बोळीने सिमेंट हाथरून रस्ते करणार?
का हाई ते रस्ते खांदुन नळं बसिवनार?
का पसररलेली बेंदाडि जमा करुन नाल्या बांधनार?
का सगळ्यायच्या घरावरचे आकड़े काढून लाईटी बंद करुन टाकनार?
(सालं आकडे काढले तर सारा घोटाळाच् हुइल. अख्ख गाव त् अंधारात जाईलच जाईल पर ग्रामपंचयतच्या लाइटिची बी पंचायत हुइल.)
अण मागच्यावर्षी तयार केलेला, गावाला राज्यमार्गाशी जोडनारा, पाच किलोमीटरचा डांबरी रस्ता कुठून आनणार? त्यातली त्यात साहेबांच्या गाडीला पांधितल्या खड्ड्यात झटका बसला त् ते आल्या आल्याच् चढनार!
सरपंच फुल स्पीड मधल्या पंख्याखाली घाम पुसत बसलेले. तेवढ्यात ग्रामसेवक हातात पेपर घेऊन उसळतच आले;
"भौ, सरकारानी लै झक्कास नविन योजना काढलिया..."
"करा मंग तिची पुंगळी"
सरपंचाचा बिघडलेला मूड पाहून ग्रामसेवक जरा वरमले.
"कुठं उधळले होते मागचा हाप्तभर?"
"मव्हरल्या शिक्षणासाठी पोरगं आमरिकेत गेलं. त्याला वाटं लावाय गेलतो"
"हिथं आमची पार लागून राहिली अण तुमी फिरा..." पुढचे शब्द गिळत सरपंचांनी राग आवरला आणि आमदार येणार असल्याची गोष्ट सांगितली.
"भौ, लै तरास करुन घिऊ नगा. निघन कै तरी मार्ग...चला.. उठा एखाद्या ढाब्यावर बसु. मला त् भूक बी लागलिया" ग्रामसेवकाने त्यांना हाताला धरून उठवले.
हां ग्रामसेवक लांबच्या कुठल्यातरी जिल्ह्यातला. राज्यातल्या बऱ्याचश्या गावातल्या योजना खात खात या गावात येऊन ठेपलेला. चांगलाच मुरलेला. गावातल्या लोकायचा, सरपंचाचा, मोठ्या अधिकाऱ्याचा, मोठ्या पुढाऱ्याचा कसा मुड सांभाळायचा याची त्याला चांगलीच अटकल आलेली.
त्याने टपरिवर उभा असलेल्या दिन्याची मोटरसायकल मागून घेतली आणि दोघे ढाब्याच्या दिशेने गेले.
रात्रि आल्याबरोबर सरपंचांनी ड्राईवरला घरापुढच्या दोन्ही बोलेरो मळयात नेउन ठेवायला सांगितले. उगाच खाजुन आवधान कशाला आनायचे?
सकाळी फ्रेश मुड मधे ते जेव्हा ग्रामपंचायतच्या दिशेने येऊ लागले तेव्हा टमरेल घेऊन जाणाऱ्या राम्या अण सुरश्याला पाहुन त्यांच्या डोळ्यापुढं ग्रामपंचायतित लावलेलं 'हगणदारी मुक्त गांव'च प्रमाणपत्र नाचु लागलं. ती इस्किम लै भारी निघाली हुती. घरोघरी संडास बाथरूम दाखुन, त्याचे फुटू तयार करुन घरामाघ्ं धा हजार लाटले हुते.
त्यापैश्यात आणलेली बोलेरो आठवतच सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात आले.
सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून घेतले. पण कुणाला काही तोडगा सुचला नाही. शेवटी उरलेल्या दोन तिन दिवसात होईल तेवढ़या सुधारणा करायच्या ठरवून सर्वजन कामाला लागले.
पाचशे पाचशे देऊन तिन बायांना तिन दिवस गावातले रस्ते झाडायचे सांगितले.
पाचशे देऊन गवंडयाला ग्रामपंचायतच्या व झेंडावंदनच्या बांबूखालच्या पायऱ्या नीट करुन द्यायला सांगितलं.
हजार देऊन गावतल्या ब्यूटीपार्लरवालीला तिन दिवस अंगणवाडी भरवायची सांगितली.
