शेवटचा अश्रू
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.