दामू सुताराच्या, रघु खाड्याच्या, मंठा काळे अण राजू कांबळेच्या घरावर चुण्यानी 'इंदिरा गांधी आवास योजना' असे लिहिले. त्याचे त्यांनी प्रत्येकी पाचशे पाचशे घेतले.
ग्रामसेवकाने गावातल्या वृद्धांना बोलवुन कसल्यातरी कागदावर अंगठे घेतले. ज्यांनी "कहयासाठी घेता?" म्हणून विचारले त्यांना दोनशे दोनशे रुपये दिले.
हजार रुपये तासानी जेसीबी आणून गावाजवळच्या नदीत खड्डे खणुन घेतले.
असंख्य खटपटित दोन दिवस निघुन गेले. दुपार टळत आलेली. सरपंच बैठकीच्या खोलीत बसलेले. तेवढ़यात त्यांना पुन्हा ती पाच किलोमीटरची सड़क आठवली. जिकडं जिकडं सड़किचा पैसा फिरला त्या सर्वांना त्यांनी फोन लावले. सगळ्यांनी हात वर केले. जवळपास सगळेच आमदाराच्या बैठकितले होते. त्यामुळे त्यांना घाबरायचे कारण नव्हते.
सरपंचाला खोली बंद करुन मोठ मोठ्याने रडायची तिव्र इच्छा झाली. रुमालाने घाम पुसत ते तसेच डोळे मिटवुन बसून राहिले.
जोरात वाजलेल्या फोनच्या रिंग ने ते दचकले.
"हेलो"
"भौ, गावांत लावलेल्या दाहीच्या दाही ब्यानरमंदी मोठ्ठा घोळ झालाय"
सरपंच ताबड़तोब घटनास्थळी हजर झाले.
ब्यानरवरचे म्याट्टर पाहुन त्यांना भवळच् आली. 'आमदार श्री भाऊराव गड़दे' च्या ऐवजी 'आमदार श्री भौराव गधड़े' झाले होते. आणि कहर म्हणजे आमदार साहेबांच्या नावाच्या ठिकाणी सरपंचाचा मोठ्ठा फोटो छापलेला व सरपंचाच्या नावाज़वळ आमदार साहेबांचा छोटा फोटो.
डोकं एवढं ठनकु लागलं की भौ ला ते आपटुन आपटुन फोडुन टाकवं वाटू लागलं.
डोळे पांढरे करुन खाली बसलेल्या भौ ला लोकांनी आधी दवाखान्यात नेऊन बीपी चेक केला आणि मग घरी नेऊन सोडले.
डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांमुळे भाउंना चांगलीच झोप लागलेली. पण रात्री साडेबारा वाजता गन्या "भौ, ग्रामसेवक आलेत" म्हणाला की ते ताड़कन उठून बसले.
"बोला?"
"भौ, एक आयड्या सुचली'
ग्रामसेवकाने भौ च्या कानाजवळ जाऊन कुजबूज केली. भाऊंचा चेहरा खुलला. रात्री एक च्या सुमारास त्यांनी आमदार साहेबांच्या बंगल्यावर फ़ोन केला. भाऊ जवळपास अर्धा तास मिटक्यामारत आणि मोठ्याने खिदळत बोलत होते.
नंतर एक एक प्याक मारून दोघे झोपी गेले.
सकाळी आरामात उठून साधारण दहाच्या सुमारास सरपंच ग्रामपंचायतच्या आवारात आले.
मंडपवाल्याने दोन हजारात बसतो तेवढा मंडप टाकला होता. चार दोन खुर्च्या मांडून, सतरंजी हातरली होती. सगळे ब्यानर काढुन टाकलेले.
साधारणता बाराच्या सुमारास आमदार साहेब आले.
आल्या आल्या सरपंचांनी त्यांचे हार घालुन स्वागत केले आणि लगेच माईक हातात घेऊन जाहिर केले;
"राती आमदार साहेबांचं अन् आमचं बोलणं झालं. त्यापरमाणं.. आपल्या गावाच्या भल्यासटी... नव्या नव्या योजना सरकार कडून मंजूर करुन आनाया सटी... आपल्या गावाचं नांव गाजिण्या सटी म्या सरपंच इनायकराव... आमदार भौ च्या हजरित त्याहीच्या पक्षात परवेश करतो असं जाहिर करतो."

कथाविनोदराजकारण

प्रतिक्रिया

स्पा's picture

5 Jun 2016 - 4:53 pm | स्पा

जबराट =))

एस's picture

5 Jun 2016 - 5:08 pm | एस

हाहाहा!

जेपी's picture

5 Jun 2016 - 5:08 pm | जेपी

चांगलय..

चौथा कोनाडा's picture

5 Jun 2016 - 6:13 pm | चौथा कोनाडा

लै झ्याक !
मजा आली वाचून श्यान !
सरपंच लैच बेण, इरसाल म्हनायच !

इरसाल's picture

6 Jun 2016 - 2:23 pm | इरसाल

लैच इरसाल की ;)

आनंद कांबीकर's picture

7 Jun 2016 - 3:27 pm | आनंद कांबीकर

इरसाल
हा हा हा

आनंद कांबीकर's picture

7 Jun 2016 - 3:27 pm | आनंद कांबीकर

इरसाल
हा हा हा

जव्हेरगंज's picture

5 Jun 2016 - 7:12 pm | जव्हेरगंज

आयड्याबाज कथा आहे की राव!
कडक! लै भारी!

चांदणे संदीप's picture

5 Jun 2016 - 7:56 pm | चांदणे संदीप

मासिकात शोभून दिसल बगा ही गोष्ट! ह्या वर्शीच्या दिवाळी अंकाला द्या धाडून!

Sandy

नाखु's picture

6 Jun 2016 - 9:25 am | नाखु

सुभाष भेण्डे,चंद्रकांत महिमाने सारखं लिहितोयसरे आनंदा,असाच लिहित जारे बाबा असं आम्च्या यांचं मत आहे.सध्या गुडघेदुखीने ते मिपावरही फारसे येत नाहीत (जोरात पळता येत नाही रे अता).

मिपा सार्वकालीन माई.

चिनार's picture

6 Jun 2016 - 10:40 am | चिनार

मस्त !!!

आतिवास's picture

6 Jun 2016 - 10:50 am | आतिवास

:-)

राजाभाउ's picture

6 Jun 2016 - 10:51 am | राजाभाउ

जबराट !!!

मुक्त विहारि's picture

6 Jun 2016 - 10:55 am | मुक्त विहारि

वाचतांना मज्जा आली .

ब़जरबट्टू's picture

6 Jun 2016 - 11:52 am | ब़जरबट्टू

आवडली..

किसन शिंदे's picture

6 Jun 2016 - 12:01 pm | किसन शिंदे

एक लंबर हाय

मराठी कथालेखक's picture

6 Jun 2016 - 5:41 pm | मराठी कथालेखक

मस्तच ...!!

शेवट थोडासा अपेक्षित होता. तरीही उत्कंठावर्धक होती कथा.

प्रीत-मोहर's picture

7 Jun 2016 - 5:01 pm | प्रीत-मोहर

=)) सहीच

आनंद कांबीकर's picture

11 Jun 2016 - 5:27 pm | आनंद कांबीकर

धन्यवाद